संत तुकोबांसाठीच कोठून, कसे, आणि का आले वैकुंठाचे विमान

मला माहीत आहे हा विषय वादग्रस्त आहे. मला याचीही पूर्णत: जाणीव आहे की या घटनेची चिकित्सा करणे वारकरी संप्रदायालाही मान्य नाही. संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले. त्यांना नेण्यासाठी वैकुंठाहून गरूडध्वजधारी विमान आले. त्यात बसून त्यांचे वैकुंठी निर्गमन झाले अशी सर्वांची श्रद्धा आहे. गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रातील मराठी माणूस या भाकडकथेवर डोळे झाकून विश्‍वास ठेवत आहे. सोळाव्या शतकात जेव्हा युरोपात यंत्रयुगाचा प्रारंभ होत होता. वैज्ञानिक संशोधनांना सुरुवात झाली होती. पृथ्वीशिवाय अवकाशात दिसणार्‍या कुठल्याही ग्रह-तार्‍यावर सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता नाही हे जवळपास निश्‍चित झाले होते. वर कोठेही स्वर्ग, नरक किंवा वैकुंठ नावाची जागा नाही हेही शास्त्राच्या कसोटीवर सांगण्याचा प्रयत्न होत होता. त्या काळात आपल्या इथे देहूसारख्या एका खेडेगावात राहणार्‍या संत तुकारामांसाठी वैकुंठाहून विमान येते आणि त्यांना घेऊन जाते. ही घटना आपल्याला आजही खरी वाटत असेल तर आपल्याइतके बेवकूफ़ आपणच असेच म्हणावे लागेल. तुकोबांचा मृत्यू झाला नाही. म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी होत नाही. अर्थात त्यांची कुठे समाधीही नाही. 

होळीनंतरच्या धुळवडीच्या आसपास फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम बीज साजरी होते. हा तुकारामांचा वैकुंठगमन दिन. ज्या दिवशी ही दुर्दैवी (क्षमा करा) घटना घडली त्या दिवशी धुलीवंदन म्हणजेच धुळवड अर्थात धुराडी. पंचांगी परिभाषेत करीदिन होता. या दिवशी महाराष्ट्रात काय घडते हे मी सांगण्याची गरज नाही. 90 टक्के बहुजन समाज या दिवशी शुद्धीवर नसतो. त्या काळी काय परिस्थिती होती माहिती नाही, पण  नेमक्या याच दिवशी तुकोबांचे वैकुंठगमन कसे झाले? हा कोणता मुहूर्त? तुकोबांना न्यायला वैकुंठाचे विमान कोठून, कसे, आणि का आले? तुकोबांना सदेह घेऊन हे विमान नेमके गेले कोठे?

 इसवीसनाच्या कालगणनेनुसार हा दिवस 1677 च्या मार्च महिन्यातील आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज जिंजी मोहिमेवर होते, आणि युवराज संभाजी राजे तळकोकणात, चाङ्गळला. जवळपास नजरकैदेत. रायगडावर अष्टप्रधान मंडळाच्या स्वराज्यद्रोही कारस्थानांना सुरुवात झाली होती. स्वराजाचा सारा कारभार त्या काळात अष्टप्रधान मंडळाच्या ताब्यात होता. जिजाऊ माँसाहेब हयात नव्हत्या. नेमकी ही अवेळ तुकोबांसाठी काळवेळ ठरली. धर्म आणि देवाची दहशत पसरवून त्याआधारे हजारो वर्षांपासून घामाचा थेंब न गाळता उच्च दर्जाचे जीवनमान आणि रक्ताचा थेंब न गाळता सुरक्षा मिळवणार्‍या पुरोहित वर्गाची मक्तेदारी संत तुकाराम मोडून काढू पहात होते. कर्मकांड नाकारत होते. देव आणि भक्तांमधील पुरोहितांची मध्यस्थी अमान्य करत होते. दैवाधीन समाजाला कर्मवाद समजावून सांगत होते. जातीभेदाच्या भिंती गाडू पहात होते. म्हणूनच पुरोहितांना तुकाराम नकोसा झाला होता. आधी त्यांना धर्मबुडव्या पापी म्हटले गेले. त्याचा आवाज बंद करण्यासाठी गुळात शेंदूर मिसळून खाऊ घातला गेला. अंगावर उकळते पाणी टाकून खुनाचा प्रयत्नही झाला. घरावर दरोडेखोर पाठवण्यात आले. एकटा गाठून जिवघेणा हा करण्यात आला. एवढे सगळे होऊनही तुकाराम बधत-थांबत नाही हे पाहून त्यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला. देशोधड़ीला लावण्यासाठी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महसूल वसुलीचे काम बघणार्‍या कृष्णाजी अनंत चिटणीसाला भरीस घालून तुकोबांच्या घरावर, दुकानावर, शेतीवर जप्ती आणण्यात आली. तुकोबांचे दिवाळे काढण्यात आले. छत्रपती शिवरायांना हे कळले तेव्हा त्यांनी जप्त केलेल्या संपत्तीच्या चौपट नजराणा पाठवला. पण तुकोबांनी तो स्वीकारला नाही. 

तुकोबांनी लिहिले ‘आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे । प्रयत्ने करू॥ 

तुकोबांनी हेही लिहिले ‘बरे झाले देवा । वाजले दिवाळे । नाहीतरी दंभे । मेलो असतो॥ 

शिवरायांनी पाठवलेला नजराणा परत करताना तुकाराम छत्रपतींना उलट टपाली लिहितात- 
‘सोने रूपे आम्हा । मृत्तीकेसमान। 
परवीया नारी । माताभगिनी॥ 

नाही नाही ते खटाटोप आणि आटापिटा करूनही तुकारामांचे प्रबोधन कार्य थांबत नाही हे पाहून तुकारामांची गाथाच धर्मविरोधी आणि अप्रस्तुत ठरवण्याचा आणि ती इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचा अघोरी प्रयोग झाला. त्यासाठी काशीहून धर्मपीठाचार्य बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर तुकारामाला पाचारण करून शास्त्रार्थाची तर्कटचर्चा करण्यात आली. हे अर्थात ढोंग होते. तुकाराम लिहितो, सांगतो ते धर्मविरोधी आहे, हे ठरवण्याचा डाव ठरलेला होता. त्यानुसार तुकारामांचे अभंग नष्ट करण्यात यावेत असा निर्वाळा धर्मन्यायपीठाने दिला. तुकारामांनी लिहिलेले अभंगांचे संबंध बाड तुकारामांच्याच हाताने इंद्रायणीत बुडवले गेले. कारण काय तर तुकाराम कुणबी. वर्णाने शुद्र. हा शास्त्रार्थ सांगूच कसा शकतो? त्याला ज्ञानप्राप्तीचा आणि विचार मांडण्याचा अधिकारच नाही. शुद्रांचे विचार म्हणजे घोर पातक. त्यामुळे धर्मभ्रष्ट होतो. देवाचा प्रकोप होतो. म्हणून हे आक्रीत (तुकारामांचे अभंग) नष्ट केले पाहिजे. दुर्दैवाने त्यावेळी तुकारामांची बाजू घ्यायला तिथे कोणीच नव्हते. गाथा इंद्रायणीत बुडवणे हा धर्मपीठाचा न्याय होता. त्यात कोण हस्तक्षेप करणार? गाथा पाण्यात बुडाली. पण त्यातला विचार मात्र तरला. तो बुडाला नाही. कारण तोवर तो सर्वोतोमुखी झाला होता. 

सनातन्यांसमोर तुकाराम संपवण्याचा आता एकच पर्याय होता. तो म्हणजे खून. हत्या तर करायची पण त्याचे उदात्तीकरण करायचे. ही एक पद्धत आहे. तुकारामांची बदनामी, छळ करणार्‍या पुरोहितांनी तुकारामांचे उदात्तीकरण सुरू केले. तुकारामांची गाथा प्रत्यक्ष देवाने प्रगट होऊन इंद्रायणितुन  वर काढली अशी अफवा पसरवण्यात आली. तुकारामांचा छळ करण्यात अग्रेसर असणारा मंबाजी तुकोबांचा शिष्य झाला. हा षडयंत्राचाच एक भाग होता. तिथून पुढे षडयंत्राला सुरुवात झाली. विचार संपवता येत नसतील तर व्यक्तीची हत्या करायची ही सनातन्यांची परंपरा आहे. बळीराजापासून बुद्ध-महावीरांपर्यंत, आणि चक्रधर-तुकारामांपासून महात्मा गांधी-दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींपर्यंत सर्वांच्या बाबतीत हेच तर घडले. माणूस मारल्याने माणुसकी मरत नाही, आणि व्यक्तीच्या हत्येने विचार संपत नाहीत हे वारंवार सिद्ध होऊनही विचारांचा हत्याराने विरोध करण्याची सनातन्यांची भ्याड अघोरी परंपरा अजूनही चालूच आहे. मी हे एवढे निर्भीडपणे लिहितोय. कदाचीत कोणी माझ्यासाठीही एखादे हत्यार पारजायला घेऊ शकतं. पण कोणीतरी हे सांगायलाच हवं. राम-कृष्णांना नाही, व्यास-वाल्मीकींना नाही, कोण्या संत-महात्म्याला नाही. रामदास स्वामींना नाही, फक्त एकट्या तुकारामांनाच सदेह वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी कुठून ? कसे? आणि का आले वैकुंठाचे विमान? तेही 1677 मध्ये. विमानाचा शोध तर त्यावेळी लागलेला नव्हता. विमान उडवण्यासाठीचे इंधनही सापडलेले नव्हते. मग हे विमान आलेच कसे? आणि कोठून? संत तुकारामांबद्दल आदरभाव, श्रद्धा, भक्ती म्हणून आपण त्यांच्या खुनाला वैकुंठगमन म्हणायचं का? आणि त्यांचा खून करणार्‍या पाप्यांना शुद्धीपत्र बहाल करायचं का? कोणी म्हणेल इतक्या वर्षांनंतर हा वादग्रस्त विषय कशासाठी उकरून काढता. झालं गेलं विसरून जाऊया. काही लोक  असेही म्हणतील, ज्यांनी ते कृत्य केलं ते आता कोठे जिवंत आहेत? हा विषय काढून विशिष्ट जातींमध्ये तेढ वाढेल, म्हणून हा विषय नकोच. असाही सल्ला कोणी देईल. ठिक आहे. एकवेळ ही भूमिका मान्य करू. 

ज्या कोणा जातीच्या मंडळींनी तुकोबांचा खून केला त्या जातीच्या आजच्या लोकांना त्या घटनेसाठी जबाबदार धरून दोष देता येणार नाही. पण त्या प्रवृत्ती अजूनही जीवंत आहेत त्याचे काय? नसत्या तर गांधी हत्या झाली असती काय? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींच्या हत्या झाल्या असत्या काय? इतिहासातील प्रमादांना माफ़ करता येऊ शकेल पण या विकृतीचा बंदोबस्त कोणी करायचा? कसा आणि कधी? उद्या तुकारामांवर अलोट श्रद्धा असणारे वारकरीच तुकारामांचे मोठेपण खुजे करू नका. त्यांच्या वैकुंठगमनाला खून म्हणू नका म्हणून आमच्याशी भांडायला उठतील. हीच तर कमाल आहे. संतांनी सांगितलेल्या वारकरी विचाराचे वाटोळे झाले आहे ते यामुळेच. कारण वारकरी संप्रदायातही आता ‘विठोबा’, ‘ज्ञानोबा’, ‘तुकोबा’च्या नावाने आपला ‘पोटोबा’ भरणार्‍या पुरोहितांचीच खोगीरभरती झालीय. जो तो थोतांड मांडतोय. संतांचा खरा विचार कोण कोण सांगतो?

======================
रविंद्र  तहकीक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad