Top Post Ad

मुंबई विद्यापीठ निवडणूका 'रातोरात' रद्द

 


 निवडणूक स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक

प्रलंबित असलेली मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कोरोना काळानंतर होत होती. त्यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी पदवीधर मतदार नोंदणीसाठी दिवस-रात्र मेहनत घेतली होती. या प्रक्रियेमध्ये आपला वेळ, पैसा, श्रम ओतले होते. अशावेळी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला संघटन, युवा संघटन यांनी सिनेट निवडणुकीमध्ये दिनांक 17 ऑगस्ट रोजी नऊ अर्ज दाखल केले आणि 18 ऑगस्ट या शेवटच्या दिवशी उर्वरित आणखी अर्ज दाखल होणार होते. आणि तेव्हाच 17 ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजता विद्यापीठ अधिसभेने सिनेटची निवडणूक स्थगित केल्याचे परिपत्रक जाहीर केले. ही बाब निषेधार्ह असून याबाबत सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

निवडणुका रद्दच करायच्या होत्या तर विद्यार्थ्याकडून उमेदवारी अर्ज का भरून घेतले. मुंबई विद्यापीठाची साईट उशिरा पर्यत चालू होती. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ओंनलाईन पैसे भरलेले आहेत. अशा पद्धतीने मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांची मानसिक व आर्थिक पिळवणूक करीत आहे. या निवडणुकीत साधारणपणे फुले- आंबेडकर विचाराच्या संघटनांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये बाजी मारली होती. इतर पारंपारिक विद्यार्थी संघटनांनी अद्याप अर्ज दाखल केले नव्हते.सम्यक विद्यार्थी आंदोलनाने अनेक  समविचारी शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांना एकत्र घेऊन  नवीन शैक्षणिक धोरणा विरोधात, मोर्चे- आंदोलन आणि परिषदा घेतल्या.  या नवीन शैक्षणिक आकृतीबंधामुळे , सरकारी शाळा, कॉलेज बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये अशास्त्रीय कोर्स उदाहरणार्थ ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र , हस्तरेषाशास्त्र अशा कोर्सेसना विरोध होणार होता. हा विरोध दडपण्यासाठी प्रशासनाने निवडणूकाच रद्द केल्या असल्याचा आरोप सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेस मध्ये साधे प्रसाधनगृह नाहीत. सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणारे  मशीन नाहीत.  मुंबई विद्यापीठासारख्या भरपूर आणि मोक्याच्या जागा राखून असलेल्या विद्यापीठाच्या जमिनीवर काही भांडवलदारांचे लक्ष आहे त्यांना या जमिनी गिळंकृत करायच्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासासाठी लागणारा पैसा केंद्र सरकारने देणं बंद केलं आहे. आणि हळूहळू हे विद्यापीठ, त्याचे विभाग खाजगी भांडवलदारांना देण्याचे षडयंत्र रचले जात आहे,  आणि त्याचाच परिपाक म्हणजे विद्यापीठाच्या मोक्याच्या जागा काही लोकांना अलॉट करण्याचं षडयंत्र रचलं गेलेल आहे आणि त्या विरोधात  सम्यक विद्यार्थी आंदोलन ही वंचित बहुजन आघाडी प्रणित संघटना मैदानात उतरली होती. 

ऐतिहासिक मुंबई विद्यापीठ वाचविण्याची  जबाबदारी, नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध  या कृती कार्यक्रमासहित सम्यक आंदोलन  मैदानात उतरले होते. त्यालाच कुठेतरी शह देण्यासाठी विद्यापीठाने सिनेट पदवीधर निवडणुका संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असताना आयत्या वेळेस स्थगित केला असा जाहीर आरोप महाराष्ट्र प्रदेश सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे.  या कृतीचा जाहीर निषेध करणारे पत्र मा. राज्यपाल  महाराष्ट्र राज्य तसेच मा. प्रभारी कुलसचिव तथा  निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई विद्यापीठ यांना पाठवण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले

 सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तसे त्यांनी एक पत्र राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून 9 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवार अर्ज भरण्याची शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम तारीख होती. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे

------- 

“राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील, तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने ‘रातोरात’ रद्द करण्यात आली हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज ‘पहाटे’चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मन:पूर्वक आभार!”,  _ - अमित ठाकरें  ( अध्यक्ष- मनसे विद्यार्थी सेना)

--------- 

मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे. -  वरुण सरदेसाई  ( सचिव- युवा सेना)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com