Top Post Ad

कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार


कल्याण भाजपच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आलेल्या दबावामुळे भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असा भाजपच्या स्थानिका नेत्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरुवारी सकाळी झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. नंदू जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस वाढत चालली आहे. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य करायचे नाही, अशी जाहीर भूमिका यावेळी घेण्यात आली. 

राज्याचे गृहमंत्रीपद भाजपकडे असतानाही एका नेत्याच्या दबावामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत असेल तर सत्ता काय कामाची, असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाठ फिरवत आहेत. कालच्या दिव्यातील कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदार सुपुत्राकडून भाजप कार्यकर्त्यांची कामे अडविण्याच्या, त्यांना अडचणीत आणण्याच्या, मंत्री रवींद्र चव्हाण यांना पाण्यात पाहण्याच्या सुप्त हालचालींमुळे ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. 

आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याच भाजपने ठरवले असून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला. आजच्या बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा संताप पाहता शिवसेना-भाजप मधील दरी खूपच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

  याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदली बाबत मागणी केली आहे. याबाबत त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलेन, बदली होणार नाही तोपर्यंत युती करणार नाही, असा ठराव झाला. मात्र त्याबाबत कार्यकर्त्यांची समजूत घातली पाहिजे ती घालू असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. आता यावर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.


दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी दुर्दैवी मृत्यू झालेल्या विश्वकर्मा यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व दिवा आगासन हा मुख्य रस्ता बंद करून त्या ठिकाणी सभा घेऊन निष्काळजीपणा करणाऱ्या आयोजक रमाकांत मढवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्र्यांची सभा भर रस्त्यात दिवा आगासन रस्ता बंद करून घेतली. यामुळे नागरिकांना चालण्यास देखील रस्ता उपलब्ध नव्हता. त्याशिवाय सकाळपासून या मार्गावरील रिक्षा बंद केल्याने नागरिकांना पायपीट करत गणेश नगर, बेडेकर नगर व आगासन या भागात चालत जावे लागले. सभेच्या ठिकाणी संध्याकाळी कामावरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी व्हावी या उद्देशाने रस्ता ब्लॉक करण्यात आला होता आणि यातूनच ही दुर्दैवी घटना घडली का? याची चौकशी आता पोलिसांनी करावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे.  भर रस्त्यामध्ये स्टेज टाकून नागरिकांची येणे जाण्याची वाट बंद केली ते आयोजक रमाकांत मढवी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, स्वतःची राजकीय ताकद दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक दिवावासीयांना वेठीस धरण्यात आले. तसेच विश्वकर्मा यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी ही रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला च्यावेळी ५५ वर्षीय रामजीयावन विश्वकर्मा यांचा घटनास्थळी खुल्या विद्युत तारेचा स्पर्श होताच वीजेचा जोरदार झटका लागला. विश्वकर्मा यांना शॉक लागताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाषण थांबवून तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वकर्मा यांना त्यांच्या मुलाने खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांचा बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com