कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने खड्डे असल्याने वेळेत आपल्या गावी पोहोचताना गणेश भक्तांना वेग मर्यादेचं पालन करावं लागलं. वाहतूक कोंडीमुळे तासनतास एकाच ठिकाणी गाडी अडकून राहिल्यानं हा प्रवास चाकरमान्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला. रायगडमधील पनवेलपासून ते रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम अत्यंत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा ते संगमेश्वर तुरळ भागातील महामार्गावर अनेक खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. रत्नागिरीतील हातखंबाच्या पुढे कोके जेवठर भागात महामार्ग उघडलेला आहे.
प्रदीर्घ लांबीचा समृद्धी महामार्ग पाच वर्षात पुर्ण होतो. त्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातात. मात्र कोकणातील चाकरमण्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील 14 वर्षापासून चालू असून अद्यापही पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. कोकणातील लोकप्रतिनिधी केवळ आपआपला स्वार्थ साधण्याकरिताच संसदेत, विधानभवनात जातात काय असा संतप्त सवाल मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला. केंद्रीय मंत्री यानी में 2023 पर्यंत एक मार्गिका पूर्ण करू असे पाहणी दौऱ्यावर असताना आश्वासन दिले होते परंतु ते आभास पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले यानंतर राज्याचे मंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी देखील आज पर्यंत चार दौरे केली. मात्र कोकणवासीयांना खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीही केले नाही. 31 मे 2023 पर्यंत एक मार्गिका पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले असताना ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले व हे अपयश डोळ्यासमोर दिसत असताना 31 मे च्या एक दिवस आधी दौरा करून पुन्हा नवीन आश्वासन दिले. कोकणात पावसाचे चार महिने कोणतेही काम होणार नाही याची माहिती असताना गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करू असे खोटे आश्वासन दिल्याचे चित्र आज पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे. गणेशोत्सव काही दिवसावर असताना अद्यापही कासू ते इंदापूर या टप्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. हे काम जरी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असेल तरी मात्र तो मुंबई गोवा महामार्गाचा एक अविभाज्य घटक आहे. परंतु या टप्याचार शासन प्रशासन व ठेकेदार अद्यापही दखल घेताना दिसत नाहीत.
आजच्या सद्यस्थितीत कोकणवासिय प्रचंड मनस्ताप अनुभवत आहेत. पळस्पे ते रत्नागिरी पर्यंत अद्यापही अनेक ठिकाणी काम रखडलेले आहे. याचा त्रास वाहन चालक आणि कोकणकरांना सहन करावा लागत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी सदस्य जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सुनील शेळके, राजन साळवी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पूर्णतः असमाधानकारक उत्तरे दिली. अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे का या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी हे खरे नाही असे उत्तर देऊन हात झटकले. परंतु मागील 14 वर्षांत 3300 पेक्षा जास्त कोकणवासियांनी आपला प्राण गमावला आहे तर अनेकजण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत त्याना सरकारच्या वतीने कोणत्याही स्वरुपात मदत करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत चालू असलेले काम धीम्या गतीने चालू असून मंत्री महोदयांनी अधिवेशनात दिलेल्या माहितीच्या आधारे डाव्या बाजूची 14.5 किमी व्हाईट टॉपिंग करण्यात आलेली आहे परंतु या कामाची ऑर्डर 29 मार्च 2023 रोजीची असताना दिवसाला एक कि.मी.चे काम होणे अपेक्षित होते परंतु चार महिने उलटून देखील 14 कि.मी.च रस्ता पूर्ण न झाल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
31 में पर्यंत एक मार्गिका पूर्ण करू हे आश्वासन खोटे ठरल्याने दिनांक 7 में रोजी खारपाडा शासन-प्रशासन यांच्या निषेधार्थ बाईक रॅली काढण्यात आली तर माणगाव शहरातील अरुंद महामार्ग अडथळा ठरत असल्याने बंद असलेल्या माणगाव बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी माणगाव प्रांत अधिकारी कार्यालय पर्यंत प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली. मुंबई गोवा महामार्गात कोकणातील एकही लोकप्रतिनिधी किंवा मंत्री आपले मत किंवा प्रश्न मांडताना दिसत नाहीत. तसेच मंत्री महोदय देत असलेले आश्वासन खोटे ठरत असून डिसेंबर पर्यंत देखील महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती दिसत नाही. मात्र गणेशउत्सवाच्या काळात मोफत बस आणि गाड्या सोडून कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा नेहमीच प्रकार केला जात असल्याची चर्चाही चाकरमण्यांमद्ये रंगली होती.
0 टिप्पण्या