Top Post Ad

मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज... मनोजभाई


 ह्या विश्वातील सगळ्यात पॉवरफुल चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ हीच होय आणि ह्या महाशक्तीशाली चळवळीचे महान वैभव म्हणजे सामाजिक न्यायासाठी लढणारे जगातले एकमेवाद्वितीय सैनिक म्हणजे भीमसैनिक केवळ याच आंबेडकरी चळवळीला लाभले आहेत.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी तळहातावर प्राण घेऊन लढणारे निळे कफनधारी भीमसैनिक म्हणजे आंबेडकरी चळवळीचा जगातील सर्वात मोठा खजिना आहे.ह्या आंबेडकरी चळवळीने जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे अनेक भीमहिरे जगाला दिले.

नामदेव दादा ढसाळ सारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा विद्रोह पेरणारा महाकवी ह्याच आंबेडकरी चळवळीने जगाला दिला तर जीवनाची गाणी गात प्रस्थापित व्यवस्थेला नागडे करून "आमचा वाटा कुठं हाय हो" असा जळजळीत सवाल विचारणारे महाकवी वामनदादा कर्डक सुद्धा याच चळवळीने जगाला दिले.एका विशिष्ट वर्गासाठी भूदान चळवळ राबवण्यापेक्षा "कसेल त्याची जमीन पण नसेल त्याचे काय ?" असा आर्त सवाल करीत सर्वधर्मीय - सर्ववर्गीय भूमिहिनांसाठी जमिनीचा लढा उभारणारे महान कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पासून ते भारतीय संविधान कोलून प्यालेले संविधानाचे गाढे अभ्यासक , महान कायदेतज्ज्ञ ऍड.बी.सी.कांबळे यांच्यासारखे भीमरत्न याच चळवळीच्या मुशीतून तयार झाले.विश्व कल्याणकारी समतावादी- विज्ञानवादी बौद्ध धम्मासाठी जीवन झिजणाऱ्या महाउपासिका आदरणीय मिराताई आंबेडकर याच चळवळीचं महान आभूषण आहे.

ह्या देशातल्या तथाकथित राजकारण्यांनी सत्तेपासून आणि इतर अधिकारापासून वंचित ठेवलेल्या समाजघटकाला आपला स्वतःचा आवाज मिळवून देणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा वंचितनायक याच चळवळीने वंचितांना दिला.राजकारण म्हणजे काय , राजकारण कशाशी खातात याचे राजकीय धडे देणारे राजकीय गुरू म्हणून आदरणीय रा.सु.गवई साहेब याच चळवळीचे अपत्य आहे.जगातला सर्वात मोठा लॉंगमार्च काढणारे प्रा.जोगेंद्र कवाडे सर सुद्धा याच चळवळीत घडलेत.असे एक ना अनेक भीमरत्न आंबेडकरी चळवळीने जगाला दिले.

त्यापैकीच एक म्हणजे "मनोज मार्तंडराव संसारे" अर्थात मा.मनोजभाई संसारे नावाचा अन्यायाविरोधात पेटलेला धगधगता पँथर होय.मनोजभाई संसारे म्हणजे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचे नाक होते.मुंबईमध्ये आंबेडकरी चळवळीचा जो काही धाक प्रस्थापितांना आहे किंवा होता , तो धाक निश्चितच मनोजभाई यांचा होता , हे कबूल करावेच लागेल.मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असणारे मनोजभाई म्हणजे आंबेडकरी जनतेचे रखवालदार होते. आता मुंबईतील आंबेडकरी आवाज लोप पावला आहे ,

मनोजभाई म्हणजे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचे अभेद्य सुरक्षाकवच होतं. महानगरपालिका गाजवून सोडणारी तोफ होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या शिरावर रोवलेलं स्वाभिमानी निळं निशाण होतं...... आज मनोजभाईंच्या पश्चात कोण आहे ? दूरदूर नजर फिरवली पण सध्यातरी मनोजभाईंची जागा घेणारा कोणीही दृष्टीक्षेपात दिसत नाही.मनोजभाईंच्या जाण्याने जी प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली , ती पोकळी कोण भरून काढणार ? झालेली हानी कशी भरून निघणार ? ह्या सर्वांचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असून , तोवर आपण प्रतिक्षा करूया...

भिमपँथर मा.राजेश गवळी.
आंबेडकरी साहित्यिक.
संपर्क क्र :- ९०८२८०७६३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com