भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचा विवाहसोहळा भायखळा येथील हबीब मच्छी मार्केट मध्ये झाला होता. हबीब मार्केटमध्ये यांच्या आठवणी आहेत. यामुळे या ठिकाणी मोठं स्मारक व्हाव, अशी मागणी आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक ज.वी पवार यांनी केली आहे. याबाबत निवेदन जारी केले असून त्यात त्यांनी स्मारकाची मागणी केली आहे. दिनांक 4 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला होता. त्याच्या स्मृती जपण्याकरिता आज या ठिकाणी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
बाबासाहेबांवर सुमारे शंभर लेखकांनी वेगवेगळ्या भाषेत आणि दृष्टिकोनातून चरित्रे लिहिली असून माता रमाईंवर जवळपास वीस पंचवीस पुस्तके लिहिण्यात आली आहेत, परंतु एकाही चरित्रकाराने बाबासाहेब- आईसाहेब यांच्या विवाहाची तारीख व विवाहाचे स्थळ दिलेले नाही. बाबासाहेबांनी आपले आत्मचरित्र ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या नावाने अपूर्ण दिले असून त्यातही त्यांनी आपल्या विवाहाची वेळ, तारीख, स्थळ याबद्दल लिहिले नाही. एवढेच नव्हे तर बॅरिस्टर असलेल्या बाबासाहेबांना विवाह नोंदणी कायदा माहित असून त्यांनी आपला विवाह नोंदविला नाही. मी संशोधक नाही परंतु रमाईची जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तारीख व विवाह स्थळ या तिन्ही प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मी शोधली याबद्दल मी माझी पाठ थोपटत आहे, अस ज वी पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
मी रमाईंची जन्मतारीख 7 फेब्रुवारी 1897 शोधल्यामुळे आज जगभर त्यांची जयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेबांचा विवाह हा 4 एप्रिल 1906 रोजी झाल्यामुळे तो दिवसही काही प्रमाणात साजरा होत आहे, परंतु विवाह स्थळाबद्दल तसे होताना दिसत नाही. मुंबईतील भायखळा पश्चिम विभागातील सुंदरगल्ली जवळील हबीब या मासळी बाजारात रात्री हा विवाहसोहळा पार पडला.याचा सविस्तर पुरावा मी माझ्या बाबांची रामू या पुस्तकात दिला आहे. बाबासाहेबांचे पाय ज्या ज्या मातीला लागले तेथे तेथे त्यांची स्मारके उभारली जात आहेत. पण विवाह सारखे अत्यंत महत्त्वाचे स्थळ नाकारले जात आहे. आणि म्हणून माझी महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महानगरपालिका व जनतेला विनंती आहे की हबीब मार्केट येथे उचित स्मारक व्हावे, अशी ही त्यांची मागणी आहे.
0 टिप्पण्या