भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जबरदस्त रणनीती आखली आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी मराठा समाजाचे नवे नेतृत्व पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून मराठा नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे धाडस त्यांनी केले होते. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता असल्याने हा आक्रोश रोखण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठा समाजातील नव्या नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दिल्लीश्वरांच्या या आशीर्वादामुळे भाजपचे नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मराठा समाजातील नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे समर्थन करून भाजपने त्यांना राज्याच्या प्रमुखपदी बसवले. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विकासकामांचा धडाका लावला. गतिमान सरकार अशी जाहिरात करून सर्वसामान्य जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सगळे प्रयत्न करूनही शिंदे यांना जनमानसात प्रतिष्ठा निर्माण करता आली नसल्याचे चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. त्यातच काही काळापूर्वी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपश्रेष्ठींनी आता एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून महाराष्ट्रात मराठा समाजातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर पुढील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नव्या नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील राज्यसरकारची याचिका नुकतीच फेटाळून लावल्यामुळे मराठा समाजात सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असला तरीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे त्यातून समाधान झाले नाही. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये वाढत चाललेली नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडाला उघडपणे समर्थन दिल्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली असून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना या सहानुभूतीचा फायदा मिळू नये, यासाठी भाजपने रणनीती आखलेली आहे.
0 टिप्पण्या