Top Post Ad

प्रति पंढरपूर... अर्थात वडाळ्याचे विठ्ठल-रखुमाई मंदीर


 आषाढी एकादशी दिवशी वारकरी बांधव आणि माऊलीभक्त एकादशीचा उपवास करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर दुसर्‍या दिवशी तो सोडला जातो. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होते.  अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होते. या आषाढी एकादशीत वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. यात पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशकते सुरु आहे.  आषाढी एकादशी या महाएकदशी समजल्या जाणार्‍या दिवशी विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंढरपूरात दाखल होतात. परंतू ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं असे अनेक वारकरी च नव्हे तर भाविकमंडळी मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराचा रस्ता धरतात. 

वडाळ्याचे विठू माऊलीचे मंदीर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.  संत तुकाराम महाराजांच्या काळाशी संबंधीत ४०० वर्षाहून अधिक जुने असलेल्या या मंदिरात पंढरपूरहून आणलेली माऊलीची मुर्ती विराजमान आहे. म्हणूनच याला प्रतिपंढरपूर म्हणतात.  १७ व्या शतकातील वारकरी संप्रदायाचे संत तुकाराम यांच्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे,  पूर्वी मुंबई ही सात बेटांची होती. त्यातलंच वडाळा हे एक बेट किंवा गाव होतं. वडाळा प्रसिद्ध होतं ते तिथल्या मिठागरांसाठी. इथे राहणारे बहुतेक व्यापारी मिठाचा व्यापार करत. इथले व्यापारी हे विठ्ठलाचे भक्त होते आणि तुकारामांचे अनुयायी होते. एक दिवस या मिठागरात काम करणाऱ्यांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. सदर घटना व्यापाऱ्यांनी पंढरपूरला जाऊन तुकाराम महाराजांना सांगितली. या मूर्ती ज्या ठिकाणी सापडल्या तिथे विठ्ठल रखुमाई मंदिर स्थापन करण्यास तुकाराम महाराजांनीच सांगितल्याचं बोललं जातं. व्यापाऱ्यांनी एका तळ्यात भरणा टाकून विठ्ठल रखुमाईचं मंदिर स्थापन केलं.

तेव्हा इथे वडाच्या झाडांशिवाय काहीही नव्हते.  संत तुकाराम मंदिराच्या आवारात वसलेल्या एका वटवृक्षाखाली बसून उपदेश करायचे, त्यांनीच येथे प्रथम मंदिराचा पाया घातला. आजही येथे उभा असलेला हा वटवृक्ष मंदिरापेक्षा जुना असल्याचे मानले जाते.  तर काही जणांच्या मते मुंबई मधील आगरी आणि कोळी समजातील दिंडी वारीला जात असे. या वारीतील एका गुरुला पायाला दुखापत झाली असे वाटल्याने सर्वजण पाण्यात पाहू लागले त्यावेळी त्याना विठ्ठलाची मूर्ती सापडली. त्यावेळेपासून ही मूर्ती वडाळा येथे मंदिरात स्थापन करण्यात आली आहे अशी देखील आख्यायिका आहे. मुघलांकडून तोडफोड होण्यापासून वाचवण्यासाठी पंढरपूरच्या काही स्थानिकांनी मूर्ती नदीत फेकली असावी असा अंदाज काही भाविक वर्तवतात मात्र  लेखी नोंदी नसल्याने या दाव्याची पडताळणी करणे कठीण आहे. 

आख्यायिका काहीही सांगत असल्या तरी आज हे मंदिर भाविकांनी फुलून येतं. प्रत्येक वर्षी या आषाढी उत्सवाला जनसागर लोटतो. या भागाचा जसजसा विकास होत गेला, तसतसा मंदिराचा विस्तार वाढत गेला. मुंबईतल्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य नसल्यास भाविक वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.  प्रति पंढरपूर म्हणून नावारुपाला आलेल्या या मंदिरात मुंबई आणि आसपासच्या भागातील अनेक भाविक  भेट देतात. अनेक दिंड्या किंवा मिरवणुका पंढरपूरला जाण्यापूर्वी मंदिरात थांबतात. या मंदिरात देखील वर्षभर पारायण [पठण] आणि कीर्तने होतात. आषाढीच्या आधी आठवडाभर मंदिरात उत्सवाचे वातावरण असते. त्याची सांगता आषाढी एकादशीला होते. दशमीपासून भजन सुरू होऊन ते आषाढी एकादशीच्या रात्रीपर्यंत सुरू असतं. या दिवशी मंदिरात पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची गर्दी पहायला मिळते. जेरबाई वाडिया मार्गावरील मुख्य रस्त्यापर्यंत रांगा लागलेल्या असतात तर वडाळा ते दादर टीटी पर्यंत संपूर्ण मार्गाला उत्सवाचे रूप आलेले असते. प्रचंड भाविकांच्या गर्दीने हा मार्ग फुलून गेलेला असतो. प्रत्येक वर्षी गर्दी वाढत असते. पंढरपूरच्या मंदिराप्रमाणेच येथे विठोबा आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती वेगळ्या आहेत तसेच ४००० चौरस मीटरच्या मंदिराच्या परिसरात इतरही अनेक मंदिरे आहेत.

अरूणा नारायण , मुंबई वडाळा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com