बीड जिल्ह्यातील ज्या आष्टी जिल्ह्यातून राही भिडे आल्या, तेथील तेव्हाची परिस्थिती आणि त्यातून त्यांनी केलेले लिखाण समाजाच्या उपेक्षित घटकासाठी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पत्रकारिता करताना कायम जपले. या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ३० वर्षांचा कालखंड समजून घेता येतो. बातमीदारी करताना राही भिडे यांनी संधी मिळेल तेव्हा माझ्याविरोधात लिहायचे सोडले नसल्याचे अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कथन केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज ज्येष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांच्या ‘माध्यमाच्या पटावरून’ आत्मचरित्राचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई मराठी पत्रकार संघात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याकरिता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, साहित्यिक अर्जुन डांगळे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, पत्रकार सुजाता आनंदन तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघातील अनेक मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच राही भिडे यांच्या मातोश्रींचा देखील शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शरद पवार यांनी भिडे यांच्या पुस्तकातील अनेक उतारे वाचून, त्यांनी हे सगळे अनुभवातून मांडले असल्याचे सांगितले. महाविद्यालयात शिक्षण घेताना आपण अपवादाने काही काळ पत्रकार झालो होतो. तेव्हा ‘सकाळ’मध्ये लिहित असल्याच्या आठवणी त्यांनी उलगडून दाखवल्या. तसेच त्यावेळी सकाळच्या हेडलाईन कशा यायच्या, त्यामागील भूमिका काय होती याचे किस्सेही शरद पवार यांनी सांगितले. माध्यमात हल्ली जे सुरू आहे त्यावर मी काही बोलणार नाही, असे सांगत भिडे यांचे हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी अनेक संकटे अनुभवून देश कसा पहिला, हे अधोरेखीत केले असल्याचे शरद पवार म्हणाले.
माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भिडे यांचे हे पुस्तक साधी आत्मकथा नाही, प्रचंड वेदनेने भरलेले असून त्यात १९९८ पासून आतापर्यंतचा राजकीय इतिहास आणि त्याचा प्रवास मांडण्यात आल्याचे शिंदे म्हणाले. या वेळी शरद पवार यांच्या तालमीत मी घडलो आहे. पवारांनी कित्येकांना मदत केली, त्यांना समोर आणले, मात्र त्यातील अनेकांनी त्यांची साथ सोडली. उलट आरोपही केले, मात्र शरद पवार यांनी हे कधीच मनात ठेवले नाही. जो विरोधात गेला त्यालाही जवळ केले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
‘माध्यमाच्या पटावरून’ या आत्मचरित्रात भिडे यांनी ३० वर्षांतील त्यांच्या पत्रकारितेचा लेखाजोखा, आलेले अनुभव कथन केले आहेत. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भिडे यांचे व्यक्तिमत्व प्रेमळ असल्याचे सांगत ती संघर्ष करत इथपर्यंत आली. गुणवत्तेच्या जोरावर माध्यमात भूमिका बजावली. हे पुस्तक नवीन पत्रकारांना मार्गदर्शक ठरेल, या पुस्तकाचा उपयोग विधान मंडळाच्या ग्रंथालयातही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी साहित्यिक अर्जुन डांगळे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, पत्रकार सुजाता आनंदन तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे या मान्यवरांनी आपले मनोगत मांडले.
0 टिप्पण्या