छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनावर आमदार आव्हाड यांचा आरोप
ठाणे
शहरातील रंगरंगोटी आणि लायटींगवर खर्च करून शहर स्मार्ट होणार नाही. त्यासाठी शहराची आरोग्य व्यवस्थाही सक्षम करावी लागते, जितोला कॅन्सर युनिट देता, आपण करोडो रुपयांच्या जमिनीचा ताबा आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली देता. त्यातीलच काही कोटी रूपये जर छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाला दिले तर अनेक गरिबांचे जीव वाचतील आणि आपल्या पदरात पुण्य पडेल. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गेलो. तेव्हा परिस्थिती पाहून माझा संताप अनावर झाला होता. आपण ते बोलूनही दाखवले. मात्र, आपलं चिडणं स्वाभाविक होते. तिथे माझे आई-वडील, पोरं बाळ तिथे ऍडमिट नाहीत. जर गरिबांसाठी माझा जीव तुटत नसेल गरिबांसाठी मी चिडत नसेल तर मला जगण्याचा अधिकार नाही, 30% कमिशनच्या हव्यासापोटी अनेक तपासण्या करण्यासाठी रूग्णांना बाहेर पिटाळले जाते, असा आरोप आव्हाड यांनी केला.
दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी माजली आहे. बेड नसल्याचे कारण सांगून रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्या रुग्णांवर उपचार होतच नाहीत. गुरूवारीही तसाच प्रकार सुरू असल्याची माहिती येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांनी फोनवरून दिली. ही माहिती मिळताच तडक छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालय गाठून पाहणी केली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यवस्थापनावर चांगलीच आगपाखड केली. यावेळेस जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते.
डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेली तीस वर्षे जे ठाणे महानगर पालिकेच्या सभागृहामध्ये सत्तेत बसले आहेत, त्यांनी काय केले? असा आपला सवाल आहे. गुरूवारी रात्री आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात गेलो. तेव्हा, रूग्णालयात कुत्रे फिरताना दिसत होते. या कुत्र्यांनी रूग्णालयात शी केलेली सु केलेली दिसत होती. रूग्णांना बाहेर बसण्यासाठी जे कठडे तयार केले आहेत. त्यावरही रूग्ण झोपले होते. त्यावर झोपलेल्या एका रुग्णाने आपल्याकडे 12 तास कोणीही लक्ष दिलेले नाही, असे सांगितले. डाॅक्टरांशी रुग्णाने संवाद साधल्यावर आता वेळ नाही, उद्या ये असे सांगितले जाते. मृत्यू हा सांगून येत नाही. त्यामुळेच डाॅक्टर्सची उपलब्धता 24 तास असावी, असा अलिखित नियम आहे.
पण, इथे सर्व बोंबाबोंब आहे. छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पंख्याखाली बेड देण्यासाठी चक्क 500 रूपये मागितले जात आहेत. या रूग्णालयात उपचारासाठी गोरगरीब, मागासवर्गीय रूग्ण जात असतात. त्यांचा अप्रत्यक्ष छळच केला जात आहे. ठाणे शहर स्मार्ट केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी, लाईटींग केली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. त्यापेक्षा इथल्या गरिब रूग्णांच्या जीवाशी खेळ होऊ नये, म्हणून त्या पैशाचा वापर आरोग्य सुविधांसाठी केला गेला तर ठाणेकर आयुष्यभर आपले उपकार मानतील, असा सल्लाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
रूग्णालयात जेवणासाठीही रूग्णांना घरातून वाडगे आणायला सांगितले जाते. पोषक आहार म्हणून मनोरुग्णालयात अंडी देण्यात येत असतात. इथे कोंबडीच अंडी घेऊन जाते की काय? असा सवालही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. 30 % कमीशन मिळवण्यासाठी रक्त, लघवी, विष्ठा बाहेरून तपासून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. आपण सन 2014 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना हे रूग्णालय शासनाकडे वर्ग करावे, असे सुचवले होते. कारण, आज सायन, केईएम, नायर आणि जेजे या रूग्णालयात उत्कृष्ट सेवा मिळत आहे. त्यामागे शासनाची यंत्रणाच महत्वपूर्ण ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली होती. पण, तो प्रस्ताव पुढे सरकलाच नाही. आजची या रुग्णालयाची अवस्था पाहून असे वाटते की, गरिबांना जगण्याचा अधिकार नाही का? गरिबांना उत्तम आरोग्य व्यवस्था मिळवण्याचा अधिकार नाही का? येथील सुतिकागृहात गरोदर महिला खुर्चीवर बसलेल्या असतात. तिथेच रक्तस्राव होऊन अनेक गर्भवती दगावतात. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना आपण हात जोडून विनंती करतो की, आपण आपल्या शहराचे उत्तरदायित्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. या मध्ये आपणाला राजकारण करायचे नाही. पण, एवढेच सांगायचे आहे की, जितोला कॅन्सर युनिट देता, आपण करोडो रुपयांच्या जमिनीची ताबा देता; त्याच्यातले काही करोडो रुपये जर कळवा हॉस्पिटलमध्ये दिले तर अनेक गरिबांचे जीव वाचतील आणि आपल्या पदरात पुण्य पडेल. चुकीच्या माणसांच्या हातात रूग्णालय आणि परिवहन सेवा गेल्याने ही दुर्दशा झाली आहे, असेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या