Top Post Ad

... याच खऱ्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


 डार्वीनचा सिद्धांतानुसार माकडापासून माणूस बनला,  पण सद्या भारतातील काही धर्मांध उन्मादी लोकांकडे पाहता डार्वीन पटतोय आणि, ही माणसं अजूनही ‘मर्कटा’वस्थेतच आहेत हे लक्षात येतं. म्हणूनच की काय डार्वीनचा सिद्धांतच पाठ्यपुस्तकातून काढण्याचा पराक्रम आजच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. कारण उत्क्रांतीनंतर माकडाचा माणूस झाला पण भारतात धर्मांधांच्या उचापतींनी माणसांचा माकड होताना दिसत आहे.  सद्या देशात महागाई, बेरोजगारी असे विविध प्रश्न असतानाही धार्मिक उन्मादांना खतपाणी घातले जात आहे, आणि त्यात देशातील सत्ताधारी टोळी अग्रेसर आहे.  नव्हे मागच्या दाराने पेशवाई आली की काय असे वाटू लागले आहे. या महिन्यातील काही घटना पाहिल्या तर त्यावरून हे लक्षात आल्याशिवाय रहात नाही.

 २५ लाखाच्या पुरस्कारासाठी १४ कोटींचा खर्च... इतकेच नव्हे तर ढिसाळ नियोजनामुळे त्यात अनेक निष्पापांचा बळी... त्यानंतर लगेचच पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या घरावर बुलडोझर... समृद्धी मार्गाकरिता या आदिवासींची केवळ घरेच नव्हे तर त्यांचे जगण्याचे साधनही उध्वस्त करण्यात आले... त्याची बातमी धुसर होत नाही तोवर कोकणातील रिफायनरीप्रकल्पाचे आंदोलन सर्वसामान्यांच्या जीवावर बेतले. सरकारने सरंजामी पद्धतीने आंदोलनकर्त्यांशी जो व्यवहार केला तो माणुसकीला काळीमा फासणारा आहे. अशा या सर्व पार्श्वभूमीवर जय जय महाराष्ट्र माझा... सर्व सामान्यांनी कोणत्या तोंडाने म्हणायचं असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. 

महाराष्ट्रातच नव्हे तर काही काळापासून देशातही हीच स्थिती आहे. मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश याठिकाणी बुलडोझर चढवून गरीबांच्या वस्त्या जमीन दोस्त करण्यात आल्या, पण यात मुस्लिमांबरोबर हिंदुंचीही पिसाई झाली. त्यानंतर काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमधील हिंदुची तीन देवळं पाडल्याची कोल्हेकुई करण्यात आली, प्रत्यक्षात ही देवळं भाजपाच्या ताब्यातील नगर परिषदेनेच रितसर पाडली होती. या सर्वांमुळे आपले राजकारण करण्याचा कोडगेपणा या पक्षात आणि या पक्षाच्या पाठराखण करणाऱ्या संघटनांत खचाखच भरलेला असल्याने त्यांच्या वर्तनात काहीच बदल दिसत नाही. महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या धर्मांध राजकारणाचे भोंगे अधून मधून वाजत असतात.  मात्र सत्तांतर होताच ते थंड बस्त्यात जातात.  महाराष्ट्रातील माणूस नेहमीच आपल्या विद्वतेचा आणि मराठी असल्याचा अभिमान बाळगत असतो पण आता देशात सुरु असलेल्या धर्मांध प्रदुषणात महारष्ट्राचाही सहभाग दिसणे निश्चीतच भूषणावह नाही. महाराष्ट्राच्या होणाऱ्या छीं थु ला हे धर्मांधच जबाबदार !

 महाराष्ट्र दिन निमित्ताने हा प्रश्न पडत आहे की हा महाराष्ट्र नेमका कोणाचा आहे ? या महाराष्ट्रात संत तुकोबा,  शिवाजी महाराज, महामानव ज्योतिराव फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले, त्यांनी समस्त जनतेला माणूसकीचा धर्म सांगितला, त्यांचा हा महाराष्ट्र आहे की, तुकारामांना त्रास देणारा व त्यांचे अभंग नदीत बुडविण्याची शिक्षा देणारा रामेश्वर भट, छत्रपतींवर हल्ला करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे या अविचारी नराधमांचा आहे ? महाराष्ट्र द्वेषाची भूमी बनविली जात आहे काय ? येणाऱ्या काळात महाराष्ट्राची ओळख गोडसे आदी नराधमांच्या नावाने होणार काय ? 

किरीट सोमय्यांवर हल्ला होतो तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची आठवण होते. मात्र जामिया विद्यापिठात विद्यार्थ्यांवर स्वत: पोलीसांनी हल्ला केला, जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर पोलीसांसमक्ष गुंडांनी हल्ला केला तेव्हा ही किरकिरट कुठं गेली होती. नवणीत राणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर बोंबलणारे भीमा- कोरेगाव प्रकरणी कायमच तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत. देशातल्या अनेक विचारवंत, कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा ही मंडळी गप्प का ?  हातून सत्ता गेल्यानंतर ती परत मिळविण्यासाठी धडपड करण्याचे राजकारण समजू शकते. पण राजकारणासाठी समाजकरण बिघडू देणे हे अयोग्य आहे. 

सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन केवळ भोंग्याबाबतच नाही अन्य अनेक बाबतीतही करावे लागेल, त्याबाबत कुणी बोलत नाही. या देशातील संविधान हे सुप्रिम कोर्टाच्याही पुढे आहे, याच संविधानाने देशातील सर्व धर्मांच्या, सर्व जाती-पंथांच्या, सर्व लिंगाच्या लोकांना न्यायाने वागविण्यास सांगितले आहे. 'त्याला उघडा म्हणा नाही तर आम्हीही नागडे होतो' असे म्हणणे हा न्याय नाही तर बदला आहे. अशा पद्धतीने सोयीनुसार एखादा मुद्दा उचलून आपले दुकान सुरु ठेवणे हा आता राजकारणाचाच एक भाग असल्याचे लपून राहिलेले नाही.  महाराष्ट्र दिनी सर्वांना सदिच्छा देताना एवढचं वाटतं  अशा दुकानदारी धर्मांध राजकारणाला मातीत गाडण्याची वेळ आली आहे, पेशवाई बोकाळली आहे. हे आता पालघर, बारसूच्या घटनेतून दिसत आहे. सर्वसामान्यांना धर्मांधतेच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडील जल, जंगल, जमिन हिसकावून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम ही सरंजामशाही करीत आहे. तेव्हा या धर्मांध राजकारण्यांना बाजूला करून आता तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अगदीच काही नाही तर प्रबोधनकार ठाकरें यांना अभिप्रेत महाराष्ट्र घडवण्याकरिता प्रतिज्ञाबद्ध होऊ या. याच खऱ्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ठरतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com