प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्टसिटी ठाण्यात व्हावी ही आमची भूमिका आहे. मात्र अनधिकृत बांधकामांमुळे दिवा शहर बकाल होण्यास जबाबदार असणारे निलंबित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असा इशारा रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. शिंदे गटातील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना या भागातून भाजप थेट विरोध करत आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटणार असल्याची चर्चा दिव्यात रंगली आहे.
सोमवारी भाजपचे दिवा शहराध्यक्ष यांनी एक पत्रक काढले. दिव्यातील अनधिकृत बांधकामांसदर्भात तक्रारी देऊनही येथील बांधकामांवर कारवाई होत नाही. महापालिकेचे साहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील आणि माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या आर्थिक हितसंबंधातून दिव्यात अनधिकृत बांधकामे वाढत असल्याचा थेट आरोप मुंडे यांनी केला आहे. प्रत्येक मजल्यामागे तीन लाख रुपये घेतले जात आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे दिव्यात सोयी-सुविधा मिळत नाही. दिवा शहर बकाल होत आहे. त्यामुळे येत्या २० जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थाना बाहेर उपोषण केले जाणार आहे, असा इशारा मुंंडे यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातून आठ नगरसेवक निवडून येतात. यासाठी आता येथे जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. असे असले तरी दिवा शहरात भाजप आणि शिंदेगटात असलेले वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून दिवा शहरात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोरच भाजपकडून उपोषण केले जाणार असल्याने वादामध्ये ठिणगी पडली आहे.
0 टिप्पण्या