जर्मनी बर्लिन येथील ऑलिम्पिक मध्ये जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी चेंबूर मुंबई मधील चाळीच्या छोट्या घरात राहणारी ही 'स्पेशल' मुलगी ! 'स्पेशल' या अर्थाने की,तिचा बुद्ध्यांक कमी असून तिला ऐकूही कमी येते.फार बोलताही येत नाही.चेंबूरच्या स्पेशल मुलांच्या शाळेत ही थोडीशी शिकली.मात्र पोहण्यामध्ये तरबेज बनली आणि याच कलेच्या जोरावर जग जिंकून आली. भारतासाठी ही काही कमी अभिमानाची गोष्ट नाही.पण या मुलीचा मीडियाने देखील फारसा जयजयकार केला नाही.दुसरी कुणी असती तर कदाचित सरकारने तिला घर देखील दिलं असतं.तिच्या मोठमोठ्या मुलाखती घेतल्या गेल्या असत्या. तिच्या आईने केलेल्या संगोपनाचे गोडवे गायले गेले असते ...पण हिची काही फारशी दखल घेतली गेली नाही.ना दिल्लीकडून ना महाराष्ट्र सरकारकडून.याची कारणं काय असतील त्यावर मी बोलत नाही.ज्याने त्याने समजून घ्यावं.
आंबेडकरी समाजाने मात्र या लेकीचं खूप कौतुक केलं.एका प्रायव्हेट मीडियाने तिच्या घरी घेतलेली मुलाखत युट्युबवर टाकली आणि बघता बघता या मुलीच्या उत्तुंग यशाची बातमी सर्वदूर पोहोचली.ही आपली पोरगी म्हणून आंबेडकरी समाजातील अनेकांनी तिच्या घरी जाऊन भेटी दिल्या.संस्थांनी छोटे-मोठे सत्कार समारंभ आयोजित केले.मागच्याच महिन्यात अंधेरी येथील महिलांनी (संवादिनी संस्था)तिचा सत्कार आयोजित केला आणि छोटीशी रक्कम प्रेझेंट केली.माननीय नागसेन सोनारे (सेवानिवृत्त क्लासवन अधिकारी) यांनी एक महागडा स्मार्टफोन गिफ्ट दिला. छोटासाच समारंभ,छोटीशीच भेट रक्कम पण भावना किती मोठी होती यामागची ! मलाही याचा एक भाग बनता आलं, हा आनंद खूप मोठा...! - आशालता कांबळे
0 टिप्पण्या