Top Post Ad

ठाणे महानगरपालिकेची लूट ही गुन्हेगारी माध्यमातून...

 


   ठाणे महानगर पालिका म्हणजे अनधिकृत बांधकामांचे प्रसिद्ध शहर याबाबत नेहमीच कुल्हेकुई सुरु असते. मात्र काही काळाने तो विषय पुन्हा थंड बस्त्यात गुंडाळला जातो. मग बांधकाम करणारे भूमाफिया पुन्हा मोकाटच आपली कामे सुरु ठेवतात. पालिका अधिकाऱ्यांचा सर्वात मोठा आर्थिक स्त्रोत हाच असल्याने ही बांधकामे सुरूच राहणार. या बांधकामांच्या मलईकरिताच आज प्रभाग समितीमधूनच नव्हे तर मुख्यालयात देखील कित्येक वर्षे एकाच ठिकाणी केवळ अधिकारीच नाही तर कर्मचारी देखील आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत. अशी चर्चा आता ठाणेकर खुले आम करीत आहेत. या बांधकामांबाबत ठाण्यातील आमदारांनी कित्येक वेळा महापालिका आयुक्तांना धारेवर धरले आहे. मात्र काही काळ चर्चा होते नंतर ती पुन्हा थंडबस्त्यात जाते. 

ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून या अनधिकृत बांधकामाला चव्हाट्यावर आणले आहे.  सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. एक-एका ईमारतीमध्ये 40-40 लाख रुपये वाटले जात आहेत. एका लेडी डॉनने ठाणे महानगरपालिका प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन ब्लॅकमेलींगचा मोठा व्यवसाय सुरु केला आहे. कुठल्याही ईमारतीचे बांधकाम चालू असेल तर त्याठिकाणी बुलडोझर, पोकलेन घेऊन जायचं. तोडण्याच नाटक सुरु करायचं आणि नंतर 15-20 लाख रुपये घेऊन सेटलमेंट करायची. यामध्ये सगळ्यांचेच हफ्ते बांधलेले असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

त्याच्यापुढे जाऊन ज्या इमारती धोकादायक होत्या त्याच्यातील एक इमारत शिबली नगरमध्ये निष्कासित करण्यात आली होती. त्या सगळ्यांना म्हाडामध्ये घरे देखिल देण्यात आली परंतु आता त्याच इमारतीचे पुर्नबांधकाम अनधिकृतरीत्या सुरु करण्यात आले आहे. एकतर म्हाडामध्ये कोणाला घरे दिली, कशी दिली याचे कुठलेही ऑडीट ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत केलेले नाही. तसेच जी केस म्हाडा संबंधी झाली होती आणि ज्यामध्ये वीर नावाच्या अधिका-याचे स्टेटमेंट होतं ज्याच्यावर ही सगळी केस अवलंबून होती, त्या वीर चे जे म्हणणं होत. जे त्याच्याकडून लिहून घेतलं होतं, ती कागदपत्रेच गहाळ आहेत. हे मिटविण्यासाठी मुंब्र्यातील एका जावेद नावाच्या व्यक्तीला 50 लाख रुपये देण्यात आले आणि त्यानंतर पोलीस अधिका-यांना किती पैसे देण्यात आले याची जावेदला व्यवस्थित माहिती आहे. त्या पैशांमुळेच म्हाडाची केस दाबण्यात आली. म्हाडामध्ये कोणा-कोणाला घरे दिली हे ना तर आजपर्यंत ठाणे महानगरपालिकेला माहिती ना त्याबाबतचे काही ऑडीट असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे. 

तसेच ज्या योजनेअंतर्गत अधिकृत इमारतीमध्ये देखिल ठाणे महानगरपालिकेला फ्लॅट देण्यात येतात ते फ्लॅट कोणाला देण्यात आले? कसे देण्यात आले? त्या संबंधी तक्रार करुन देखिल ठाणे महानगरपालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. ठाणे महानगरपालिकेची लूट ही गुन्हेगारी माध्यमातून करण्यात येत आहे आणि गुन्हेगार दुर्देवाने ठाणे महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत. काही भाग्यवान असे आहेत की, त्यांना मुंब्र्यातील म्हाडामध्ये एक-एक मजला देण्यात आला आहे. तसेच लोढामध्ये जी काही दुकाने होती ती देखिल आपल्याच नातेवाईकांना देण्याचा घाट ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी घातला आणि तो यशस्वी देखिल करुन दाखवला. ठाणे महानगरपालिकेवर कायद्याचे राज्य आहे की, नाही हेच कळत नाही. 

तक्रार करुन काहीच होणार नाही हे माहित असून देखिल मी तक्रार करीत आहे कारण, आता परत कौसा ते शीळ येथे जवळ-जवळ 200 अनधिकृत बांधकामे चालू आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्त आपण याकडे कधी लक्ष देणार. आपण यावर कधी कारवाई करणार. ज्या जावेदला 50 लाख रुपये देण्यात आले त्या जावेदचे नाव मी उघड करीत आहे. हिम्मत असेल तर त्या जावेदला बोलावून विचारा. पण, पोलीस त्याला बोलावणार नाहीत. कारण, पोलीसांनी जे काही केलं आहे ते संपूर्ण मुंब्र्याला माहित आहे. आणि यामध्ये कृपा कोणाची झाली आहे हे देखिल सगळ्यांना माहित आहे. कृपा झाल्यामुळेच हे सगळं प्रकरण मिटविण्यात आलं. हे काही वेळ शांत राहू शकेलं पण, कायमच कधीच शांत होणार नाही. कारण, कागदपत्रे बदलता येणार नाहीत. जर म्हाडामध्ये घरे उपलब्ध करुन दिली असतील तर पुन्हा इमारत बांधलीच कशी जाऊ शकते. आणि त्याच्यावर ठाणे महानगरपालिकेचा काहीच अंकुश नाही का?  हा प्रश्न उभा राहतोच. आता दिवा परिसरासाठी नवीन वॉर्ड ऑफिसर देण्यात आले आहेत असे समजते. तर ही तक्रार दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना पाठवून कारवाई करावी असे आव्हाड यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com