पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुरंदरे यांचे शिल्प प्रवेशव्दारावर ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवप्रेमी, इतिहास संशोधकांकडून त्याचा जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता तथा संघटक संतोष शिंदे यांनी आता कुठे आहेत ते मनुवादी जे स्वत:ला फार मोठे हिंदुत्त्ववादी समजतात, शिवरायांची बदनामी तुमच्या डोळ्यासमोर होतेय आणि मुग गिळून तुम्ही गप्प बसता. असले पुतळे तुमच्या घरात बसवा, परंतू सार्वजनिक ठिकाणी हे आम्ही खपवून घेणार नाही. तात्काळ पोलिस प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीचा सखोल तपास करावा, चौकशी करावी. आणि महानगरपालिकेने गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही सुट्टी देणार नाही लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्व: कर्तृत्त्वावर राजे झाले, छत्रपती झाले. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी घेतले तरी ३३ कोटी देवांची पलटण बाद होते. एवढी ताकद छत्रपती शिवाजी या नावामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर आय़ुष्यभर ज्यांनी जोगवा मागितला हजारो कोटी कमवले, आणि एक विशिष्ट प्रकारची मांडणी शिवरायांच्या चरित्रासोबत वादग्रस्त पद्धतीने केली, ज्यांनी शिवरायांची बदनामी केली त्याच पुरंदरेचे शिल्प बालगंधर्व रंगमंदीरात प्रवेशव्दारावर ठेवणे आणि तिथे लोकांना प्रदर्शनामध्ये हे सगळे दाखवणे हे शिवप्रेमींच्या भावना भडकविणारे आणि वेदनादायी चित्र आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रशासनाने कशी काय परवानगी दिली या वादग्रस्त शिल्पाला असा सवाल करत शिवाजी महाराज आणि पुरंदरे हे काय मित्र आहेत का? संवंगडी आहेत काय ? त्यांनी काय सोबत काम केलयं का? पुरंदरेंची पात्रता काय? असे सवाल केले. ज्या जिजाऊंच्या चारित्र्याबद्दल ज्या शिवरायांच्या चारित्र्याबद्दल पुरंदरेंनी अत्यंत काल्पनिक पद्धतीने मांडणी केली, ती वादग्रस्त आहे. पुरंदरे हयात होते तरी आम्ही विरोध केला. कारण त्यांनी मांडलेले शिवचरित्र हे वादग्रस्त होते. त्यांना ते बदलावे लागले एवढी ताकद खऱ्या इतिहासात आहे, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या