बंजारा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करुन १० टक्के आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे रिपब्लिकन पक्ष पाठपुरावा करेल असे प्रतिपादन रिपाइंचे महाराष्ट्रचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.
येत्या ९ एप्रिल रोजी पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाजातील विविध घटकांचा सहभाग तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या बंजारा आघाडीच्या कार्यकारिणीची माहिती देण्यासाठी आज मुंबईतील मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाच्या बंजारा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बंजारा समाजाचे जेष्ठ नेते सोमु उर्फ काम पवार यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी सोनावणे यांनी केली. तसेच बंजारा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी बाबू सिंह राठोड (कारंजा जिल्हा वाशीम) यांची नियुक्ती करण्यात आली. तर बंजारा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी शंकर सखाराम राठोड (नांदेड) महाराष्ट्र सचिव पदी दिलीप नारायण जाधव (पोहरादेवी जिल्हा वाशीम) महाराष्ट्र संघटक पदी राजेश रामधन राठोड (उमरखेड जिल्हा यवतमाळ) महाराष्ट्र उपसचिव पदी उमेश तुकाराम राठोड (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली.
रिपाई बंजारा आघाडीच्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संतोष एकनाथ पवार, उपाध्यक्ष पदी तारू सुभाष राठोड, सचिव पदी मोहन नामदेव चव्हाण, उपसचिव पदी नामदेव शिवाजी चव्हाण, संघटक पदी राजु माणीक साखरे, खजिनदार पदी गुरुनाथ डी. राठोड, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी किसन सोमु पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी गणेश बंडु चव्हाण, उपाध्यक्ष पदी दिलीप रामु चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष पदी गणेश बदरु चव्हाण, उपाध्यक्ष पदी सुरेश शंकर राठोड आदि पदाधिका-यांची अधिकृत नियुक्ती रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे आणि रिपाइं बज़ारा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोमु उर्फ कामु पवार यांनी यावेळी जाहीर केली.
मुंबईत येत्या दि. १ एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेश महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुंबईतील बंजारा समाज हजारोच्या संख्येने सामील होणार असल्याची घोषणा बंजारा आघाडीचे राज्य अध्यक्ष सोमु उर्फ कामु पवार यांनी केली.
तसेच मुंबईत बंजारा भवन निर्माण करण्याची बंजारा समाजाची मागणी असून याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून मुंबईत बंजारा भवन उभारण्यात यावे. मानखुर्द येथील सायन टॉम्बे रोडवरील ट्रॉम्बे उड्डानपुलास संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजाची असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आमच्या बंजारा समाजाला बहुजन समाजाला न्याय देणारे लोकनेते म्हणून ना. रामदास आठवले हेच आमचे आधारस्तंभ असुन लोकनेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर बंजारा समाजाचा विश्वास असल्याने आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून बंजारा समाजाला संघटीत करण्यासाठी रिपाई बंजारा आघाडी काम करेल. असे मनोगत यावेळी सोमु उर्फ कामु पवार यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या