Top Post Ad

मरावे परी ! चेक रुपी उरावे


   उष्माघाताने मेलेल्या प्रिय भक्तजनहो,
तुमच्या मरणाचा हेवा वाटतो 

भक्तांनो,

 प्रत्यक्ष रामाचा,समर्थांचा जयजयकार सुरू असताना आणि व्यासपीठावर राममंदिराचे निर्माते मौजुद असताना, सावलीतून सद्गुरू  उन्हातल्या भक्तांकडे कृपादृष्टीने  बघताना मृत्यू येणे या भाग्याचे काय वर्णन करावे ? आपल्या धर्मात धार्मिक तीर्थस्थळी मृत्यू येण्याला विशेष महत्व आहे आणि सद्गुरू चरण हे तीर्थ क्षेत्रापेक्षा नक्कीच कमी नसतात..तेव्हा त्या चरणाशी आलेल्या या मृत्यूने तुम्हाला मोक्षापर्यंत पोहचवले असेल याबद्दल तुम्ही आनंदी असायला हवे.' *मरे एक त्याचा दुजा शोक वाहे* ' म्हणणाऱ्या समर्थांच्या  तुम्हा भक्तांना मृत्यूचे मुळातच काही वाटत नसेल..त्यामुळे असा मृत्यू येणे हे पूर्वजन्मीचे पुण्य...

पूर्वी सद्गुरू भक्तांची वेगवेगळी परीक्षा घ्यायचे. रामदासांनी कल्याण भक्ताच्या अशा परीक्षा घेतल्या. तुमच्या सद्गुरूंनी ४२ डीग्रीत तुमच्या भक्तीची आणि सत्संगाची परीक्षा घेतली आणि त्याचे तुम्हाला मोक्षाचे बक्षीस मिळाले...या तुमच्या निष्ठेला कोणता भूषण पुरस्कार द्यावा याचा मी विचार करतोय... मिडिया ला आणि विरोधकांना या अध्यात्मिक मृत्यूचे मूल्य कळत नसल्याने ते आरडाओरडा करताहेत पण त्याकडे आपण दुर्लक्ष करू या..

  गर्दी का जमवली ? असे विचारताहेत..मुळात  इथे हमखास गर्दी जमेल म्हणून तर हा पुरस्कार दिला.. *ओहोटी लागलेल्या लोकप्रियतेला तेवढीच भरती येईल* एवढाही समर्थांच्या भाषेत' *रोकडा विचार* ' करायचा नाही का ?  आमच्या राष्ट्रीय नेत्यांना असली दुसऱ्यांची रेडिमेड गर्दी दाखवली तरच  ते आम्हाला पदावर ठेवतील इतकेही का मिडीयाला कळत नसेल ? मांडव का टाकला नाही ? असे प्रश्न नतदृष्ट विचारत आहेत. प्रभू राम हे *सूर्यवंशातील* असताना त्यांच्या भक्ताला पुरस्कार हा सुर्यनारायणाच्या साक्षीने द्यायला नको का ?

मुळात या देशात गर्दीत झालेला हा का तुमचा पहिला मृत्यू आहे ? भाजपाच्या मीडिया सेल ने रात्री जागून काँगेस काळात कुठे कुठे लोक गर्दीने मेले ही आकडेवारी  काढलीही असेल... अगदी १९९४ साली चेंगरून मेलेले ११३ गोवारी, २००५ साली मांढरादेवी यात्रेत चेंगरून मेलेले  १०० यात्रेकरू असतील. तेव्हा या राज्यात काँग्रेस चे सरकार होते.. त्या  मानाने तुमची संख्या खूपच कमी आहे..तेव्हा मीडियाची चिंता करू नका..

तुमच्या मृत्यूबद्दल राजीनामे मागितले जात आहेत...यावर अमितजी खूपच हसले असतील.

 गुजरात दंगलीतील २००० मृत्यूविषयी जिथे राजीनामे झाले नाहीत.

तिथे या असल्या क्षुल्लक आकड्याविषयी राजीनामे कुठे देतात का ? आणि असल्या गोष्टींचा सरकार निवडणुकांवर काहीही परिणाम होत नसतो. मोरवी च्या पुला ची दुर्घटना घडली. तेव्हा तर अगदी निवडणुका सुरू होत्या..असेच विरोधक बोंबलले,परिणाम इतकाच झाला की पूर्वीपेक्षा जास्त जागा आल्या

.त्यामुळे या देशातील सामान्य माणसांच्या मरणाने इथल्या सत्तेवर काहीही परिणाम होत नाही. गाडी चालवताना कुणाला धक्का लागला तर गुन्हा दाखल होऊ शकतो पण समूहाने माणसे मेली तर गुन्हा कोणावरच दाखल होत नसतो.. गुन्हा जर दाखल करायचा असेल तर आपण आग ओकणाऱ्या सूर्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिग ने उष्णता वाढवणाऱ्या युरोपीय राष्ट्रांवर केला पाहिजे..

इतकी माणसे मरून सुध्दा लाखो भक्तातून किंचितही संताप व्यक्त होत नाही,सन्नाटा आहे हीच आपल्या अध्यात्माची ब्युटी आहे. जर जीवनात आनंदी काही घडले. तर ते सद्गुरूंच्या कृपेने आणि जर आपण मेलो तर ते आपल्या पूर्वजन्मीच्या पापाने...हा *आउटलेट* कर्म सिद्धांताने दिल्यामुळे सद्गुरू आणि त्यांना पुरस्कार देणाऱ्यांना आध्यात्मिक क्लीनचीट आपोआप मिळाली...त्यामुळे सर्वत्र पुरस्काराचे ' निरुपण' सुरू आहे...तुम्ही मोक्षपदाला गेल्यावर आम्ही तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले नाही. आम्ही तुमच्या कुटुंबाला ५ लाख रुपये दिले आहेत. इतकी मोठी रक्कम तुम्ही गरिबांनी जिवंतपणी कमावली तरी असती का ?  कुटुंबाला तुम्ही मरून जी मदत केली त्याबद्दल तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी आनंदी असायला हवे.. ज्या समर्थांचे तुम्ही सेवक होतात.  ते समर्थ यांचेच शब्द बदलून म्हणावे वाटते

 " *मरावे परी /चेकरुपी उरावे.....//* 

 *हेरंब कुलकर्णी*

-----------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1