दिनांक १४/६/२०२३ रोजी अक्षय भालेराव खुन खटल्याचा रिमांडची तारीख होती. मुंबई येथील वकील विनोद गोविंद सातपुते, ॲड. प्रज्ञेश सोनावणे (ठाणे), ॲड. नितीन धांडोरे हे श्यामदादा गायकवाड यांनी पाठविलेले दोन खाजगी सुरक्षा रक्षक घेऊन नांदेड येथे सकाळी ९ वाजता हजर झाले.
स्थानिक नेते राहुल प्रधान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर, प्रशांत इंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तर मुंबईची टीम कार्यकर्त्यांच्या संपर्कात होती.साधारणपणे रिमांड हा दुपारी २:०० वाजता घेऊन येतात व दुपारीच आरोपींना हजर करतात. पण नांदेड ग्रामीण पोलिसांनी फिर्यादीला वा फिर्यादीच्या वकिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता अत्यंत गुप्तता राखत रिमांड १२:४० वा घेऊन, आरोपींना कोर्टात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली व न्यायालयाने ती पटकन मान्य ही केली. या खुन खटल्यातील आरोपींना २८ जुन पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आले आहे. एक आरोपी अद्याप फरार असताना व सदर हत्याकांडाचे धागेदोरे शोधून काढणे बाकी असतानाही पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी करणे धक्कादायक होते.सदरची बाब स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्या लक्षात आली तो पर्यंत दुपारचे २ वाजले होते.
फिर्यादी आकाश भालेराव (मयत अक्षय भालेराव यांचा मोठा भाऊ), आई वडील व इतर नातेवाईक दुपारी दोन वाजता कोर्टात आले. घडलेला प्रकार कळल्यावर त्यांनी वकील विनोद गोविंद सातपुते यांना सांगितले की, "पोलिस अधिकारी व आणखी दोन आरोपी, त्यातील एक गावतंटा मुक्ती मध्ये आहे व एक शिंदे गटातील नेता, ह्यात सामिल असुन त्यांनीच अक्षयला ठार मारण्याचा कट रचला होता". तसेच, त्यांनी अक्षयच्या हत्ये बद्दल बरीचशी अजून माहिती दिली व त्यांच्या जीवाला व त्यांना मदत करणारे वकील विनोद गोविंद सातपुते यांच्या जीवाला ही धोका असल्याचे सांगितले.
सदर बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यासाठी वकील विनोद गोविंद सातपुते यांना अक्षय भालेराव यांचे आई वडील व फिर्यादी भाऊ आकाश भालेराव व संदेश भालेराव यांनी सांगितले. त्याप्रमाणे वकील विनोद गोविंद सातपुते यांनी एक फौजदारी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. सदर अर्जात पोलिस अधिकारी व गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी व आणखी दोन आरोपींना अटक करून त्या सर्वांचे फोन रेकॉर्ड, व डिकोडिंग, ब्रेन मॅपिंग, लाई डिटेक्टर टेस्ट व नार्को, अनैलाईसी, पीडितांना स्वतःच्या संरक्षणासाठी आर्म परवाना तसेच भालेराव कुटुंबियांना व वकिल विनोद गोविंद सातपुते यांना पोलिस संरक्षण देऊन संपूर्ण केसचे न्यायालयीन कामकाज हे विडिओ रेकॉर्ड करण्यासाठी व इतर कायदेशीर मुद्दे घेऊन सदरचा अर्ज न्यायालयाने १४ जुन २०२३ रोजी दाखल करून घेतला. सदर अर्जावर दिनांक २८/६/२०२३ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुंबईतील वकिलांनी ह्या प्रकरणापासून दूर राहावे अन्यथा बदनामी करु व बघून घेऊ अशा धमक्यांचे फोन येत आहेत तर नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेते व कार्यकर्ते यांनी मुंबई येथील वकिलांवर पूर्ण विश्वास ठेवला असून त्यांना काम करण्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबईतील वकिलांची ही टीम श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सदर केसमध्ये काम करत आहे.
----------------------------------
अक्षय भालेरावचा खुन हा पुर्वनियोजित षडयंत्राचा भाग
अक्षय भालेराव ह्या बौद्ध तरूणाचा खुन हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे त्याला एकट्याला बेसावधपणे गाठून त्याच्यावर जातीयवादी गावगुंडांनी हल्ला करून त्याचा खुन केला आहे. त्यापुर्वी सुद्धा त्याला दमदाटी करण्यात आली होती आणि हे पोलिस प्रशासनाला माहीत होते. ह्या सर्व घटनांमध्ये बोंडार गावचे सरपंच, उप सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशा सर्व जातीयवादी मंडळाचा हात आहे. मात्र ह्या गावगुंडांना वाचविण्यासाठी आजी माजी मुख्यमंत्री यांच्या मार्फत प्रयत्न केला जात आहे. असा गंभीर आरोप रिपब्लिकन नेते, माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी केला आहे. बोंडार गावाजवळून हाय वे जात आहे. या हायवेलगत बौद्धवस्ती आहे. येथील जमिनीच्या किमती वाढल्या आहेत व कुठल्याही परिस्थितीत ह्या बौद्धवस्तीतील जमिनी गिळंकृत करण्याचा डाव येथील गावगुंडांनी आखला आहे. यासाठीच हा खुन करण्यात आला आहे. असेही पुढे उपेन्द्र शेंडे यांनी म्हटले
मंगळवार १३ जून रोजी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाने बोंडार गावाला भेट दिली. त्यावेळी दिवंगत अक्षय भालेराव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी अक्षय भालेराव यांच्या आई वडील तसेच शेजारी यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी गावातील सरपंच, उपसरपंच,पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हे सातत्याने दमदाटी करत होते. यापूर्वी खैरलांजी हत्याकांडात सुद्धा जमीन बळकावणे हा तिथल्या गावगुंडांचा हेतू होता. तिथे तर खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला होता तरीही हत्याकांड घडलेच हे विसरून चालणार नाही.
यावेळी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनाही ही वस्तुस्थिती सांगितली आहे.शिष्टमंडळात भाऊ निरभवणे, नानासाहेब देशमुख, प्रा. अशोक ढोले, संजीवकुमार ईखारे, चंद्रकांत रामटेके, अरुण कांबळे लोहगावकर तसेच एड शिवराज कोळीकर आदी मान्यवरांचा समावेश होता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीहि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करण्यात आली असल्याचे माहिती माहिती भाऊ निरभवणे यांनी मुंबईत दिली.
0 टिप्पण्या