Top Post Ad

माझी १३ वर्षांची आमदारकी फुकट गेली - आ.प्रताप सरनाईक


 ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजनांचा सपाटा सुरूच असून आज रविवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक. २ येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण, पोखरण रस्ता क्रमांक. २ येथील कै.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली, घोडबंदर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.

दरम्यान,विविध कामांचे भूमीपूजन झाल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझी १३ वर्षांची आमदारकी फुकट गेली, कारण निधी मिळत नव्हता. एकनाथ शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांनाही निधी दिला आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आधी का नाही हे केलं? असा प्रश्न मला पडला आहे,  मी एकनाथ शिंदे यांना नायक चित्रपटाची प्रतिमा भेट दिली. यामध्ये एका बाजूला अनिल कपूर आणि एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याचं प्रताप सरनाईकांनी यावेळी सांगितले.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  ज्या शहरांचे रस्ते मोठे, त्या शहरांचा विकास होतो. त्यामुळेच समृद्धी महामार्ग, घाटकोपर ते घोडबंदर फ्री वे, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग तसेच इतर प्रकल्प राबविले जात आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार केला जाईल. पण, जे काम करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.  पुढच्या दोन आणि तीन वर्षांमध्ये मुंबई महापालिका खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते आणि आम्ही ते दाखविण्याचे काम केले. या कामांसाठी महापालिकेच्या मुदत ठेवीचे पैसे वापरल्याची ओरड होत आहे. परंतु चित्र तसे नाही. आमचे सरकार आले, त्यावेळेस ७७ हजार कोटींच्या मुदत ठेवी होत्या. त्यात ११ हजार कोटींनी वाढ होऊन ठेवींचा आकडा ८८ हजार कोटी इतका झाला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पावसाने हजेरी लावल्याने आपला आनंद द्विगुणीत झाला आहे. बळीराजा शेतकरी हा आपला मायबाप असून अन्नदाता आहे. त्याच्यावर कुठले संकट येऊ नये म्हणून आपण नेहमी साकडे घालतो. त्यामुळे पाऊस चांगला होईल आणि लांबलेला पाऊस पूर्ण कोटा भरून काढेल, एमएमआरडीएच्या देरर्जी प्रकल्पातील पाणी पालघरच्या प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पातून घोडबंदर विभागाला २०० दशलक्षलीटर इतके पाणी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रमात बोलताना केली. त्यावर घोडबंदरच्या वाढीव पाणयासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. या भागाला वाढीव पाणी मिळत असेल तर नक्की देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच घोडबंदरच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेमधून ३२३ कोटी रुपये मिळाले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 मुंबई आणि ठाणे शहर आता बदलत असून ठाणे शहरातील क्लस्टर योजना आता प्रत्यक्षात येणार आहे. शहरातील रस्त्यांची कामे देखील प्रगतीपथावर असून त्यामुळे येत्या काही वर्षांत शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला आपल्याला दिसेल. त्यासोबतच मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होत असून खड्ड्यांमधून लोकांना कायमचा दिलासा मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने तयार होत असलेल्या या विकासकामांमुळे शहरातील नागरिकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com