गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेकरीता ठाणे महापालिका सज्ज झाली आहे . त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी तयारीचा प्राथमिक आढावा घेतला. यात्रेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल्या आहेत. ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, परिवहन विभाग, पाणी पुरवठा विभाग, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत.
बुधवार, २२ मार्च रोजी सकाळी सात वाजता भारतीय नववर्ष स्वागत यात्रा कौपीनेश्वर मंदिरातून निघणार आहे. त्यापूर्वी स. ६.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदनकेले जाईल. ही स्वागत यात्रा जांभळी नाका, चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराजमंदिर, हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राम मारुती रोड, मासुंदा तलाव आणि कौपीनेश्वर मंदिर या मार्गाने जाईल.
स्वागतयात्रेसाठी मासुंदा तलाव परिसर, स्वागतयात्रेचा मार्ग स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संदीप माळवी यांनी आढावा बैठकीत दिली. या मार्गावरील अतिक्रमणे,फेरिवाले हटवण्यास अतिक्रमण विभागास सांगण्यात आले. मासुंदातलाव परिसर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदी भागात रोषणाईच्या सूचना विद्युत विभागास देण्यात आल्या. तर, स्वागतयात्रे दरम्यान, सर्व सुविधांसह वाहन तैनात करण्यास अग्निशमन विभागास सांगण्यात आले आहे. कडक उन्हाळा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने विशेष काळजी घ्यावी, असे माळवी यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्तआयुक्त (१) संदीप माळवी यांच्या कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस, नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, प्रशांत रोडे, अनघा कदम, उप नगरअभियंता शुभांगी केसवानी, अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके, स्वागतयात्रेच्या आयोजन समितीचे सदस्य संजीव ब्रम्हे, कुमार जयवंत, भरत अनिखिंडी, प्रसाद दाते आदी उपस्थित होते. या यात्रेच्या निमित्ताने, रविवार १९ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळत ठाण्यातील विविध नृत्यसंस्थाच्या विद्यार्थीनी व त्यांच्या नृत्यगुरू यांचा नृत्यधारा हा कार्यक्रम होईल.
२० मार्च रोजी गंधार भालेराव यांचे बासरीवादन, पं. मुकुंदराज देवयांच्या शिष्य परिवाराचे तबलावादन आणि पं. शैलेश भागवत यांचे सनईवादन होईल. २१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. गीता पठण, रुद्र व शिवमहिन्म स्त्रोत पठण होईल.सायं. ८.३० ते १० या वेळेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे सगळे कार्यक्रम कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात होतील. २१ मार्च रोजी, पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसरात दीपोत्सव होईल.
या कार्यक्रमाकरिता होणारा संपूर्ण खर्चाचा भार ठाणे महानगर पालिकेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या खिशातून होणार असल्याने हा कार्यक्रम ठाणे महानगर पालिका पुरस्कृत असल्याची चर्चा आता ठाण्यात रंगली आहे.
0 टिप्पण्या