निवडणुकात चित्कार फैलावतात..अमुक "जातीने" तमुक उमेदवाराला 'कसबाने' पाडले !आणि..
या देशाचा दागिना "जात" सगळीकडे मिरवला जातो.. ऑनर किलिंग म्हणजे प्रतिष्ठेसाठी
एखाद्याला मारून टाकणे यात 'जात' आघाडीवर आहे.
धर्माचे, उच्चवर्णियांचे स्वगौरवी शक्तीस्थान!
ब्राह्मण सर्वोच्च. शुद्र कनिष्ठ. हा सांस्कृतिक अनमोल विचार!
यावर अनेक उपाय आजवर केले गेले.. अनेक समाजसुधारक आयुष्यभर जाती निर्मूलनासाठी झटत राहिले. एक उपाय आंतरजातीय विवाहाचा तोही चालू आहे. खरे तर आंतरजातीय विवाह व्हायलाच पाहिजेत. एवढेच काय आंतरधर्मीय विवाहांचे जोरदार स्वागत करायला हवे. पण हे घडत नाही.
अलीकडे घडलेल्या आत्महत्या या प्रेमविवाहाला जातीमुळे विरोध झाला म्हणून प्रेमिकांनी केल्या. गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनर किलिंग वाढलेत. जात न मानता लग्न करू इच्छिणाऱ्या जोडप्यांपैकी एकाचे किंवा दोघांचे खून करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण वास्तवात जातीबाहेरील लग्नासाठी निवड जर कोणी केली तर सर्व जातबांधवही एकजुटीने विरोध करतात. का करतात?
भ्रामक समजुती! विकृत विचार!! प्रत्येक जाती बद्दल विशिष्ट समजूती समाजात डोलावल्या आहेत. एक जात दुसऱ्या जाती बद्दल अनेक भ्रम बाळगून असते.
'आमच्या जातीत सगळे खेकडे आहेत असे ते म्हणतात',
'सापाला सोडावा, अमुक जातीला मारावा',
'वरून गोड आतून कडू असते ही जात',
'चोऱ्या त्या जाती शिवाय कोण करणार?',
'कंजूष जातीचा बरा',...
अशा शेकडो म्हणी समाजात सहजपणे बोलल्या जातात!
जात पाळणे ही एक मानसिकता आहे जी विकृत आहे. फुले- आंबेडकर-आगरकर-शाहू महाराज अशा अनेकांनी या विकृत मानसिकतेचा समाचार घेतला. पण, जात नाही ती जात!
त्याचे कारण आहे संस्कारात. इथल्या समाजात मूल लहानाचे मोठे होत असताना 'आपल्या जातीचा' आणि 'आपल्या जातीचा नाही' हे सातत्याने ऐकत असते. दुसऱ्या जातींबरोबरचे तुटक व्यवहार आणि पूर्ण नसलेला बेटी व्यवहार पहात असते. म्हणजे प्रत्येक जातीची एक 'व्हॅल्यू सिस्टीम' मनात खोलवर रुजत जाते आणि एकसंघ समाज निर्मितीला तडा जातो.
जात पाळण्याची मानसिकता फक्त भारतातच नाही. वेगळ्या रूपात ती अगदी पुढारलेल्या अमेरिकेतही आहे. 'डू द राईट थिंग' नावाच्या इंग्रजी सिनेमात वंशभेदाचे भेदक चित्रण स्पाईक ली या दिग्दर्शकाने केले आहे. आफ्रिकन, अमेरिकन, कोरियन-अमेरिकन आणि इटालियन-अमेरिकन या वंशाच्या लोकांमध्ये दुजाभाव आणि पराकोटीचा तिरस्कार आणि त्यातून उसळणारी दंगल हे चित्रपटातच फक्त नाही ते अमेरिकेतील वास्तव आहे.
जगभर वंशवाद आणि धर्मवाद फोफावला आहे. ही मानसिकता लोक घट्ट धरून आहेत. त्याची कारणे काहीही असोत पण या मानसिकतेस विकृतच म्हटले जाते.
आपल्या जात पद्धतीतून नात्यांमध्ये एकसंघपणा निर्माण झाल्याचा दावा केला जातो. पण व्यक्ती तितक्या स्वभावाचे प्रकार. त्यामुळे जातभाईंमुळे आपल्याला सुरक्षितता मिळते हा भ्रम आहे. कुटुंब म्हणून जे कोणी असतील ते सर्व आपली सुरक्षितता टिकवायचा प्रयत्न करीत असतात. जातीमुळे मानव म्हणून जगण्यात सर्वात मोठी अडचण निर्माण होते. मानवी स्वभावात मूल्ये, आदर्श हे मानवतेच्या दृष्टीने बघितले जात नाहीत, तर जात व जातीतले आदर्श या दृष्टीने बघितले जाते. ही मानसिकता मानवतेच्या विरोधी असते. यातून संशय, दुराग्रह, हट्टाग्रह, दुराभिमान, अशा अनेक विकृत आणि विकारी मानसिकता विकास पावतात.
निरामय मानसिकतेचा समाज नसेल तर तो विनाशाकडे जातो यात काय ते आश्चर्य?
- डाॅ. प्रदीप पाटील (facebook)
0 टिप्पण्या