Top Post Ad

हनीट्रॅप काय प्रकरण आहे?


 दामिनी मॅकनाॅट हे नाव भारतात कोणाला कदाचित माहिती नसेल.. पण या बाईने सनसनाटी खळबळ उडवून दिली होती ! कारण होते अतिशय गंभीर. थेट भारतीय सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित.. भारतीय वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे दामिनीचे नाव चर्चेत आले. रणजीत के.के. असे या अधिकार्‍याचे नाव. त्याला वायूसेनेतून बडतर्फ करण्यात आले. कारण या दामिनी बरोबर रणजीतचे फेसबुक वरून अफेअर चालू होते. हि सुंदरी फेसबुकवर रणजीतला भेटली आणि सुरु झाले त्यांचे सेक्सी संवाद. तीस वर्षाच्या रणजीतनेही 'ब्रिटनस्थित' समजलेल्या दामिनी मॅकनाॅट बरोबर तीन वर्षांपूर्वी पासून फेसबुक संबंध चालू ठेवले होते. फ्रेंडशिप रिक्वेस्ट आल्यावर रणजीत दिवस-रात्र अक्षरशः जागून स्वतःच्या कल्पनारंजनास बहार आणीत होता. कारण दामिनीने त्याच्या लैंगिक इच्छांना नेटवरूनच पुरे करायला सुरुवात केली होती.. दामिनीचे प्रोफाईल जर तपासले तर ती ब्रिटनमधील लीड्स जवळील  शहरातली आहे असे दिसते. तिने रणजितला सांगितले की ती एका शोध पत्रकारिता करणाऱ्या मासिकासाठी काम करते. तिने, भारतीय नौसेनेविषयी लिखाण करायचे आहे, हे सांगून 'लीड एयरक्राफ्ट मॅन' पदावर असणाऱ्या रणजीतला वश करून घेत माहिती गोळा केली. 

अस्खलित ब्रिटिश सुरात बोलणारी दामिनी हुशार होती. तिने छान शब्द वापरून ऑडियो क्लिप्स आणि नंतर फोटो व्हाट्सअप वर पाठवून रणजीत चे दिल जितून घेतले. पुढे जाऊन तिच्या लेखमालिकांसाठी रणजितची मुलाखत देखील ऑनलाइन घेतली. त्यामुळे रणजीतची उरलीसुरली शंकाही नेस्तनाबूत झाली. एकेदिवशी दामिनी ने आहारी आलेल्या रंजीतला ग्वालियर मधील टॅक्टिकल अँड कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट याविषयी माहिती विचारली.  ही माहिती खूपच संवेदनशील असते. त्यामुळे रणजितने ती सांगण्यास नकार दिला. त्यावेळी दामिनी चिडली आणि तिने पूर्वीची सर्व संभाषणे-फोटो-व्हिडिओ त्याला दाखविली आणि ऐकविली. आता रणजीतला कळून चुकले की पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या मधुजालात तो अडकला आहे...! त्याला ब्लॅकमेल केले जाऊ लागले आणि रणजीत माहिती देत गेला.... तो बेळगाव,चेन्नई व दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी गेला. तेथून आयएसआयला माहिती दिली. ही माहिती होती वायुसेनेच्या कवायतींची. वायुसेनेच्या विमानांच्या हालचाली व उड्डाण यांची आणि मिराज व फायटर जेट विमानांच्या तपशिलांची. सेना व पोलीस यांनी रणजीतला या कारणावरून अटक करून दिल्लीस आणले ते त्याच्यावर संशय आल्यावर पाळत ठेवल्यानंतरच! रणजित हा काही पहिलाच आधिकारी नाही जो या मधुजालात अडकला. याअगोदर सहा जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे..

 काय आहे हे मधुजाल प्रकरण?? 

मधुजाल हे एक असे जाळे आहे जे सौंदर्यवती आणि मदनिका असलेल्या स्त्रियांच्या किंवा पुरुषाच्या आधारे फेकले जाते.. आंतरराष्ट्रीय पातळीवर याला 'हनी ट्रॅप' असे म्‍हटले जाते. या खेळीत सुंदर व्यक्तीस एक काम सोपवले जाते... आपल्या सौंदर्य आणि मादकतेच्या जोरावर आपल्याला जे हवे आहे ते मिळवले जाते.. त्या व्यक्तीबरोबर सेक्स करून त्या व्यक्तीस भुलवून, मग ते ऑनलाईन असोत, टेलिफोनिक असोत नाहीतर प्रत्यक्ष असोत, ते सर्व रेकॉर्ड करून ठेवायचे आणि त्याचा वापर करून ब्लॅकमेल करायचे....आणि मग... 

आपल्याला जे हवे आहे ते मिळवायचे!!

प्रसिद्ध किंवा महत्त्वाची व्यक्ती, मग ती  राजकारणातील व्यक्ती असो,  मंत्री-खासदार-आमदार असो किंवा डॉक्टर असो किंवा शासकीय अधिकारी असो किंवा कोणीही असो....त्यांच्यासाठी मधुजाल किंवा हनी ट्रॅप हे त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे ठरते. काहीवेळा या मधूजालाचा वापर आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ आहे की नाही हे तपासण्यासाठी देखील होतो. अलीकडे असल्या काम करणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत.  या कंपन्या सुंदर स्त्रिया व देखणे पुरुष यांना नोकरीत ठेवून घेऊन आपली कामे फत्ते करतात. यासाठी ते घेतात ५० हजार रुपये. 

हे सारे आजच चालू आहे असे नव्हे. या मधुजालाला एक इतिहास देखील आहे. 'लंडन टाईम्सने' याविषयी एक रिपोर्ट चार वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी युरोपातील अनेक शासकीय कार्यालयात दिर्घकाळ नात्यात असलेले जासूस घुसवले असल्याचा दावा केला होता. हे जासूस सेक्स बरोबरच बुद्धिमत्ता आणि थ्रीलचा वापर करून लक्ष्य गाठतात. या जासूसांची हुशारी, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, त्यांची जागविली गेलेली देशभक्ती-प्रांतभक्ती-व्यक्तीभक्ती इत्यादींचा वापर हुशारीने गुप्तहेर कंपन्या करून घेत असतात.

काहीवेळा असेही घडते की प्रेमाचा किंवा सेक्सचा वापर करता करता, जासूस खरोखरच एकमेकांच्या प्रेमात अडकण्याची शक्यता दाट असते आणि तसे किस्से घडलेले देखील आहेत. पूर्व जर्मनीत असेच एक मधुजाल उघडकीस आले होते. यात जी स्त्री अडकली होती तिने आपला प्रियकर गुप्तहेर आहे हे  पुरावा दाखवूनही विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. ती हेच म्हणत राहिली की... तो माझा सच्चा प्रियकर आहे !

 मधुजालाच्या जाळ्यात संपूर्ण मीडिया सुद्धा अडकू शकते असे एक दुर्मिळ उदाहरण मधुजालाच्या इतिहासात घडले आहे. लंडनमध्ये रशियाचे राजदूत म्हणून येवगेनी इव्हानाव काम करीत होते. इव्हानाव हे अतिशय देखणे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे होते. ब्रिटिशांच्या  उच्च वर्तुळातील अधिकार्‍यांमध्ये आणि श्रीमंत वर्गात त्यांची उठबस असायची.  स्टीफन वाॅर्ड नावाच्या एका हाडाच्या डॉक्टरकडे तर त्यांची पार्टी ठरलेलीच असे! स्टीफन वाॅर्डची ख्याती अशी होती की ते लंडनमधील सुंदर स्त्रियांना पार्टीला बोलावत असत. त्यामध्ये होती एक ख्रिस्तीन किलर नावाची सुंदरी. चंचल वृत्तीची ख्रिस्तिना आणि इव्हानाव यांची भेट झाली त्यावेळचे ब्रिटिश खासदार आणि युद्धासाठीचे राज्य सचिव होते जॉन प्रोफ्युमो. हे समुद्रातील अण्वस्त्रे तयार करण्याच्या मोहिमेत होते आणि अमेरिकेबरोबर त्यांचे काही प्रोजेक्ट चालू होते.

 विशेषतः जर्मनीत ही अण्वस्त्रे कशी उतरविता येतील ही अत्यंत संवेदनशील मोहिम ते हाताळत होते. त्यांचेही किलर बरोबर अफेअर चालू होते. खरे तर प्रोफ्युमो हे विवाहित होते. त्यामुळे वृत्तपत्रांच्या हाती मोठे कोलीत मिळाले. प्रोफ्युमोचे किलर बरोबरचे संबंध वृत्तपत्रांनी सनसनाटी बातम्या देत जाहीर केले. त्यात इव्हानाव आणि प्रोफ्युमो या दोघांशी किलरने संबंध ठेवणे म्हणजे हा एक हनी ट्रॅप आहे असे सर्व वृत्तपत्राने सांगायला सुरुवात केली. या साऱ्या प्रकरणात प्रोफ्युमोना पदावरून व कामावरून जावे लागले. त्यांच्या बायकोने त्यांना माफ केले!! इव्हानावना रशियाने माघारी बोलावले. मात्र ते शेवटपर्यंत हेच म्हणत राहिले की, ख्रिस्तीन बरोबरचे त्यांचे संबंध हे लष्करी माहिती काढण्यासाठी नव्हते. हे मला पटतच नाही की प्रोफ्युमोना बेडमध्ये क्रिस्तीना विचारेल की, डिअर, जर्मनीत अण्वस्त्रे केव्हा येतील! या साऱ्या प्रकरणात मिडिया मात्र तोंडघशी पडली हे निश्चित! एका ब्रिटिश खासदाराला मात्र बळी जावे लागले !!

इंग्लंडच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार माईक हँकॉक हे ६५ वर्षाचे आहेत.  त्यांना २६ वर्षीय कॅटिया या रशियन सुंदरीने मधुजाळ्यात ओढले होते. या सुंदरीने जवळपास चार वर्षे मिलिटरीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती हस्तगत करीत राहण्याचा विक्रम केला आहे आणि ते सर्व ती रशियन दूतावासात देत राहिली.  भारतात चार वर्षांपूर्वी येऊन गेलेला 'मद्रास कॅफे' हा सिनेमा याच मधुजालावर आधारित आहे आणि यातील मधु जाळ्यात सापडलेले गृहस्थ आहेत के.व्ही. उन्नीकृष्णन.  द लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ या दहशतवादी संघटनेला  संपविण्यासाठी रिसर्च अँड एनालिसिस विंग ही भारतीय गुप्तहेर संघटना प्रयत्नात होती. राॅ चे अधिकारी के. व्ही. उन्नीकृष्णन हे यात प्रमुख होते. मद्रासमध्ये गुप्त बैठका होत. त्यांनी तामिळी वाघांशी संपर्क करण्याचा प्रयत्नही चालवला होता. १९८१ मध्ये ते कोलंबो  मध्ये होते त्यावेळी एका अमेरिकन परदेशी दूतावासातील महिलेशी त्यांची ओळख झाली.  आणि पुढे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित झाले. त्यातूनच पुढे अनेक महिलांशी संबंध प्रस्थापित झाले. कोलंबोहून  दिल्लीस काही काळ वास्तव्य करून उन्नीकृष्णन मद्रासला गेले.

 १९८५ च्या दरम्यान त्यांना एका स्त्रीचा फोन आला. तिने सांगितले की पॅन अमेरिकन या विमान कंपनीत ती काम करते. ती मुंबईत राहते. दूतावासातील त्यांची मैत्रीणीची ती मैत्रीण आहे. तिने सांगितलेय की जर तुला एकटे वाटू लागले तर तू  उन्नीकृष्णनना संपर्क कर. उन्नीकृष्णन लगेचच मद्रासहून  मुंबईस आले आणि त्या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले.  १९८५ च्या दरम्यान या नव्या ललनेने उन्नीकृष्णनना सिंगापूरचे तिकीट बक्षीस दिले. ते दोघे व तिच्या प्रियकराने सिंगापुरात अनेक ऐष केल्याचे फोटो काढले गेले. १९८६ मध्ये हे फोटो आणि अनेक आक्षेपार्ह फोटो उन्नीकृष्णन यांच्याकडे सापडले आणि मग ध्यानात आले की ते अमेरिकन गुप्तहेर संघटनेसाठी काम करीत होते. भारत-श्रीलंका यांच्यात शांतता करार होण्याच्या आधीच त्यांना अटक केली. घटनेच्या ३११(२) कलमाखाली त्यांना तिहारच्या तुरुंगात धाडण्यात आले.

 पाकिस्तान साठी भारतीयांनी हेरगिरी केली याच्यावर विश्वास बसेल का? तर त्याचे उत्तर आहे कि होय. माधुरी गुप्ता नावाच्या एका बाईने ही कमाल करून दाखवली आहे. माधुरी गुप्ता इस्लामाबाद मधील भारतीय वकालीत द्वितीय श्रेणीतील अधिकारी म्हणून काम करायची. मुबश्शीर राणा आणि जमशेद या दोघांमार्फत  आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेने पर्यंत पोहोचल्या नंतर मात्र तिने रोज रोज आहेस आयएसआयला कागदपत्र पाठवण्याचा सपाटा लावला. २०१० मध्ये हे सारे घडले. आणि भुतानमध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान भेटणार त्याच्या काही काळ आधी हे उघडकीस आले. सेजल कपूर असे नाव वापरून पाकिस्तानच्या एका हेराने भारतीय भूदल आणि वायुदलाच्या जवळपास ९८ अधिकाऱ्यांचे संगणक "हॅक" केले. हे मागील वर्षी घडलेय! या सेजल कपूर ने आपले सेक्सी फोटो अपलोड करत ब्राम्होस अस्त्राची माहीती मिळविली. व्हिस्पर आणि ग्रॅव्हीटी रॅट या व्हायरसचा वापर केला. तेही न सापडतील असे विविध इंटरनेट पत्ते वापरून! ब्राम्होसचे वरिष्ठ इंजिनिअर निशांत अग्रवाल यांना अटक झाली. 

मधुजाल आता इंटरनेटमुळे वेगवान झालेय आणि सहजपणे आपला कार्यभाग साधणारे झाले आहे!

 सुखविंदर सिंग हा नौदल अधिकारी रशियन सुंदरीच्या प्रेमात पडला आणि रशियात कामगिरीवर त्याला पाठवले होते त्यावेळी हे सगळे घडले. रशियाचे एअरक्राफ्ट कॅरियर ऍडमिरल गोर्शकोव्ह यांच्याबरोबर नौदल संबंधातील आर्थिक व्यवहारात काहीतरी काळेबेरे घडवले आहे असे आढळून आले. रवी नायर या राॅ च्या अधिकार्यानेही अशीच कमाल केली होती. 

जगभरात सर्व देशात हे मधु जाल पसरलेले आहे. हनीट्रॅप हे असे अस्त्र आहे की भल्याभल्यांना त्यात स्वतःची आहुती द्यावी लागली आहे. हेरगिरी हा एक धंदा देखील आहे. गुप्त गोष्टी विकण्याचा धंदा. या हेरगिरीत बळी पडणारे सगळ्यात जास्त जर कोणी असतील तर ते अविवाहित किंवा एकटे राहणारे. जे विवाहित होते त्यांच्या घरच्यांना त्यांच्या जोडीदाराचे मधूजाल प्रकरणे अजिबात माहिती नसतात हेही आढळून आले आहे. 

अमेरिकेतील न्याय वैद्यकीय शास्त्रातील वैद्यकीय मानसतज्ञ लेरोय स्टोन यांनी २३२ हेरांचा अभ्यास करून काही मते मांडली आहेत. त्यातील एक गंमत अशी की, हेरगिरी करायला गेले आणि प्रेमात पडून लग्न करून मोकळे झाले अशांची संख्या सुमारे ११ टक्के एवढी आहे आणि दोघेही ही हेरगिरीच्या व्यवसायात तुफान यश मिळवतात असेही आढळले आहे!! फेसबुकवर जवळपास २७० लक्ष फेक अकाउंटस आहेत. आणि यातील बहुसंख्य हनी ट्रॅप साठी वापरले जातात.

मधुजालात असताना जर लक्ष्य  असलेली व्यक्ती एखाद्या समस्येत असेल तर,  तिच्यात एखादा कमीपणा असेल तर, हेरगिरी फत्ते होते किंवा आपले काम फत्ते होते. पैसा मिळवणे  किंवा सेक्स एवढाच उद्देश हेरगिरीत नसतो. फसवणूक करायची आहे ही मानसिकता पूर्णपणे स्वीकारूनच या व्यवसायात उतरायचे असते! पैसाच केवळ देशद्रोह करण्यास भाग पाडू शकत नाही. खरे तर हेर हा सफेद झूटचा आविष्कार असतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि वास्तव राजकारण यांचे हेर हा एक प्रॉडक्ट असतो. पैसा हा हेरगिरीस उद्युक्त करतो पण तत्त्वज्ञान, धर्म किंवा सेक्स हेरगिरी पूर्ण करण्यास मदत करतात. यासाठी एक प्रकारचा बिनधास्तपणा लागतो. स्वभावाचे ज्ञानही तेवढे चांगले लागते. सतत नात्याचा राहणारा ताण सोसण्याची तयारी लागते. 

आपण सेक्स व स्वतःचे शरीर वापरत आहोत याचे भान कायम ठेवावे लागते. गुंतवणूक होऊ द्यायची नाही यासाठी आपल्याला आपल्या बरोबरच झगडावे लागते. आणि भावनांना कुठे आवर घालायचा आणि कुठे त्या स्वैर सोडायच्या याचे कौशल्य असावे लागते. मानवी नात्यांचा वापर आपण करतोय आणि कोणतेही नैतिक-अनैतिक निकष लावण्याच्या भानगडीत आपण पडू नये ही खबरदारी घेत राहणे खूपच कठीण असते. पण ते केले तरच उपयोग होऊ शकतो. असा व्यवहार कधी कधी जीवघेणा ठरू शकतो. म्हणजेच शरीर संबंध हे कोण, कधी व कशासाठी वापरेल हे सांगता येत नाही हे मात्र खरे ठरते आहे.  मोहजालात किंवा हनी ट्रॅप मध्ये अडवणारे पुरुषही असतात.. स्त्रियाही असतात आणि समलैंगिक ही असतात ! मधुजाल गल्लीत पण घडते आणि दिल्लीत पण घडते!! मधुजालाचा वापर कोण कशासाठी करेल याचा नेम नसतो. मधुजाल हे आपला व्यवसाय... आपली इज्जत आणि आपले आपले कष्ट... धुळीस मिळवणारी चाल असते...  हे ज्याला कळते तो, सुंदर पुरुष किंवा सुंदर स्त्री हवी या मोहापासून लांब राहतो. सावधगिरी बाळगतो. 

नाहीतर... सनसनाटी बातम्यांना खाद्य पुरवत राहतो !!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com