Top Post Ad

ठाण्यात प्रकल्पांचे भुमीपुजन व उदघाटनांचा धुमधडाका


   डिसेंबर अखेरपर्यंत ७५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची तयारी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी मंजूर सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी संध्याकाळी नियोजन बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना मंजूर कामे शंभर टक्के मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे येत्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विकास निधी खर्च करण्यासाठी प्रचंड धडपड सुरु झाली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर योजनेचा शुभांरभ नुकताच किसननगर येथे झाला. त्यानंतर लगेचच दिवा परिसरातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन व उदघाटनांचा बार उडाला. त्यापाठोपाठ आता ठाण्यातील विशेषत: ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन आणि लोकार्पण येत्या २५ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेने शहरात लोकोपयोगी प्रकल्पांचा धडाका लावल्याचे चित्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांच्यानिमित्ताने शिवसेना शिंदे गट शक्तीप्रदर्शन करीत असल्याची चर्चा आता ठाण्यात रंगली आहे.  येणाऱ्या निवडणुकींचा हंगाम पाहता आता रोजच काही ना काही कार्यक्रमानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाणेकरांना दर्शन देत असल्याची चर्चाही ठाणेकर करीत आहेत.  

जिल्ह्यातील शहरांमध्ये विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्याचबरोबर सुशोभिकरण तसेच इतर लोकोपयोगी प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. काही प्रकल्पांची कामे पुर्ण झाली आहेत तर, काही कामांना सुरूवात होणार आहे.  रेप्टोकोसच्या सुविधा भुखंडावर स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय, उपवन येथे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे जीमखाना, सिंधूताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कान्होजी आंग्रे संग्राहलय, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल, तरण तलाव, विविध स्माशान भुमी नुतनीकरण आणि विहिरींचे संवर्धन अशा प्रकल्पांचे भुमीपुजन होणार आहे. तर, शाहु, फुले, आंबेडकर भवन, स्वर्गीय बाबुराव सरनाईक जिम्नाॅस्टीक सेंटर तसेच इतर प्रकल्पांचे भुमीपुजन करण्यात येणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुका तसेच आगामी वर्षांत लोकसभा आणि विधानसभेच्याही निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. निवडणूक आचारसंहिता आणि निवडणुकांच्या कार्यकाळात शहराच्या विकास कामांचा पुरता बोजवारा उडत असल्यामुळे विकास निधी पडून राहण्याचा धोका उद्भवत असून असा अखर्चित निधी पुन्हा शासनाकडे जाण्याची शक्यता असते. जिल्ह्यात यंदा सुमारे १३२ कोटींचा अतिरिक्त निधी आला असताना त्याचा पुरेपूर वापर विकास कामांसाठी होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठीच या सर्व कार्यक्रमांची आखणी होत असल्याचे मत ठाणेकरांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com