Top Post Ad

सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी.’

 


 ‘आपला हिंगोलीत कार्यक्रम असताना पलीकडे ‘सरकार आपल्या दारी’ सुरू आहे. ‘सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी.’ हे थापा मारणारे सरकार आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. तरी, अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांच हित असणारं चिरडून टाकायचं, एवढंच काम सध्या इथले आणि दिल्लीतले करत आले आहेत,” अशी टीका शिंदे आणि मोदी सरकारवर उद्धव ठाकरे यांनी केली.  मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचं का? कोणाची दादागिरी सहन करणार नाही. पण, आपल्याच लोकांवरती उद्धटपणा करणार असाल, तर हा उद्धटपणा गाडून टाकावा लागेल,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.  हिंगोलीत आज रविवार २७ ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली आहे. गद्दाराला नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला, असा हल्लाबोलही त्यानी संतोष बांगर यांच्यावर केला.   हिंगोली हा आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघ. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर संतोष बांगर ठाकरेंच्या बाजूने होते. डोळ्यांत अश्रू आणत त्यांनी शिंदेंना माघारी बोलावलं होतं. परंतु, आयत्या वेळेला संतोष बांगरच शिंदे गटाकडे गेले. तिकडे गेल्यावर बांगरांनी ठाकरेंवर सातत्याने टीका केली आहे. आज त्यांच्याच मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला.

“काहीजणांना अपेक्षा असेल, की मी गद्दारांवर बोलेल. पण, गद्दारांवर माझा वेळ घालवणार नाही. गद्दारांचा समाचार घेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. मी हिंगोलीत तुमच्यासाठी आलोय, गद्दांरासाठी नाही. गद्दार अनेक झालेत, मात्र हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचार आणि भगव्याच्या मागे उभी राहिली आहे. आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय. मी काहीही म्हटलं तरी त्याचा बोभाटा होतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले. टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं”, असही ठाकरे म्हणाले. पण पुढे लगेचच “मी असं काही म्हणत नाही. अजिबात म्हटलेलं नाही.” अशी पुश्तीही त्यांनी जोडली. 

“मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, काल परवा मोदी अफ्रिकेत गेले होते. मोदी मणिपूरमध्ये गेले नाही तरी हरकत नाही, पण ते दक्षिण अफ्रिकेला गेले. मग मोदी तिकडे ‘प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ म्हणून गेले होते, भारत मातेचे, इंडियाचे पंतप्रधान म्हणून अफ्रिकेला गेला होतात, की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेला होतात? हे त्यांनी सांगावं. “आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून एकत्र आलो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घसरले. त्यांनी इंडियाचा उल्लेख घमेंडीया करून टाकला. ते आम्हाला घमेंडीया म्हणत असली, तर आम्हीही त्यांना घमेंडीए असं म्हणतो. ते एनडीए आहेत, पण घमेंडी, गर्विष्ट आहेत. आता जो एनडीए म्हणून शिल्लक राहिलाय त्याला काही आकार उकार, शेंडा बुडखा शिल्लक राहिलेला नाही. अमिबा नावाचा एकपेशीय जीव पोटात गेला की पोट बिघडतं. तो एकपेशीय असतो, पण त्यालाही आकार उकार काही नसतं. तो कसाही वाढत असतो, तशीच स्थिती एनडीएची झाली आहे. एनडीएचा आता अमिबा झाला आहे. यांच्याबरोबर मुळात पक्ष आहेच किती. पक्ष फोडून केवळ थिगळं लावून एनडीए उभी केली जात आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

“काहीजण बाहेर राज्यातून येत आहेत. जणू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणी वालीच नाही. एकतर त्यांच्या आणि आपल्या भाषेत फरक आहे. ‘अब आयेगी किसान सरकार’ असं घोषवाक्य त्याचं आहे. हे जे उपरे नेते येतात त्यांना सांगा, आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही. भाजपाची सुपारी घेऊन हे मते फोडण्यासाठी येत असतील, तर पहिलंच सांगतो, तुमचं घर आधी सांभाळा. कारण, तुमच्या घरात बुडाला सुरूंग लागला आहे,” अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केसीआर यांच्यावर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com