Top Post Ad

जय सियाराम... राज की बात


   भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या केंब्रिज विद्यापीठातील 'राम-कथा' कार्यक्रमाला ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नव्हे; तर, एक 'हिन्दू' म्हणून सहभागी झालेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या, त्या कार्यक्रमाबाबतचे फोटो, व्हिडिओ... 'भाजपाई 'आयटी-सेल'ने खरंतरं, फार मोठ्याप्रमाणावर 'व्हायरल' करणं अपेक्षित होतं. पण, तसं घडताना दिसलेलं नाही... कारण, माहित्येय कुणाला? कारण, तसं जबरदस्तच आहे, 'बात कुछ राज की है'... अंधभक्तांच्या नीबर, जातधर्म-विद्वेषी मनाला व अंतःकरणाला फार फार काही त्यात झोंबणारं आहे, म्हणूनच तर, मित्रांनो, तसं घडलेलं नाही!

...याचं कारण, ऋषी सुनक यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मुळी, 'जय श्रीराम'सारख्या भुवया ताणलेल्या क्रुद्ध, संतप्त वृत्तीच्या 'राम-संबोधना'ने अजिबात न करता... 'जय सियाराम' या वात्सल्यपूर्ण, प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि संवेदनशील अशा पिढीजात, पारंपरिक राम-संबोधनाने केली... 'संघ-भाजपा'वाल्यांनी जाणिवपूर्वक मुस्लिमांवर मानसिक दबाव, दहशत निर्माण करण्यासाठी रागीट, उग्र स्वरुपाच्या बनवलेल्या या 'जय श्रीराम' संबोधाचा वापर, ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कटाक्षाने टाळला... आणि, ती बाब आता भाजपा-संघवाल्यांसाठी "सहन होत नाही आणि सांगता येत नाही", असं अवघड जागीचं दुखणं बनलंय!

'जय श्रीराम', हे मूळच्या 'जय सियाराम', या रामाच्या प्रेममय, कारुण्यमय, आज्ञाधारक व तत्त्वनिष्ठ प्रतिमेला सरळ सरळ छेद देणारं, हाती 'धनुष्यबाण' घेऊन 'रामबाण' सोडणारं युद्धप्रवण-संबोधनच!  लालकृष्ण अडवानींच्या उत्तर भारतातील रथयात्रेच्या आसपास मुद्दामहून, संघ-भाजपातर्फे 'मंडलमय' भारत, 'कमंडलमय' करण्यासाठी... 'जय श्रीराम', हे यादवी-युद्धज्वर पसरवू पहाणारं संबोधन व 'धनुष्यधारी राम' हे चित्र प्रसवलं गेलं होतं. लालकृष्ण अडवाणींच्या 'मंदिर वहीं बनायेंगे' रथयात्रेपूर्वी, या दोन्ही गोष्टी भारतात कुठेही फारशा प्रचलित नव्हत्याच कधि! 

आमची 'सीतामाई' किंवा 'सीतामैय्या' आली की, कारुण्य, प्रेम, वात्सल्य आपोआप तिच्या मागोमाग नाजूकसाजूक पावलं टाकीत आलंच समजा; पण, सीतेला जर जाणिवपूर्वक तुम्ही टाळलीत आणि खांद्यावर धनुष्यबाण घेतलेला, सीतेविना एकटा वनवासी 'राम' दाखवलात की, तो प्रातःस्मरणी वंदनीय असलेला ममत्वाने भरलेला कुटुंबवत्सल, एकवचनी आदर्शवत राम, 'मुळचा खराखुरा जाज्वल्य राम' शिल्लक न रहाता, संघ-भाजपाई ब्रॅण्डचा मुरलेला प्रचारक-संहारक बनलाच म्हणून समजा! आपल्या ढोंगी, बेगडी, बनावट 'हिंदुत्वा'आडचे... पाशवी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी, एकप्रकारे 'कृपाळू देवाला, हिंसक दानवसदृश्य पेशकश' करण्याची, ही घृणास्पद संघीय चाल व तिरस्करणीय भाजपाई धडपडच होय! 

माझे आजोबा अष्टौप्रहर रामाच्या व कृष्णाच्या भक्तित रंगलेले, तल्लीन झालेले एक सच्चे 'रामकृष्ण-भक्त' होते... आजोबा सांगायचे, "राम हा विष्णुचा 'पूर्णावतार' तर कृष्ण, हा विष्णुचा 'परिपूर्ण अथवा संपूर्ण' अवतार... रामाच्या व्यक्तित्वात काही दोष आपल्याला उघड दिसतात; पण, कृष्णाच्या व्यक्तित्वात, व्यवहारात तसा दोषपूर्ण लवलेशही कुठे आढळत नाही... म्हणून, 'अपूर्ण' अथवा दोषपूर्ण रामाला सहसा एकटा दाखवला जात नाही, ती 'अपूर्णता' भरुन काढण्यासाठी कायम तो लक्ष्मण, सीता व हनुमानासमवेतच दाखवला जातो. पण, विष्णुचा 'परिपूर्ण' अवतार असलेला कृष्ण मात्र, त्याच्या 'स्वयंभू पूर्णत्वा'ने एकटा दाखवण्याची पूर्ण मुभा आहे, तसा तो अनेकदा हाती 'सुदर्शन चक्र' घेऊन 'परित्राणाय साधुनाम्, विनाशायच दुष्कृताम्' अशा 'दुष्ट-दुर्जनांच्या संहारासाठी युद्धसज्ज असलेल्या प्रलयंकारी आविर्भावात दाखवलाही जातो... आणि, म्हणूनच गोकुळातला मुरलीवर मधुर संगीत वाजवून राधेला भुरळ घालणारा 'कृष्ण', हा तसा संगीतप्रेमी न रहाता, महाभारतातला 'युद्धसंगीत' छेडणारा 'श्रीकृष्ण' बनतो...!!!"

...असो, अयोध्येला 'राममंदिर' वगैरे बांधून रामाच्या नावावर फक्त, 'मतां'चा जोगवा' मागणारे; पण, प्रत्यक्षात जनकल्याणकारी 'रामराज्या'ऐवजी... अस्मानाला भिडलेली महागाई, बेरोजगारी-अर्धरोजगारी, बेलगाम खाजगीकरण, ढासळती अर्थव्यवस्था व भांडवली-व्यवस्थेचा दमनकारी उत्पात लपवण्यासाठी दंगलप्रवण धार्मिक-उन्मादाचं 'रावणराज्य' उभं करणार्‍या" 'लुच्च्या' रामभक्तां'ची, हिंदीतल्या 'जय सियाराम' किंवा मराठीतल्या 'जय सीताराम' ऐवजी, 'जय श्रीराम' ही घोषणा, म्हणजे एक फसवी राजकीय चाल आहे, बस्स्... त्यात, जातिवंत 'भावभक्ति' आपल्याला कुठे अभावानेच आढळेल... धन्यवाद!

....राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)


धर्मराज्य पक्ष-. P  R.O. +91 96191 89105

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com