Top Post Ad

दीक्षाभूमी समिती मध्ये अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांच्या विरुद्ध बंडखोरी ?.


   दीक्षाभूमी समितीचे सचिव डॉ.सुधीर फुलझेले  यांचा राजीनामा आणि त्यांच्या जागी डॉ.राजेंद्र गवई यांची नियुक्ती ही बातमी धक्कादायक आहे. ही बातमी काळजीपूर्वक वाचली तर असे दिसून येते की दीक्षाभूमी स्मारक समितीचे सभासद एक होऊन सचिव आणि अध्यक्ष यांच्या विरुद्ध बंड पुकारत आहेत. संस्थेचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी डॉ.सुधीर फुलझेले यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यांनी असेही स्पष्टपणे म्हटले आहे की सचिवांच्या  राजीनाम्याला त्यांचा विरोध आहे. एवढेच नव्हे तर भदंत ससाई असेही म्हणाले की सभासदांनी बहुमताने तो राजीनामा स्वीकारला याला देखील त्यांचा विरोध आहे.  

याचा अर्थ डॉ. सुधीर फुलझेले यांचा सचिव पदाचा राजीनामा हा आरोग्याच्या कारणास्तव निश्चितच नाही. किंबहुना स्वार्थी सभासदांनी त्यांना तसे करायला भाग पाडले असावे. डॉ.सुधीर फुलझेले यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीला गैरहजर होते ही बातमी देखिल चुकीची आहे. खरे तर ते अत्यंत जवळच्या नातेवाईकाची प्रकृती गंभीर असल्या कारणाने औरंगाबादला गेलेले आहेत. समितीचे अध्यक्ष भदंत ससाई यांच्या इच्छेविरुद्ध आणि सचिवांच्या अनुपस्थितीत समितीच्या सदस्यांनी सचिवांच्या विरोधात एकत्र येऊन बैठक घेण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. औरंगाबादहून परत येईपर्यंत थांबण्याचे साधे सौजन्यही सभासदांनी दाखवले नाही. डॉ.सुधीर फुलझेले यांना पदच्युत करण्याची अचानक काय घाई झाली होती ? 

दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे बौद्ध समाजाचे प्रतिष्ठित धम्मगुरु आहेत. बाहेर देशातून येऊन त्यांनी जे धम्म आणि समाज कार्य केले ते सर्व विदित आहे. समितीच्या सभासदांना त्याची जाणीव नाही असे म्हणता येणार नाही.समितीच्या सर्व सभासदांचे एकंदर कार्य देखिल भदंत ससाई यांच्या कार्याच्या पाच टक्केही होणार नाही. तरी केवळ बहुमताच्या नावाखाली त्यांनी जे अनैतिक कार्य केले त्याची कठोर निंदा केली पाहिजे.दीक्षाभूमी समिती जरी स्वतंत्र संस्था असली तरी ती समाजाला जबाबदार आहे.दीक्षाभूमी ही सर्व जनतेसाठी अभिमान आणि आशेचे प्रतीक आहे.बहुमताच्या नावाखाली समिती मध्ये स्वार्थी लोकांचा जमाव होता कामा नये. डॉ.सुधीर फुलझेले यांच्या सचिव पदाच्या राजीनाम्याच्या बाबतीत जे काही घडले त्यातून असा निष्कर्ष निघतो की – सदर राजीनामा तब्येतीच्या कारणाने निश्चितच नाही.सचिव डॉ.सुधीर फुलझेले हे बाहेर गावी गेलेले आहेत याची संधी साधून त्यांच्या अनुपस्थितीत नवीन सचिव नेमण्याची घाई केली गेली. डॉ.सुधीर फुलझेले यांना परत येई पर्यंत थांबण्याचे साधे सौजन्य सभासदांनी दाखवू नये याचा काय अर्थ होतो ?.

   समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सदर राजीनाम्याला स्पष्ट विरोध असतांना बाकीच्या सभासदांनी त्यांची पर्वा न करता प्रस्ताव पास करुन घेतला म्हणजे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या विरुद्ध उघड उघड बंडखोरी केली असेच म्हणावे लागेल.दीक्षाभूमी समितीच्या व्यवस्थापनात जर अशी निर्णय प्रक्रिया आली तर तो दिवस दूर नाही, जेव्हा दीक्षाभूमी देखील महाबोधी महाविहाराच्या वाटेला जाईल! त्यामुळे सर्व समाजाने एकत्र येऊन दीक्षाभूमी समिती मधील स्वार्थी घटक ओळखून त्यांच्यावर नियंत्रण आणले पाहिजे. समितीचे सचिव  डॉ. सुधीर फुलझेले यांना आपला राजीनामा परत घेण्यासाठी दबाव आणला पाहिजे आणि समिती अध्यक्ष भदंत ससाई यांनी तो स्वीकार करु नये अशी विनंती केली पाहिजे. समाज संघटनांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. हे प्रकरण आता दीक्षाभूमी समिती पुरते मर्यादित नसून सर्व बौद्ध समाजाचे झालेले आहे.

प्रविण बागडे...  9923620919
जरीपटका, नागपूर
ई-मेल : pravinbagde@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com