Top Post Ad

खोट्या अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे मुकाबला करणे आवश्यक- राज्यपाल


 आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात त्यामुळे सत्य शोधणे कठीण जाते. खोट्या अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. विश्व संवाद केंद्र मुंबईच्या वतीने देण्यात येणारे २२ वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते ३ मे रोजी राजभवन मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाज माध्यम क्षेत्रातील १० पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र सध्याच्या युगात खोट्या आणि अनुचित बातम्या तसेच अयोग्य कन्टेन्ट दाखवण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ‘सत्य एक असते व सुजाण लोक ते वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण १९७८ साली नगरसेवक झालो तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आज माध्यम बाहुल्याच्या युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असे सांगताना वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात होते. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेबद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थी व युवकांच्या हाती योग्य व सुरक्षित कन्टेन्ट पडले पाहिजे असे मतही राज्यपालांनी व्यक्त केले. 

रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बालकृष्ण उर्फ प्रमोद कोनकर. दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, निलेश खरे, जयंती वागधरे, यूट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर यांना पुरस्कार देण्यात आले. विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com