एका महिन्यांपूर्वी सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग गावात उभारण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली. त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा प्रचंड वाद सुरु झाला. यामुळे या ठिकाणी भितीयुक्त वातावरण निर्माण झाले तसेच जाणिवपूर्वक त्रास देण्याचे प्रकार वाढल्याने सातत्याने होणारा त्रासाला कंटाळून आता आंबेडकरी समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत गाव सोडले आहे. येथील आंबेडकरी समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यामध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी झाले आहेत. घरांना कुलुप लावत बॅगा भरुन हे लोक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र, १६ जून रोजी काही गावगुंडांच्या सांगण्यावरून सदर कमान बेकादेशीर असल्याचं ठरवत ग्रामपंचायतीनं बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेने याला विरोध केला मात्र या विरोधाची कुणीही दखल घेतली नाही. बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. त्यानंतर कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बेडग ग्रामस्थांसह जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.
प्रशासनाकडून सरपंच उमेश पाटील यांच्यासह संबंधितांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांनी प्रशासनावर दबाव टाकून ही कमानी तोडण्यास भाग पाडली असा आरोप येथील नागरिक करीत आहेत. याबाबत बेमुदत उपोषण आंदोलन केले असताना देखील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. इतकेच नव्हे तर यावेळी कोणत्याही पक्षाने सहकार्य केले नाही. केवळ जनसुराज्य पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे महेश कांबळे यांनी सांगितले.
ज्या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान उभारु दिली जात नाही, त्याला विरोध होतोय आणि न्याय मिळत नाही,या भावनेतून बेडग ग्रामस्थांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. जवळपास १२५ कुटूंबातील ८०० लोक लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सांगलीमध्ये न्याय मिळत नाही, न्याय मिळावा म्हणून आता थेट मुंबईकडे लॉंग मार्च काढत निघाले आहेत. आमच्यावर अन्याय करणारे बेडग गावच आमच्या आंबेडकरी समाजाला नको व या बेडग गावातच आम्हाला राहायचे नाही बेडग गावातील वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ७० मुलांचे शाळेचे दाखले काढण्यासाठी त्या शाळांमध्ये लेखी अर्ज दिले होते. आज १८ जुलै सकाळी ८ वाजता बेडग गावातील समस्त आंबेडकरी समाज आपल्या लेकरा बाळा, गुरा ढोरांसहित, हातरून पांघरूण, भांडी , धान्य, कपडे सोबत घेऊन गाव सोडून मंत्रालयाकडे चालत रवाना झाले आहेत. बेडग गावातून दुसऱ्या गावात पुनर्वसन करावं, अशी मागणी देखील डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर स्वागत कमान बचाव कृती समिती, सांगलीचे महेश कांबळे यांनी केली.
0 टिप्पण्या