Top Post Ad

त्यामुळे, चांगल्या कार्यकर्त्यांना, चांगल्या नेतृत्त्वाला समाज पारखा झालाय


 चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत आता पांढरपेशा पगारदार मध्यमवर्गात अंशानेही शिल्लक राहीलेली नाही, हे समाजाचं, पर्यायाने देशाचं फार मोठं दुर्दैव आहे.  शिवछत्रपती, महात्मा फुले, महात्मा गांधी, विवेकानंद, प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर हवेत... पण, ते दुसर्‍या कोणाच्या तरी घरात जन्माला यावेत, ही पळपुटी मनोवृत्ती आणि जोडीला 'करियर' नावाच्या आत्मकेंद्रित भूलभुलैय्यामुळे... ज्या वर्गातून, समाजहितैषी कार्यकर्ते-नेतृत्त्व जन्माला येतं किंवा यायला हवं, तो मध्यमवर्गच षंढ आणि थंड बनून बसलाय... अलिकडे तर तो, भाजपाच्या बदमाष, समाजघातकी 'आयटी-सेल'च्या व 'गोदी-मिडीया'च्या नादी लागून 'जातधर्म-विद्वेषी' व्हायला लागलाय!

कुठलीही पोकळी रिकामी रहात नाही, हा निसर्ग-नियम आहे. कुणी ना कुणी ती, चारही बाजुंनी घुसून भरुन काढतंच... पगारदारवर्गाने किंवा यशस्वी व्यावसायिकांनी (प्रामुख्याने, वकील, शिक्षक-प्राध्यापक, डाॅक्टर्स  वगैरे) समाजकारण-राजकारणातील सोडलेल्या मोकळ्या जागा... तशाच पद्धतीने, समाजातल्या भ्रष्ट, ढोंगी, बदमाष व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी भरुन काढल्यात. आर्थिकदृष्ट्या बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाल्यावर तरी, या बुद्धिजिवी समाजघटकांनी राजकारणात रस घ्यायला नको का? पण, 'स्वांतसुखाय' अशा पार्टी-पर्यटन संस्कृतीत आकंठ बुडालेल्या त्यांनी, अप्पलपोट्या वृत्तीने  राजकारणाचा त्याग केल्याचं दुर्दैवी चित्र देशात उभं आहे. त्यामुळे, चांगल्या कार्यकर्त्यांना, चांगल्या नेतृत्त्वाला समाज पारखा झालाय! 

आज जे काही, आपण अत्यंत किळसवाणं, संतापजनक, शिसारी आणणारं राजकारण पहातो, त्याचा मुळातला उगम इथेच आहे... राजकारणाची गंगा 'मैली' बनण्याचं प्रमुख कारण, हेच आहे. राजकारणात भले तुम्हाला रस नसेल; तरी, राजकारणाला तुमच्यात रस असतोच... एवढंच नव्हे, तुम्ही त्याला कितीही नाकारलंत, झिडकारलंत; तरी राजकारण तुमच्या कुलूपबंद घरादारात जबरदस्तीने घुसल्याखेरीज रहात नाहीच. अनेक सामाजिक-राजकीय-आर्थिक व निसर्ग-पर्यावरणीय समस्या... ज्या तुम्हाला आणि तुमच्या पुढील पिढ्यांना, आज घेरुन बसलेल्या आहेत; ते म्हणजेच तुमच्या घरात, तुम्ही लावलेली कडीकुलूपं तोडून राजकारणाचं घुसणं असतं. म्हणूनच, आज कुणाच्या जीवाला, या निर्मम-शोषक 'भांडवली-व्यवस्थे'त जराही थारा शिल्लक नाही. पावलोपावली सगळीचं जणं भांबावलेली-भेदरलेली दिसतात. निवृत्तीपर्यंतच काय, पण आज असलेली नोकरी उद्यापर्यंत टिकेल की, नाही याची शाश्वती संपलीय... जी मोठी राजकीय-पोकळी, याच मध्यमवर्गाने उमेदीच्या काळात राजकारणात रस न घेऊन म्हणजेच, राजकारणात प्रवेश न करुन निर्माण करुन ठेवलेली असते... त्या पोकळीचाच 'नवा अवतार' त्यांना निवृत्तीपर आयुष्यात भेडसवायला लागतो... शिलकीचा नन्नाचा पाढा असल्याने निवृत्तीनंतरची निर्माण झालेली 'आर्थिक-पोकळी' कुठल्यातरी भुक्कड नोकरी-व्यवसायाचा आसरा घेऊन भरण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागतो.

...कधि वाटतं, एवढा कंत्राटी-पद्धतीतल्या नोकरीतला भयंकर आकांत-आक्रंदन, या मध्यमवर्गाच्या कानी पडत नसावा का? निळ्या ब्लू-काॅलरवाल्यांचा आपल्या लवलवत्या जिव्हांनी घास घेतल्यानंतर ती अवदसा, आता याच पांढऱ्याशुभ्र काॅलरवाल्यांच्या कालपरवापर्यंत सुरक्षित असलेल्या घरादारांना आग लावून भस्मसात करायला निघालीय, हे ही त्यांच्या नजरेला पडत नसेल का??...की, या मध्यमवर्गाची जीभच गळून पडलीय, मेंदू बधीर झालाय... नेमकं घडलंय तरी काय?  पण, व्यवहारात पहावं तर, घरबसल्या चहाचे किंवा दारुचे घोट घेत असताना व एरव्ही, समाजमाध्यमातून राजकारणावर टीकाटिप्पणी करताना यांच्या 'रसवंती'ला चांगलाच बहर येतोच की...  यापैकी अनेकजण, राजकारण हा बदमाषांचा अड्डा झालाय, आपलं ते काम नाही... अशी नकारात्मक संवादफेक करताना सर्रास दिसतात. पण, हे आक्रित घडण्याला मूलतः आपणच कारणीभूत आहोत, हे सोयिस्कररित्या त्यांच्याकडून दुर्लक्षित केलं जातं. 

भारताच्या राज्यघटना-निर्मितीसाठी अस्तित्वात आलेल्या 'संविधानिक-सभे'त, या अशाच बुद्धिजिवी मध्यमवर्गाचं (विशेषतः, वकीलीपेशातल्या) मोठं प्राबल्य होतं; पण, स्वातंत्र्यानंतर, विशेषतः नव्वदीतल्या 'खाउजा' धोरणापश्चात (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण), झपाट्याने मध्यमवर्गाने राजकारणातून अंग काढून घेणं सुरु केलं आणि त्याची परिणती आरपार भ्रष्ट, गुन्हेगारी, बलात्कारी वृत्तीच्या 'सह्याजीरावां'चा (पक्षीय आदेशानुसार आंधळेपणाने कुठेही सही करायला एका पायावर तयार असणारे 'होयबा') संसदेत मोठ्याप्रमाणावर भरणा होण्यात झालीय.  ...मग त्यातूनच, मणिपूर जळत असतानाच महाराष्ट्राच्या कोल्हापुरात तसेच, कालपरवा हरियाणात प्रयत्नपूर्वक दंगल घडवली जाते (लक्षात घ्या तिथे निवडणूक आहे लवकरच) आणि जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एखादा चेतनसिंग हुडकून हुडकून मुस्लिमांवर बंदूक चालवतो व तरीही, त्याला सौम्य सजा व्हावी म्हणून 'गोदी-मिडीया'तून तो मानसिक-रोगी असल्याचं पसरवलं जातं... बघा, राजकारण कसं तुमच्याआमच्या घरात घुसतं ते आणि भावी पिढ्यांना बरबाद करु पहातंय ते...!!!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

--------------------------------------------------------


जेव्हा बोन्ससॉयला लोक वटवृक्षाचा
दर्जा देऊन त्याची पूजा करायला लागतात....
तेव्हा, समजा की, समाजाचे अधःपतन झाले आहे. 

कोणत्याही धर्माच्या स्त्रिया असोत, 
जेव्हा, त्याची सार्वजनिक नग्न धिंड काढली जाते, 
आणि त्याचेही सुशिक्षित लोक समर्थन करतात....
तेव्हा, समजा की सामान्य लोक विकृत झालेत.  

जेव्हा आठ वर्षाच्या बालिकेवर अनेक दिवस सामूहिक बलात्कार करून 
तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांसाठी, लोक तिरंगा घेऊन मोर्चे काढतात...
तेंव्हा समजा देशभक्तीची व्याख्या बदलली आहे.

जेव्हा, बलात्कारी आणि खुन्यांना तुरुंगातून सोडून त्यांचे सत्कार केले जातात....
तेव्हा समजा समाज मुर्दाड झाला आहे.  

साधू-संत जेव्हा लोकांना प्रेम आणि सद्भाव 
शिकविण्याच्या ऐवजी, जेव्हा द्वेष आणि हिंसाचार शिकवू लागतात 
आणि व्यवस्थेशी 'हातमिळवणी' करुन बसतात....
तेव्हा, समजा की, धर्म अतिरेकी वळणावर चाललाय. 

एखादा कॉन्स्टेबल जेव्हा संपूर्णपणे अनोळखी लोकांना 
रेल्वेत त्यांचा धर्म शोधून गोळ्या घालतो..
तेव्हा समजा की त्याच्या मेंदूवर दुसऱ्याचा ताबा आहे.. 

एखादी १८/२० वर्षांची मुलगी स्वतःला शिवभक्त म्हणवून घेत धार्मिक विद्वेष पसरवते...
तेव्हा समजा पुढील पिढी नासवण्याचे काम यशस्वी होत आहे. 

जेव्हा लोक दंगलीत मारले गेलेले लोक 
जास्त कोण होते?     '
'आपले की त्यांचे'?' असं लोक  विचारतात...
तेव्हा समजा ध्रुवीकरण पूर्ण झाले आहे. 

हे सगळं, ज्या समाजात होत आहे, त्या समाजात माणुसकी, आदर, सहानुभूती यांची जागा 
द्वेष आणि हिंसेने घेतली आहे व तो समाज अधःपतनाच्या दरीकडे झपाट्याने वाटचाल करत आहे, असे समजा.  
.......सुनिल सांगळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com