Top Post Ad

धन समर्पण द्या आम्हाला ... निरूपण, प्रवचन तुम्हाला !

कोकणात रायगड जिल्ह्यात रेवदंडा [ता.अलिबाग ] येथे १९२२ साली जन्मलेले नारायण विष्णू धर्माधिकारी हे एका मंदिराचे पुजारी होते. कोणत्याही पुजाऱ्याला भाविकांच्या मानसिकतेचा उत्तम अभ्यास होतो. सतत मंदिरात येणाऱ्या भाविकांएवढे सोपे टार्गेट कुणीच असू शकत नाही. देव,धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली त्याला काहीही सांगितले तर पटते याची खात्री पुजाऱ्यांना झाली की त्याचा महंत, महामंडलेश्वर या दिशेने प्रवास सुरु होतो. अनेक वर्ष मंदिरात सेवा दिल्यावर पुजारी नारायण धर्माधिकारी पुढे नानासाहेब धर्माधिकारी झाले. 

त्यांनी काही भाविकांना विविध तीर्थक्षेत्राची यात्रा घडवून आणल्यावर गावात ''समर्थ प्रासादिक अध्यामिक सेवा समिती'' स्थापन केली. दासबोधाचा प्रसार करण्याचा उद्देश ठेवून त्यांनी १९४२ साली पहिली ''श्री बैठक'' घेऊन त्या माध्यमातून रामदासांच्या संदेशाचे प्रसारण सुरु केले. पुढे अनुषंगिक विषय म्हणून विविध क्षेत्रात जुजबी कामे सुरु केली त्यालाच आज महान समाजसेवा म्हटले जाते. धन, श्रम हे समर्पण आम्हाला द्या आणि त्या बदल्यात निरूपण, प्रवचन आणि कोरडे अध्यात्म तुम्हाला ठेवा असा मतलबी संदेश देण्याचा हा कोट्यवधींचा धार्मिक धंदा आहे दुर्दैवाने त्याला सरकारी अधिष्ठान प्राप्त झाले आहे.  

     कोकणात रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यात रामदास स्वामी आणि त्यांच्या दासबोध ग्रंथाची थोरवी सांगत असताना फावल्या वेळात कुणालाही सहज पटेल अश्या अध्यामिक गोष्टी सांगत असताना या बैठकांना ब्राह्मण कमी आणि ओबीसी समूह मोठ्या संख्येने उपस्थित राहायला लागले. कोकणात या बैठकांना 'रामदासी बैठका' म्हणूनही ओळखले जाते. "जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ", या पायावर आधारित दासबोधाचे तत्त्वज्ञान कुणबी, आगरी, कोळी या ओबीसींच्या मेंदूवर कोरत नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या हयातीत लाखो लोकांचा भक्त परिवार तयार केला. गाभा दासबोधाचा मात्र वरचे मार्गदर्शन भक्तीचे अशी गोळी लाखो लोकांना देऊन कोकणात या रामदासी बैठकांनी उच्छाद मांडल्यावर लाखोंचे मेळावे घेऊन या संप्रदायाने शक्ती प्रदर्शन करीत राजकारण्यांना दखल घेण्यास भाग पाडले. परिणामी गल्लीपासून दिल्ली पर्यंतचे विविध पुरस्कार नानांच्या पर्यंत येऊ लागले. 

       २००८ मध्ये नाना धर्माधिकारी यांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी वाढवून ठेवलेल्या या भक्ती मांडवाचा सहारा त्यांचे पुत्र दत्तात्रय उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतला. पित्याच्या तुलनेत आप्पा दासबोधावर फारच रसाळ प्रवचन म्हणजे निरूपण करायला लागल्याने ते अधिक लोकप्रिय झाले. त्यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही नवी संस्था निर्माण करून भक्तांची आर्थिक आवक  तिकडे वळवली. आजच्या घडीला या संस्थेचे अप्पा संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे तीन चिरंजीव सचिन, उमेश आणि राहुल हे विश्वस्त म्हणून काम बघत आहेत. दासबोधातून परमार्थाची शिकवण देणारे आप्पा धर्माधिकारी मात्र घरातच संस्था काढून कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांचा स्वार्थ साधत आहेत. चार बापलेकांच्या संस्थेला गेल्या काही वर्षात सरकारी मदतीचे ओघ अमर्याद सुरु असतात आणि कोमात गेलेल्या कोणत्याही भक्ताला त्याचे काहीही वाटत नाही. 

      पिता नाना धर्माधिकारी याना २००८ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यावर या वर्षी पुत्राचाही त्याच पुरस्कारासाठी नंबर लागला आणि त्याच्या वितरणात १३ भाविकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. कोकणातील ओबीसी स्त्रिया या रामदासी बैठकांना का जातात याची अतिशय अभ्यासू मांडणी चित्रलेखाच्या तत्कालीन पत्रकार संध्या नरे पवार यांनी ''तिची भाकर कुणी चोरली ?'' या मनोविकासने काढलेल्या पुस्तकातून अतिशय विस्ताराने केली आहे. खारघर येथील घटनेनंतर सोशल मीडियावर या धर्माधिकारी बाबांचे प्रताप उघड करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत त्यातला मतितार्थ सर्वानी समजून घेण्याची गरज आहे. जनतेच्या पैश्यातून चाललेली उधळपट्टी आणि बुवा बाबांचे उदात्तीकरण यामुळे या राज्याचे काहीही भले होणार नाही हे सध्या नागरिकाला कळत असताना राज्याच्या नेतृत्वाने डोळ्यावर पट्टी बांधून स्वतःला कुणाचा तरी भक्त म्हणून पुढे करावे यासारखी लाजिरवाणी बाब अन्य कोणताही असू शकत नाही हेही या निमित्याने समोर आले आहे. 

             या प्रकरणी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी घेतलेले आक्षेप महत्त्वाचेआहेत  ते म्हणतात ''मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांमध्ये सर्वच बहुजन समाजातील महिला व पुरुष आहेत. धर्माधिकारी यांचे सर्व कुटुंबीय आर एस एस व भाजपाचे पाठीराखे आहेत. नवीन पिढीतील युवकांना व महिलांना नवब्राह्मणवादाकडे घेऊन जाणे हा एकमेव अजेंडा आहे.  त्यांचे एक खाजगी कुटुंबातील चार सदस्यांचे एक बाप दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब व त्यांचीच तीन मुले. सुरुवातीला कोकण व मुंबई परिसरातील सर्व बहुजन समाजातील महिलांना व नंतर युवकांना मानसिक बौद्धिक गुलामीत नेण्यासाठी काम सुरू केले होते. पांडुरंग शास्त्री आठवले व एक जोशी असे तीन ब्राह्मण गेले काही वर्षे हेच एकमेकांना पूरक काम करत आहेत . एवढेच नाही तर  कुणबी मराठा बहुजन समाजातील अनेक वरिष्ठ आय ए एस/आय पी एस व अन्य अधिकारी यांच्या शिष्यगणात आहेत.‌ ते जात्यांध झाले आहेत.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकेकाळी नाना धर्माधिकारी यांच्या बैठकीत जात होते. असे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागून शिंदेंनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असावे. तेरा किंवा अधिक भाविकांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी भविष्यात बहुजन समाज शहाणा होईल असे मत नाही. कारण सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी पांडुरंग शास्त्री आठवले शीख समाजाची माफी मागण्यासाठी गुरुद्वारा हुजूर साहेब नांदेड येथे गेले होते. त्यावेळी सुध्दा गर्दीतील चेंगराचेंगरीत डझनभर भक्त मृत्यूमुखी पडले होते. ज्या कुटुंबातील सदस्य मृत्यूमुखी पडले आहेत, तेच काही काळ दुःखात राहतील... धर्माधिकारी यांच्या पेक्षा आम्ही बहुजन समाज आमच्या नाशासाठी जास्त प्रमाणात जबाबदार आहोत, असे म्हणायला हरकत नाही!" खेडेकर यांचे शब्द कदाचित जहाल असतील परंतु त्यातून समाजाचे अन राज्याचे हित झिरपत असते याचाही विचार समाजाने केला पाहिजे. 


-पुरुषोत्तम आवारे पाटील... 9892162248

कार्यकारी संपादक- दै.मातृभूमी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com