Top Post Ad

दुर्दैवी ठरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा....


  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात दुर्दैवी घटना.
  • उष्मघाताने काही श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता.
  • अनेक जणांना उष्मघाताच्या विविध त्रासाने केले रुग्णालयात दाखल..
  • रुग्णांना वाशी मनपा, एमजिएम कामोठे आणि डी वाय पाटील नेरुळ तसेच टाटा हॉस्पिटल खारघर येथील रुग्णालयात केले दाखल.
  • रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी काही जणांचा झाला मृत्यू. 
  • मात्र अधिकृतरित्या कोणीही बोलण्यास तयार नाही.

-------------------------------------------------------------------

निर्बुद्ध लोकांचे कळप (संप्रदाय) बाळगणारे तथाकथित सद्गुरु, बाबा, संत (खरंतरं, सामाजिक-जंत) आणि बदमाष राजकारणी... यांची आतून 'हातमिळवणी' झालेली असते......म्हणूनच, त्यांच्या आपापसात सातत्याने गाठीभेटी, आदर-सत्कारसोहळे होत असतात, घडवले जात असतात. शिवाय हल्ली, भावना-संवेदना हद्दपार करुन पूर्णतया 'व्यावसायिक' (Professional) बनलेले हे सद्गुरु, बाबा, संत लोक... भांडवलदारांसारखेच वंशपरंपरेने आध्यात्मिक 'गादी' चालवताना दिसतायत... अध्यात्माचा बुरखा पांघरलेली, ही एक नवीकोरी बिनभांडवली 'दुकानदारी' नाही तर, दुसरं काय?

या धूर्त सद्गुरु, बाबा, संतांना राजकारणी 'पैसा आणि पुरस्कार (शासकीय)' पुरवतात आणि त्याबदल्यात, ते राजकारण्यांना आपल्या लाखो-हजारो शिष्यांकरवी अतिशय खुबीने 'व्होट-बँक' पुरवतात. शिवाय, 'व्यवस्थे'करवी अन्याय-अत्याचार-शोषणाचा कहर घडत असतानादेखील, सामान्य जनतेला आपल्या 'प्रवचनांच्या पोपटपंची'तून 'दैववादी' बनवून 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान' या संत तुकारामांच्या अभंगाचा 'विपरीत अर्थ' सांगत, 'षंढ आणि थंड' ठेवतात... आंदोलन-संघर्षासारख्या 'व्यवस्था-विरोधा'ला पूर्ण फाटा देण्याची शिकवण देत (अशा संप्रदायांतून 'कोर्ट आणि पोलिस स्टेशनची पायरी कधि चढू नये', समस्या-निवारणासाठी संघर्ष करण्यापेक्षा व्यवस्थेला 'शरण' जाऊन परिस्थिती बदलण्यासाठी प्रार्थना, जपजाप्य, रामनामाची लिखापढी, देवदेवळं-पूजाअर्चा या सगळ्याचं अवडंबर माजवायची समाजघातकी शिकवण देतात) जीवनमरणाच्या प्रश्नांवरुन जनतेच्या संतप्त उद्रेकाची 'संभाव्यता'... जपजाप्य, प्रार्थना, देवदर्शन अशा भुक्कड आणि भाकड माध्यमांतून कौशल्याने थंड बस्त्यात ठेवतात... सद्गुरु, बाबांकरवी, हा एक मोठा आनुषंगिक फायदा (खरंतरं बोनसच), एकूणच 'व्यवस्थे'ला आपसूकच कायमचा मिळत रहातो.

येनकेनप्रकारे निवडणुका जिंकण्यात 'प्रवीण' झालेला प्रस्थापित 'राजकारणी शासकवर्ग' आणि हे असले ढोंगी संप्रदायी 'सद्गुरु-बाबा-संत'... या दोन्ही वर्गातल्या, डँबिस लोकांची अर्थपूर्ण अभद्र-युती... मूर्ख, भोळसट, अज्ञानी बहुजन समाजाला आतून पोखरुन साफ 'खिळखिळा' करुन ठेवते आणि मग त्या संपूर्ण समाजपुरुषाचा 'खुळखुळा' वाजवत निर्वेध सत्ता गाजवणं, या 'रक्तपिपासू-शोषक व्यवस्थे'ला (Vampire-State System) खूपच सोप्पं जातं !!!

डझनावरी सेवकांचे (श्रीसदस्य) उष्माघाताने प्राण गेल्यानंतर तरी बैठक-संप्रदायाला व इतर पंथीयांनाही 'जागतिक तापमानवाढ' या विषयावर जाग येणार आहे का... की, फक्त 'झाडलोट, वृक्षारोपण' यावरच त्यांचा अल्पस्वल्प, र्‍हस्व स्वरुपाचा निसर्ग-पर्यावरणवादी  दृष्टिकोन, असाच याहीपुढे मर्यादित रहाणार आहे? वृक्षारोपण, ही सद्य गंभीर पर्यावरणीय स्थितीत, निसर्ग-पर्यावरण संरक्षण-संवर्धनासंदर्भात फारच बोटचेपी व प्राथमिक स्वरुपाची भूमिका आहे... ज्याचा, फारसा उपयोग 'जागतिक तापमानवाढ' तसेच, 'जागतिक हवामानबदल' रोखण्याकामी होण्यासारखा नाहीच!

भांडवलशाही अर्थव्यवस्था व त्यातील चंगळवादी जीवनशैली आणि त्याद्वारे, होणाऱ्या 'कार्बन-ऊत्सर्जना'वर हा बैठक-संप्रदाय निदान यापुढे, 'मूले कुठारः' अशी मूलगामी भूमिका घेऊन 'व्यवस्था-विरोध' करण्याचं धैर्य (जे केवळ, जातिवंत व सच्च्या आध्यात्मिक भूमिकेतूनच येऊ शकतं व जे आपल्या यच्चयावत संतांनी कायम त्या त्या वेळी दाखवलेलं आहे... संतत्वाची तिचं खरी परीक्षा होय) दाखवणार आहे की, शासकिय-पुरस्कार प्राप्ति अथवा दिवसागणिक वाढती बैठक-सभासदसंख्या वगैरेंमधून येणाऱ्या 'आत्ममग्नते'तच रमणार आहेत?

भारतातलं सोडाच, पण महाराष्ट्रभरात अनेक निसर्ग-पर्यावरण उध्वस्त करणार्‍या शेकडो शासकीय-योजना गेल्या काही दशकांत अंमलात आल्या (आरे काॅलनीसह असंख्य प्रकल्पग्रस्त ठिकाणी बेसुमार वृक्षतोड यापूर्वीच झालीय आणि शेकडो वर्षांचे महाकाय लाखो वृक्ष ग्रेट निकोबार प्रकल्पात तोडले जाणार आहेत) आणि अजूनही येतील... पण, अशा कुठल्याच ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग (यांनी तर, आपल्या निव्वळ शिबारासाठी यमुना-तीरावरची मोठी हिरवाई साफ उध्वस्त केली होती), स्वाध्याय परिवार, जीवनविद्या मिशन, प्रजापिता ब्रह्मकुमारी किंवा बैठक-संप्रदाय अथवा अनेक साईबाबा-बाबाजी पंथवाले... निसर्ग-पर्यावरण उध्वस्त करु पहाणार्‍या व्यवस्थेला चुकूनही ठाम विरोध करताना कधि दिसत नाहीत, या दुर्दैवाला काय म्हणावं? 

भांडवलशाहीतील नफेखोरी, निर्ममता, नृशंसता, निसर्ग-पर्यावरणाप्रति असलेली बेपर्वाई-बेफिकीरी आणि त्यातील वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे निसर्ग-पर्यावरणावर होत जाणारे अपरिवर्तनीय व महाविध्वंसक आघात... यावर, कधि थबकून, मूलतः विचार व कृति, हे तथाकथित धर्मसंप्रदाय करणार आहेत... की, जीवन-मरणाला थेट भिडलेले हे अतिशय महत्त्वाचे विषय, फक्त सत्तापिपासू, अंध, अज्ञानी राजकारण्यांच्याच हाती सोपवणं, त्यांना फार सोयीचं वाटतं? 

...आजच्या पर्यावरणीय महासंकटकाळात  तथागत बुद्ध, राम-कृष्ण, महावीर, येशूख्रित, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, , रामकृष्ण परमहंस, गुरु नानक, महंमद पैगंबर वगैरे प्रभृतिंनीच काय पण, शिवछत्रपती, विवेकानंदांसारख्यांनी कुठली भूमिका घेतली असती? ते काय 'व्यवस्थेच्या हातात हात घालून' निरर्थक निरुपण, जपजाप्य, प्रार्थना करत बसले असते की, (भांडवली-व्यवस्थेतील मानवी-शोषण, अन्याय-अत्याचार वगैरे सोडा) मानवजातीवरचंच नव्हे; तर, पृथ्वीतलावरील अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या मूळावर आलेली ही पर्यावरणीय महासंकटं पाहून, त्यांनी काही ठाम भूमिका घेत जनजागृती केली असती? त्यांनी निश्चितच मूलगामी चिंतन-मनन करुन तत्कालीन कुठल्याही 'व्यवस्थे'ची (मग, ती कितीही जाढ्य, ताकदवान अथवा दमनकारी असो) तमा न बाळगता, विश्वकल्याणकारी अशी, योग्य ती कठोर भूमिका घेतलीच असती ना? ...मग, या पार्श्वभूमीवर आपण नेमकं काय करतो आहोत... स्वतःचं स्वतःला फसवतोय की, समाजाचं फसवं समाधान करतोय... याचा गांभीर्याने विचार, या दुर्दैवी मनुष्यहानीच्या करुण पार्श्वभूमीवर व्हावाच!

बहुजनांना 'दैववादी' (प्रयत्नवादी, संघर्षवादी नव्हे) बनवणाऱ्या तथाकथित धर्मसंप्रदायांमध्ये... धंदा-व्यापार, कारखानदारीच्या पावलावर पाऊल ठेऊन 'घराणेबाजी' मागच्या दाराने सर्रास घुसलेली दिसते, हे अस्वस्थ वर्तमान आहे... आमच्या कुठल्या जाज्वल्य संतांचे  पुत्र-पौत्र त्यांची 'संत-परंपरा' वंशावळीने चालवताना कधि दिसले? अशाच 'घराणेबाजी'ग्रस्त पंथप्रमुखाचा (ही दुसरी पिढी... तर, तिसरी पिढी लगोलग गादीवर बसायला विंगेत तयार उभीच) सत्कार कोण करतंय... तर, जे रोज उठसूठ 'घराणेबाजी'विरुद्ध भंपक बाता मारत देशभर फिरत असतात; पण, ज्यांचा पुत्र कुठलीही खास योग्यता स्वतःची नसताना वा कुठलीही विशिष्ट परीक्षा न देताच, BCCI चा अध्यक्ष झालेला असतो... 

दोस्तों, बात कुछ जचती नहीं!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष

,,.....................

 गृहमंत्री अमित शहा, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्याच बरोबर उपस्थित मंत्री आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी लोकांना एकत्रित करून प्रचंड उष्ण वातावरणात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात सहभागी करून घेत त्यांच्या आरोग्याची काळजी न घेता, डी hydretion होवून मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून सामूहिक हत्याकांडास जबाबदार धरून मानव हक्क आयोग आणि उच्च न्यायालयाने किंवा सू moto गुन्हा नोंदवून शिक्षा द्यावी 

@प्रा. चंद्रभान आझाद शिवसेना ठाणे प्रवक्ता 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com