सचिन तेंडुलकरने ऑनलाईन जुगाराची जाहिरात सोडली नाही तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. दानपेटीत जमा होणारा सर्व पैसा गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिन तेंडुलकरला आणून देऊ. आम्ही गणपतीलाही प्रार्थना करू की सचिनला चांगली बुद्धी दे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये, आमची एवढीच इच्छा आहे, असं बच्चू कडू म्हणाले. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सचिनच्या घराबाहेरील परिसर दणाणून गेला होता.
सचिन पेटीएम फर्स्ट गेमच्या जाहिरातीमध्ये येतो, जो ऑनलाइन गेमिंग ऍप आहे. यामध्ये लोक विविध प्रकारचे ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकू शकतात. हे एक काल्पनिक गेमिंग ऍप आहे. सचिन 2020 मध्ये पेटीएम फर्स्ट गेमशी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून जोडला गेला होता. या प्लॅटफॉर्मवर केवळ क्रिकेटच नाही तर रमीसह अनेक प्रकारचे खेळ उपलब्ध आहेत, ज्यावर लोक पैज लावू शकतात.
सचिन तेंडुलकरची निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून निवड
निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली आहे. बुधवारी सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्याद्वारे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली करण्यात येणार आहे. हा सामंजस्य करार तीन वर्षांचा असेल. निवडणूक आयोगाने या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मतदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी उदासीनता आणि मतदानाप्रती तरुणांना प्रत्साहन करण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. अधिकाअधिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आयोग विविध क्षेत्रातील नामवंतांना आपला 'नॅशनल आयकॉन' म्हणून जाहीर करत आहे. गतवर्षी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. त्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एमएस धोनी, आमिर खान आणि मेरी कोम यासारख्या दिग्गजांना नॅशनल आयकॉन केले होते.
0 टिप्पण्या