पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील जमीन लाटण्याचा डाव
ऑगस्ट क्रांती दिनी हजारो धारावीकर रस्त्यावर उतरणार
अदानी चले जावचा नारा देत ऑगस्ट क्रांती दिनी हजारो धारावीकर रस्त्यावर उतरणार आहेत. अदानी समूहाच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यास धारावीकरांकडून जोरदार विरोध होत आहे. राज्य सरकारपर्यंत हा विरोध पोहचविण्यासाठी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता येथील ९० फूट रस्त्यावरील कामराज हायस्कुलच्या जवळ धारावीकर जमणार असून येथे अदानीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहेत. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होणार आहे. अशी माहिती या मोर्चाचे निमंत्रक अनिल शिवराम कासारे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत अदानीला धारावीत पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार धारावीकरांनी केला आहे. तसेच यावेळी आंदोलनाची पुढील दिशा यावेळी निश्चित केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडी सदस्थ आणि जनकल्याण गृहनिर्माण विकास समितीचे सरचिटणीस अनिल शिवराम कासारे, माजी आमदार बाबुराव माने, श्यामलाल जैस्वार, आपचे संदिप कटके, आरपीआयचे मारीयन्न भाई, भाडेकरू महासंघाचे अध्यक्ष नितिन दिवेकर, विनित कासारे, मलिक कल्लाळ, जिगर मोरे, गौतमी जाधव, सुनिल काबंळे, ऋतिक कासारे यांच्यासह धारावी बचाव आंदोलनाचे निमंत्रक आणि धारावीतील अनेक संस्था संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती कासारे यांनी दिली.
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. या पुनर्विकासासाठी अदानीला अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. तर यातून अदानीला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा प्रकल्प अदानीला देण्यास धारावीकरांचा विरोध आहे. अदानीला पुनर्विकासाचा कोणताही अनुभव नसताना हा प्रकल्प देण्यात आल्याचा आरोप धारावीकरांकडून करण्यात येत आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील जमीन लाटली जाणार आहे, सर्वसामान्य धारावीकर धारावीतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे, असा आरोप करीत धारावीकरांनी अदानी समुहाला विरोध केला आहे.
0 टिप्पण्या