सिंचन घोटाळ्यातल्या फाईल्स बंद करुन घेतल्यानंतर, आरोपपत्रातून (चार्जशीट) आपलं नाव गायब करुन घेतल्यानंतर... "५% मुस्लिम आरक्षण" एल्गाराचा, अजित पवारांचा 'फूल टू पाॅवरफूल राजकीय गेम'...!!!
सतत, आपला राजकीय स्वार्थ व सोयीनुसार बदलत्या राजकीय-भूमिका आणि गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून झपाट्याने 'बेदखल' होऊ लागलेल्या अजितदादा पवारांनी, 'आखरी रास्ता और डुबने से पहले एक तिनके का वास्ता" म्हणून, आपल्या मंत्रिमंडळातील दोन मुस्लिम मंत्र्यांसोबत (हसन मुश्रीफ व अब्दुल सत्तार) घेतलेल्या बैठकीत "५% मुस्लिम आरक्षणा"चा एल्गार करुन सध्याच्या गद्दारीच्या, फोडाफोडीच्या महाराष्ट्रीय राजकारणात मोठा बाॅम्बस्फोटच केलाय!
अजितदादा, केवळ स्वभावाने फटकळच आहेत, असं नव्हे; तर, महाराष्ट्रातल्या राजकारणाची नस न् नस जाणणारे, हजारो कोटीत खेळणारे व 'तेल लावलेल्या पहेलवाना'च्या तालमीत तयार झालेले अत्यंत बेभरवशी व धोकेबाज नेते आहेत. अशा नेत्याने 'फडणवीस-शिंदे' सरकारच्या, महाराष्ट्रभरातल्या जनतेला 'फशी' पाडू पहाण्याच्या, बनावट व ढोंगी 'हिंदुत्वा'ला आरपार जाणलं नसेल, तर नवलच!
'हिंदुत्वा'चं कातडं पांघरलेल्या 'लांडग्यांची लबाडी', मुळातून अजितदादा नाही जाणणार (इथे गोपीचंद पडळकरांनी, अजितदादांबद्दल काय 'फुत्कार' टाकले, त्याचा कृपया संदर्भ घेऊ नये), तर मग कोण जाणणार?
...आणि म्हणूनच, या बेगडी-बनावट-बोगस 'हिंदुत्वा'चा, भाजपा-मिंधे सरकारचा असलेला 'यूपीएस'च (UPS) उध्वस्त करण्याचा अजितदादांनी चंग बांधलेला दिसतोय. ज्या कमकुवत आधारावर हे 'ई.डी.' (E.D.) सरकार जेमतेम उभं आहे... तो आधारचं, 'ब्लॅकमेलिंग'च्या भाजपाई राजकारणाचा प्रतिशोध म्हणून, अजितदादा समूळ नष्ट करण्यासाठी; तसेच, जाता जाता... आपलं डळमळीत झालेलं राजकीय-बस्तान, ठाकठीक करण्यासाठी (म्हणजे, 'घरवापसी'चे संकेत) "५% मुस्लिम आरक्षणा"चा ॲटमबाॅम्ब, मंत्रालयाच्या रिंगणात फेकून मोकळे झालेत.
"राजकारणात कुठलाही 'विधिनिषेध' न बाळगणाऱ्या व व्यक्तिगत पातळीवर नितीमत्ताशून्य असलेल्या 'पाॅवर-सेंट्रिक पवारां'ना राजकारणातून एकवेळ संपवता येईल... पण, 'मॅनेज' करता येणार नाही", याचा कटू अनुभव इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत सगळ्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने घेतला आणि आजवर काँग्रेसने केलेली ती तशी घोडचूकच 'मोदी-शहा-फडणवीसांची बीजेपी' करुन बसलीय. त्यामुळे, शिवसेना व राष्ट्रवादी संपवली म्हणून 'जितम् मया, जितम् मया' म्हणून थिरकणाऱ्या 'फसणवीसां'च्या चिल्ल्यापिल्ल्या भाजपावाल्यांच्या पायाखालची जमीनच सरकलीय... अजितदादा नावाचं हाडूक गळ्यात अडकलेली बीजेपी, आता यापुढे ना ते धड गिळू शकणार, ना ते सहजी बाहेर काढू शकणार, एवढं मात्र खरं...
...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
-----------------------------------------
सरकारचं ओबीसी नेत्यांना आश्वासन
ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी नेत्यांची सरकारसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक महत्त्वाचे मंत्री आणि नेते हजर होते. यावेळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही, ज्यांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी असा उल्लेख असेल त्यांनाच संबंधित प्रमाणपत्र दिलं जाईल, असं सरकारने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मु्द्दा पेटला आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केलीय. पण राज्य सरकारने तसं करु नये, यासाठी ओबीसी समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरु आहे.
दरम्यान सदर बैठकीत छगन भुजबळ यांनी मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. ओबीसींवर अन्याय होतोय. ओबीसी समाजाचे कमी अधिकारी मंत्रालयात आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. यावर अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ही माहिती साफ चुकीची आहे. ही माहिती खरी असेल तर भुजबळांनी याबाबतचे पुरावे दाखवावे, असं अजित पवार बैठकीत म्हणाले.
0 टिप्पण्या