अमली पदार्थ सेवन केल्यामुळे तुमच्यासह संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होतात. तरुणांनी अंमली पदार्थांच्या वाईट व्यसनात पडू नये असे आवाहन वांद्रे जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच.कुंभार यांनी केले. वांद्रे जीआरपी रेल्वे पोलीस आणि वसंतदादा पाटील विधी महाविद्यालयाच्या वतीने या वर्षी देखील आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अंमली पदार्थांच्या सेवनाने आणि या व्यसनाला बळी पडल्याने त्या व्यक्तीचे शरीर कायम स्वरुपी आजारांच्या विळख्यात सापडत आहे, इतकेच नाही तर यामुळे कुटुंबही उद्ध्वस्त होत आहे. या बाबत जनजागृती करण्याकरिता तसेच अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा केला जातो. यावर्षी देखील वांद्रे जीआरपी रेल्वे पोलीस आणि वसंतदादा पाटील विधी महाविद्यालयाच्या वतीने हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला
आपल्या भाषणात कुंभार पुढे म्हणाले, यावर वेळीच उपचार करून घेणे आवश्यक असून समुपदेशनानंतर बहुतेक रुग्ण बरे होतात. त्याचे व्यसनही निघून जाते. त्यासाठी नशेच्या आहारी गेलेल्या सर्व तरुणांनी वेळीच या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि आपले जीवन सुधारा असे आवाहन केले. तर सतीश शिवाडे यांनी सांगितले की, अंमली पदार्थांच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. माणसाला अपंगत्व येऊ शकते. तेव्हा अंमली पदार्थापासून दूर रहा.
नशा शरीरासह कुटुंबाला पोकळ करते, लोकांना मनोरुग्ण बनवते, यावर आधारीत नाटके दाखवून जनजागृती करण्यात आली. ड्रग्जच्या व्यसनामुळे तरुण आणि त्यांचे कुटुंबही उद्ध्वस्त होत असल्याचे नाटकाच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले. जे लोक औषधांचे सेवन करतात ते देखील नशेसाठी समान औषधे वापरतात, जी उपचारांसाठी वापरली जातात. यामध्ये निकोटीन, ओपिओइड्स, वेदना कमी करणारे आणि कफ सिरप यांचा समावेश आहे. याशिवाय लोक मॉर्फिन, कोकेन, स्मॅक, चरस, अँटीडिप्रेसंट औषधे आणि एपिलेप्सी औषधे देखील वापरतात. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांमुळे मानसिक समस्या आणि गंभीर शारीरिक व्याधी होतात. जे लोक ही औषधे सेवन करतात त्यांना हिपॅटायटीस आणि एचआयव्ही होण्याचा धोका जास्त असतो. याबाबत जनजागृती करण्यात आले.
0 टिप्पण्या