Top Post Ad

ठाणे स्मार्ट सिटी... आजही आगीच्या उंबरठ्यावर


  ठाण्यातील प्रगत अशा घोडबंदर मार्गावरील सिनेवंडर मॉलच्या शेजारी असलेली ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास भीषण आग. मात्र ही  भीषण आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशामक दल अपयशी ठरली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खासदार राजन विचारे यांनी आज ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्राद्वारे महापालिका हद्दीतील सर्व इमारतींचे फायर ऑडिट व मॉक ड्रिल करण्याची मागणी केली आहे. केवळ एखादी आगीची घटना घडली की त्यावेळी इमारतींच्या फायर ऑडिटचा विषय चर्चेला येतो त्यानंतर ठाणे महानगर पालिका काही दिवस कारवाईचा बागुलबुवा करते आणि काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे असते.

ओरियन बिझनेस पार्कला लागलेल्या आगीच्या वेळी खासदार राजन विचारे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमक दल प्रयत्न करीत होते. परंतु आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अपुरा रस्ता असल्यामुळे आग विझवण्यात त्यांना यश येत नव्हते. अग्निशामक दलाच्या ब्रँट्रो गाड्या असल्याने या गाड्यांसाठी एकावेळी तीन पाण्याच्या टँकरची आवश्यकता असते. परंतु अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ते शक्य होत नव्हते. ठाणे शहर हे तलावांचे शहर असताना अशावेळी तलावाचे पाणी कसे वापरात आणता येईल हेही अधिकाऱ्यांना सुचले नाही. 

ठाणे शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने जात असताना ठाणे महानगरपालिकेच्या अपुऱ्या यंत्रसामुग्री व नियोजन अभावी तसेच इमारतींना परवाना देतेवेळी अग्निशामक दलाने फायर ऑडिट न करता शहर विकास विभाग परवाना कसा देऊ शकते यावर खासदार राजन विचारे यांनी संशय व्यक्त केला आहे. सदर आग विझविण्यासाठी अखेर ठाणे महानगरपालिकसोबत, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली व मीरा-भाईंदर या पाच महापालिकेची व एअर फोर्सची मदत घ्यावी लागली.

या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागलेली छोटीसी आग विजविण्यास 11 तास लागले त्यामुळे हा वणवा पेटतच गेला. व पाचव्या आणि चौथ्या मजल्यावर 23 कार्यालय, तीन कार व 23 दुचाकी व इतर आगीमध्ये जाळून खाक होऊन लाखोचे नुकसान झाले आहे. दुर्दैवाने मनुष्यहानी झाली नाही. पोलिसांच्या दक्षतेमुळे 200 ते 250 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. खा.विचारे यांनी दिलेल्या पत्रात अवघ्या एका आगीमध्ये अग्निशमन दलाची तारांबळ उडाली असल्याने महापालिका क्षेत्रात भीषण आग लागल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हा प्रश्न आता नागरिकांना सतावत आहे. असे पत्रामध्ये म्हंटले आहे. 

वागळे इस्टेट भागात सर्वात जुनी औद्योगिक वसाहत आहे. या भागात आयटी पार्क आहेत. हजारो कामगार या ठिकाणी कामानिमित्ताने येत असतात. व्यवसायिकांची कोट्यवधीची उलाढाल येथे होत असते. अशाप्रकारची आग या भागात लागल्यास आपण किती तत्पर आहात ? घोडबंदर रस्ता हा तुलनेने अरुंद आहे. या ठिकाणी आग विझविण्यास नाकी नऊ आले. तर अशा गर्दीच्या, लोकवस्तीच्या ठिकाणी आग कशी आटोक्यात आणाल? असा सवाल खासदार राजन विचारे यांनी महापालिका प्रशासनाला केला. तसेच शहरात टोलेजंगी इमारती बांधण्यास परवानग्या दिल्या जात आहेत. २०/२५ मजली इमारती शहरात बांधल्या जात आहेत. या इमारतींना अग्निशमन दलाच्या परवानग्या असतात का? इमारती उभ्या राहत आहेत परंतु या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली रचना याचे पालन व्यवस्थित रित्या न झाल्याने या घटना वारंवार ठाणे शहरात घडत आहेत.


  एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी तुम्ही ठोस उपाययोजना राबवावी, अन्यथा एखादा अपघात घडल्यास हे सरकार, प्रशासन जबाबदार असेल असे खासदार राजन विचारे यांनी ठणकावून सांगितले. तसेच नुकताच ५० मजली इमारतींना हि परवानगी दिल्याचे समजले आहे. आपण ठाणे महानगरपालिका हद्दीत किती इमारतींच फायर ऑडीट आत्ता पर्यंत केले आहे याची माहिती तसेच ठाणे शहरात असलेले व्यापारी संकुल, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, तसेच दाट लोकवस्ती असलेल्या इमारतींचे फायर ऑडीट आणि मॉक ड्रिल करून घेण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com