वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले? -श्रीकांत देशमुख


  काहीतरी अधूनमधून घडत असते. त्यातून काही वाद प्रतिवाद होतात आणि मग एकूणच दोन्ही बाजुंची खोली कळते. अलीकडे सुषमा अंधारे ज्ञानेश्वरांबद्दल काही बोलल्या(तो व्हिडियो जुना आहे म्हणतात.जुना असला तरी ते त्या आता किंवा पूर्वी बोलल्या हे सत्य आहे). मुळात ते ज्या काही बोलल्या त्यात एवढा गदारोळ करावा येवढे आक्षेपार्ह काही आहे असे मला वाटत नाही. या माझ्या मतावर कोणाला माझाही निषेध करायचा असेल तर जरूर करावा. अंधारे यांना विरोध करणारे जे कोणी तथाकथित हभप आहेत, त्यांचा बोलण्याचा सूर असा आहे की माऊलींनी खरोखरच रेड्याच्या तोंडी वेद बोलवले. भिंत चालवली. आपला प्रश्न इथेच आहे. हभप जे काही बोलतात ते सामान्य वारकऱ्यांना खरे वाटते. त्यांनाही मग वाटू लागते की तुकोबा सदेह वैकुंठाला गेले, माऊलींनी रेडा बोलता केला, भिंत चालवली वगैरे. 

मुळात अश्या अकल्पित आणि पूर्णपणे विज्ञान आणि समाजविज्ञान विरोधी काल्पनिक घटनांना वारकरी परंपरेत स्थान आहे का? याचा विचार कोणी करत नाही. मग असल्या काही बाबी या परंपरेत कुठून आल्या, हा खरा प्रश्न आहे. त्याचा शोध घेणारी आपली परंपरा बरीच दुबळी आहे. या दुबळेपणाचा व्यवस्थित उपयोग भक्ती परंपरेतील स्वार्थी लोकांनी घेतला आणि ते या परंपरेवर स्वार झाले. दिंडीत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाबड्या शेतकरी कष्टकरी लोकांवर या निवडक दांभिक लोकांनी कित्येक दशकांपासून राज्य करायला सुरुवात केली. मुळात बहुजन जाणिवेची ही भक्ती चळवळ, तिचे ब्राम्हणीकरण झपाट्याने होत गेले. ब्राम्हण ही जात या अर्थाने त्याकडे बघण्यापेक्षा वृत्ती या अर्थाने बघितले तर अधिक सोयीचे होईल. कारण या परंपरेला नीट समजून घेण्याचा प्रयत्न करणारे लोकहितवादी, रानडे, सरदार यांच्यासारखेही लोक या जातीत जन्माला आले आहेत. आणि ही बहुजनवादी भक्ती परंपरा ओलीस ठेवून तिचे सपाटीकरण करणाऱ्यांचा ब्राम्हणी स्वर कायम ठेवून तोच परंपरावादी विचार निरूपण करणारे बाबा महाराज सातारकर, इंदुरीकर असे बहुजन जातीत जन्माला आलेले लोकही आहेत. मग दोष कोणाला द्यायचा हा खरा प्रश्न आहे. 

मागे एका बैठकीच्या निमित्ताने मी, पठारे सर, कोत्तापल्ले सर एकत्र आलेलो. त्यावेळी सहज चर्चा होत असताना दोघेही म्हणाले की, 'सुजाण, बुद्धिवादी लोकांनी वारकरी परंपरेपासून दूर राहून फार मोठी चूक केली. या चळवळीचे 'भगवेकरण' होण्याला आपणही लोक जबाबदार आहोत.' भगव्या रंगाला विरोध असण्याचे कारण नाही. हिंदवी स्वराज्याचा झेंडाही भगवाच होता पण उद्देश लोकशाहीवादी होता. पण मधल्या काळात पुरंदरे यांच्यासारख्या लोकांनी हिंदवी स्वराज्याचा मूळ आशयच बदलून टाकला. आणि बराच काळ आपण 'जाणता राजा' पहात बसलो. 

रणजित देसाई असो इतर काही लेखक, तेही या दुष्ट चक्रातून सुटले नाही. या लोकांच्या लेखनातून समोर येणारा राजा हा 'केवळ हिंदुचाच' म्हणून समोर येत गेला. ही कोंडी अलीकडच्या काळात शरद पाटील, पानसरे, आ ह अश्या काही विचारवंतांनी फोडली. त्याला थोडे यशही आले. पण अजून बरेच बाकी आहे. राजकारण करणाऱ्या भ्रष्ट सत्तावादी लोकांनी अजूनही छत्रपतींना अटकेत ठेवलेले आहेच, जे सामान्यांना अजून कळत नाही. 

तात्पर्य, राजे जी कृती स्वराज्य निर्माण करताना करत होते तीच कृती तुकोबा अभंगातून, कीर्तनातून करत होते. हे अजूनही कोणाच्या नीट ध्यानी येत नाही. सदेह वैकुंठवर विश्वास ठेवणारी फार मोठी प्रचंड गर्दी दुर्दैवाने  आजही आपल्या भोवती आहे. 

आता असे बघुयात की ज्ञानेश्वर. मुळात जातीने ब्राम्हण. संन्याश्याची ही पोरं. प्रायश्चित्त घेऊनही त्यांचा वनवास सरला नाही. त्यांना छळले कोणी? याउप्परही ज्ञानेश्वरांनी संस्कृतातली भगवद्गीता प्राकृतातून आणली. या घटनेकडे आपण कसे बघणार? काळाचा विचार करता ही फार मोठी क्रांती होती. संस्कृत भाषेवरील ब्राम्हणांची मिरासदारी त्यांनी मोडीत काढली. मराठी भाषेला एक महत्तम आशय आणि अभिव्यक्तीची युगप्रवर्तक दिशा दिली. हा खरा विज्ञानवादी दृष्टिकोन होता. पण तिथे मग रेडा आणि भिंत आडवी आली. असे चमत्कार नेमके कोणी घुसडले? ज्ञानोबा देखील आपल्याला परवडणारा नाही हे समजणाऱ्या लोकांनी. या लोकांनी वारकरी परंपरेतील जनवादी आशय नष्ट करायला सुरुवात केली. त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. तीच गत महानुभाव चक्रधर स्वामी यांची झाली. अवैदिक बहुजनवादी तत्वज्ञान मांडणाऱ्या या संतांचे पलायन करणे सुरू झाले. जे आजही चालू आहे. 

तसा विचार केला तर सगळेच संत हे बहुजनवादी होते. अठरापगड जातीतले, शेतकरी परंपरेतले होते. त्यांनी कर्मवाद शिकवला, माणुसकी शिकवली. विठोबावर त्यांची अपार श्रद्धा होती तरीही त्या आडून त्यांनी माणसांचा द्वेष नाही केला. देवाला ते मानत होते तरी माणसांना नाकारत नव्हते हेही समजून घ्यावे लागेल. नामदेव, जनाबाई, चोखोबा, सावता, गोरोबा, नरहरी सोनार अशी सारी सारी नावे समोर ठेवा. यातून दांभिक अध्यात्म समोर येत नाही. केवळ मूर्तिपूजा समोर येत नाही. बुडती हे जन, न देखवे डोळा, हेच समोर येते. काळाच्या काही मर्यादाही असतील त्यांच्या लेखनात तरी देवासोबत माणूसही होताच, हे नाही नाकारता येणार. याकडे आपण दुर्लक्ष करून, टाळकुट्यांनी महाराष्ट्र बुडवला, या राजवाडे प्रणित मताकडे इथले तथाकथित बुद्धिवादी झुकले गेले. वेदप्रामाण्य नाकारणारी ही चळवळ या लोकांनी बहिष्कृत केली. बाबासाहेब हे त्याला बर्यापैकी अपवाद नक्कीच होते. तुकोबांचे अभंग ते बहिष्कृत भारत, जनता वर छापत असत. त्यांना तुकोबा कळला होता. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, भेदाभेद भ्रम अमंगळ हे पोटतिडकीने सांगणारा तुकोबा लोकशाहीवादी आहे हे बाबासाहेबांना कळले होते. तुकोबांचा हा अभंग किती कीर्तनकार आपल्या आवाजी कीर्तनातून सांगताना गहिवरून जातात? 

महात्मा जोतिराव यांनी देखील, शेतकरी जातीत जन्माला आलेला शेतकऱ्यांचा संत म्हणून तुकोबांना प्रमाण मानलेले. जोतिबा हे देखील तसे महान संतच होते, ज्यांच्या भाषेला प्रबोधनाची झळाळी होती.

या संत परंपरेतील शेवटचा खरा थोर समाजसंत म्हणजे गाडगेबाबा. गाभाऱ्यातले दगडी देवत्व नाकारणारा. माणसात देव शोधणारा. रूढी परंपरांना झाडून टाकणारा. बाबा तुकोबांचे वास्तविक अर्थाने सर्वव्यापी वारस. त्यांनाही आपण किती समजून घेतले? ग्राम स्वच्छता अभियानात त्यांना कोंबले आणि मोकळे झालो.  

तुकोबांचा वारसा सांगणाऱ्या 'कवी' 'लेखकां'बद्दलही बोलायला हवे. या लोकांनी नेमके काय केले? नेमाडे, दिलीप चित्रे, पठारे, गवस, Kishor Sanap , सदानंद मोरे (मोरेंबद्दल ते बोटचेपी भूमिका घेतात असे बोलले जाते, तरीही त्यांचे श्रेय नाकारता येणार नाही) अश्या काही लेखकांचा अपवाद केला तर काय हाती येते? काही कवी आपल्याच कवितेचे थोर निरूपण करण्यात मग्न आहेत. अगदी घसा फाटेस्तोवर ते आपणच आपल्या कवितेबद्दल ती किती महान आहे हे सांगण्यात मश्गुल आहेत. मग इतरही म्हणताहेत, तुमच्यासह तुमची कविता महान आहे. त्यांना सभोवताल काय चाललेय याबद्दल बोलायचे नाहीये. शत्रू निर्माण करायचे नाहीयेत. त्याचा परिणाम येणाऱ्या 'सुपाऱ्यांवर' होऊ शकतो. आपल्या नवटंकी भाषणातून सगळे खोटे, खरे खरे करून मग सांगता येणार नाही. हा आपला तुकोबांचा वारसा आहे? स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्यांना सदेह वैकुंठाला जाण्याची तयारी ठेवावी लागते. 

यातून निर्माण झाले ते एक कळाहीन युग. बंडा महाराज, बाबा महाराज, इंदुरीकर अश्या लोकांचे. अफाट गर्दी आणि स्वर्ग नरकाच्या गप्पा. तुकोबा सदेह वैकुंठात जाण्याचा आखो देखा माहोल, रेड्याच्या तोंडी वेद, भिंत चालवणे वगैरे. 

मुळात भक्ती परंपरा ही एक चैतन्यदायी परंपरा. ती एक लोकचळवळ होती, आहे. तिच्या या बाजूकडे आपण दुर्लक्ष केले. मूळात असलेली जनवादी चळवळ दांभिक लोकांनी हायजॅक केली आणि आपण नुस्ते पहात राहिलो. ही चळवळ केवळ महाराष्ट्र देशाची नाही. कबिरांचा विचार, चार्वाकांचा विचार मांडणारी ही चळवळ होती, आहे. आपण ते समजून घेऊ शकत नाही. टाळ मृदंगाच्या गदारोळात या चळवळीचा मूळ आशय हरवून जातो. विरोध टाळ मृदंगाच्या तालाला नाही, त्या सोबत काय सांगितले जाते याला आहे. 

सतीची प्रथा होती. सतीचे मृत पतीच्या सरणावरले आक्रोश ऐकू जाऊ नयेत म्हणून जोरजोरात वाद्ये वाजवली जायची. तिचा आकांत त्या गदारोळात राख व्हायचा. तसेच काहीसे झाले. आजही भक्ती परंपरेतील मूळ आशयाचे सती जाणे थांबलेले नाही. त्याला आपण जबाबदार आहोत. ज्ञानोबा, तुकोबांचा महाराष्ट्र म्हणवताना आपण एका चैतन्याकडे जायला हवे होते. नाही झाले.

- श्रीकांत देशमुख.

------------------------------

हिन्दू विरूध्द हिंदुत्ववादी
(छ.शिवाजी महाराजांच्या वरील हिंदुत्ववाद्यांच्या अपमानजनक वक्तव्याच्या पार्श्वभूमी वर विचार करायला लावणारी परिस्थिती)
--------------------------------------
पाखंडावर प्रहार करणारा तुकाराम हिन्दू 
त्यांचा खून करणारा मन्बाजी हिंदुत्ववादी

ज्ञानेश्वर हिन्दू 
त्यांच्या पालकांना आत्महत्या करायला लावणारे हिंदुत्ववादी

शिवाजीराजे हिन्दू
त्यांना राज्याभिषेक नाकारणारे हींदुत्ववादी

शाहू महाराज हिन्दू 
त्यांना प्राणपनाने विरोध करणारे हिंदुत्ववादी 

धर्म सुधारणा करणारे आगरकर हिन्दू
त्यांची जीवंतपणी प्रेतयात्रा काढणारे हिंदुत्ववादी

स्त्रिला उम्बऱ्याबाहेर काढणारे रानडे हिन्दू 
त्यांच्यावर दगडफेक करणारे हिंदुत्ववादी

विधवाविवाहाचे पुरस्कर्ते कर्वे हिन्दू 
त्यांच्यावर बहिष्कार टाकणारे हिंदुत्ववादी

स्त्रिला शिकवून पंख देणारे फुले हिन्दू 
त्यांच्यावर मारेकरी घालणारे हिंदुत्ववादी

इतरांना शिकवणयासाठी स्वतः शिक्षण घेणारी सावित्री हिन्दू
तिच्यावर शेणाचे गोळे फेकणारे हिंदुत्ववादी

सर्व संत हिन्दू 
त्यांना अमानवीय त्रास देणारे हिंदुत्ववादी

भाव तेथे देव मानणारे हिन्दू
कर्मकांडवर विश्वास ठेवणारे हिंदुत्ववादी

भारत एकत्र ठेवू पहाणारे हिन्दू
धर्माच्या आधारावर देश तोडणारे  हिंदुत्ववादी

हजारो वर्ष एकमेकांसोबत राहणारे हिंदू
त्यांच्यात भांडण लावणारे हिंदुत्ववादी

स्वतंत्र्यासाठी हालअपेष्टा भोगणारे हिन्दू
माफी मागून गद्दारी करणारे हिंदुत्ववादी

सर्वांना सामावून घेणारे हिंदू
सर्वांचा द्वेष करणारे हिंदुत्ववादी

प्रेमावर विश्वास असणारे हिन्दू
तिरस्करावर उभे असलेले हिंदुत्ववादी

समता मानणारे हिन्दू
विषमता पसरवणारे हिंदुत्ववादी

लोकशाही मानणारे हिन्दू
मनुशाहीचे स्वप्न बघणारे हिंदुत्ववादी

कर्मावरुन योग्यता पारखणारे हिन्दू
जन्मावरुन योग्यता ठरवणारे हिंदुत्ववादी

कर्तुतवाला वाव देणारे हिन्दू
कर्तुत्वाचे पंख कापणारे हिंदुत्ववादी

काळाबरोबर चालणारे हिन्दू
एकाच जागी अडून रहाणारे हिंदुत्ववादी

भविष्याकडे पहाणारे हिन्दू
गतकाळात डंबणारे हिंदुत्ववादी

जनतेच्या पोटाची,गरजांची काळजी घेणारे हिन्दू
फुकाचा अभिमान , गर्व , माज डोक्यात भरणारे हिंदुत्ववादी

अहिंसा रक्तात असणारे हिन्दू
हिंसेवरच विश्वास असणारे हिंदुत्ववादी

आता विश्वात्मके म्हणणारे विश्वधर्मी हिन्दू
फक्त "मि" च्या पुढे न जाणारे हिंदुत्ववादी

रामराम म्हणून अभिवादन करणारे हिन्दू
जय श्रीराम म्हणून दहशत पसरवणारे हिंदुत्ववादी 

देव धर्मावर श्रद्धा असणारे हिन्दू
देव धर्माचा वापर करणारे हिंदुत्ववादी

देव धर्मासाठी त्याग करणारा हिन्दू
देव धर्मावर लूट करणारा हिंदुत्ववादी

अडल्या नडललेल्याला मद्त करणारा हिन्दू 
अडवून नाडून लूट करणारा हिंदुत्ववादी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1