Top Post Ad

कल्याण-कसारा रेल्वेच्या तिसऱ्या मार्गिकेसाठी बुद्धभूमी फाउंडेशनची ३१ गुंठे जमीन बाधित


  कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेसाठी शहाड-आंबिवली स्थानकांदरम्यानची वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनची ३१ गुंठे जमीन बाधित होत आहे. या जमीन संपादनासाठी महसूल विभागाने फाउंडेशनला नोटीस बजावली आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्गिकेचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. या मार्गिकेची कसारा ते टिटवाळा दरम्यानची कामे जोमाने सुरू आहेत. कल्याण ते आंबिवलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्ट्या, अतिक्रमणे असल्याने महसूल विभागाला या भागात भूसंपादन करताना अडथळे येत आहेत. 

वालधुनी भागात बुद्धीभूमी फाउंडेशनची ३१ गुंठे जमीन आहे. या जागेत गौतम बुद्धाच्या ठराविक अंतराने चौथऱ्यावरील २२ मूर्ती आहेत. शंभरहून अधिक पिंपळाची झाडे आहेत. भिख्खू निवास, विपश्यना केंद्र, अभ्यासिका, विद्यार्थी निवास, धम्म साधक निवास येथे आहे. संविधान जागृती, महिला सबलीकरण अशा जनजागृतीच्या अनेक कार्यशाळा फाउंडेशनच्या जागेत घेतल्या जातात. याकरिता  फाउंडेशनच्या जमिनीला धक्का न लावता पर्यायी मार्गाने रेल्वे मार्गिका बांधावी, अशी भूमिका फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे वालधुनी भागात विस्तारित रेल्वे मार्गिकेला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेसाठी फाउंडेशनची ३१ गुंठे जमीन संपादन करण्यासाठी कल्याणचे प्रांत अभिजीत भांडे पाटील यांनी फाउंडेशनचे भदंत गौतमरत्न थेरो यांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर या जमिनीवरील बौद्ध मूर्ती अन्यत्र स्थलांतरित करण्याचे सूचित केले आहे. फाउंडेशनची जमीन खासगी आहे. ही जागा कल्याण डोंबिवली पालिकेने विकास हक्क हस्तांतरणाचा (टीडीआर) अवलंब करून ताब्यात घेतली आहे. या जमिनीचा सातबारा उतारा कडोंमपाच्या नावावर आहे. ही जमीन रेल्वे मार्गिकेसाठी खरेदी करण्यात आली आहे. या जमिनीचे दावेदार सुरेंद्र चिखले, फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. जमिनीचा ताबा कडोंमपाकडे असल्याने पालिकेला मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीसबळाचा वापर करून या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येऊ नये. रेल्वे मार्गिकेसाठी पश्चिमेची रेल्वे लगतची मोकळी जागा संपादित करावी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलीस, महसूल अधिकाऱ्यांनी करू नये. फाउंडेशनच्या जागेत मागील अनेक वर्षापासून निरनिराळे समाजउपयोगी कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यावी ” – भदन्त गौतमरत्न थेरो,  बुद्धभूमी फाउंडेशन.

“बुद्धभूमी फाउंडेनशची जमीन कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेसाठी संपादित केली आहे. या जमिनीवरील यापूर्वीची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या जागेतील बुद्ध मूर्ती फाउंडेशनने स्वत:हून काढून घेतल्या नाहीत तर त्या विधीवत समाज मंदिर किंवा पालिका कार्यालयातील मोकळ्या जागेत ठेवण्यात येतील.” – अभिजीत भांडे पाटील प्रांत, कल्याण.

कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेकरिता बुद्धभूमी फाऊंडेशनची जागा संपादित करीत असताना प्रशासनाने येथील संपूर्ण उर्वरित जागा बुद्धभूमी फाऊंडेशनच्या नावे करावी. जेणेकरून या जागेवर भविष्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील. सदर जागेवर आजही बुद्धप्रतिमा आहेत. भव्य बुद्धविहार बांधण्यात येणार आहे. तेव्हा महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने आडमुठी धोरण न घेता उर्वरीत जागेचा ताबा तात्काळ बुद्धभूमी फाऊंडेशनकडे द्यावा अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही - बाबा रामटेके (सामाजिक कार्यकर्ते-कल्याण)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com