Top Post Ad

मत आणि पत विकणारा मागास राहाणारच...


   भारतात आजतरी लोकशाही आहे.किमान सामान्य माणसाच्या मतांनी आमदार खासदार निवडू शकतो.उद्या ही शक्यता कमी वाटते.कारण एकाच पक्षाला,एकाच माणसाला दिर्घकाळ सत्ता सोपवली कि,तो हुकुमशाही राबवतो.त्याला एकहाती सत्ता हवी असते.तो तसा प्रयत्न करतो.हे फक्त भाजप आणि नरेंद्र मोदी बाबतच नाही तर आतापर्यंतचा इतिहास सांगतो. फ्रांसमधे निवडून आलेला नेपोलियन बोनापार्ट पुढे बादशहा झाला होता.इटलीचा मुसोलिनी निवडून आल्यानंतर हुकुमशाहा झाला होता.जर्मनीमधे निवडून दिलेला हिटलर हुकुमशाहा झाला होता.रशियामधे पुन्हा पुन्हा निवडून दिलेला पुतीन हुकुमशाहा बनला आहे.यापुढे २०३४पर्यंत रशियात निवडणूक नाही.तसा कायदाच करून टाकला.जोपर्यंत पुतीन म्हातारा होऊन मरत नाही किंवा गोळ्या घालून मारला जात नाही.भारतात इंदिरा गांधींना पुन्हा पुन्हा निवडून दिल्याने डोक्यात हवा जाऊन आणिबाणी लादली होती.ती हुकुमशाही कडे वाटचाल होती.आता भारत सध्या त्याच दिशेने पाऊले टाकत आहेत.पोलिस,सीबीआय,इडी, निवडणूक आयोग आणि आता  सुप्रीम कोर्ट सुद्धा ताब्यात घेत आहेत.यातून सुटण्यासाठी फक्त सुप्रिम कोर्ट धडपड करतांना दिसते.इतरांनी तर नांगी टाकली आहे.मोदींनी छू म्हणताच कोणाच्याही अंगावर धावून जातात.

        सामान्य जनता मात्र नोकरी, कर्जमाफी, वीजमाफी,नुकसानभरपाई,घरकुल,शौचालय,फुकटचे राशन,फुकटचे शिक्षण,फुकटची औषधी यासाठी भिकारडा हात पसरून आहे.व्यापारी आणि कारखानदार हे तर भारताला स्वताचा देश मानतच नाहीत.बॅंका लुटून,चाटून ,पुसून परदेशात पलायन करीत आहेत.पैसा हाच परमेश्वर.ना हिंदू ,ना मुस्लिम,ना बौध्द,ना ख्रिस्ती.हा फक्त देखावा आहे.धार्मिक मंडप टाकणे,लंगर चालवणे,फुकट्यांना जेवू घालणे,पोटली बांधणे आणि पळून जाणे.         नरेंद्र मोदी यांनी झिरो बॅलन्स सांगून प्रत्येकाचे खाते उघडण्याचे फर्मान काढले.पंदरा लाख टाकण्याचे आश्वासन दिले.लोकांनी त्या लालचेने बॅंका भरल्या. म्हणे पैसा सरकारी बॅंकेत सुरक्षित राहिल.पण आज रोजी बॅंक व बॅंकेतील पैशांचे रक्षण सरकार करू शकत नाही.कदाचित बॅंका लुटण्यात सरकारचा ही हात असू शकतो.चोरी झाली तर प्राथमिक दृष्टीने चौकीदार वर संशय घेणारच.फर्स्ट इन्व्हेस्टीगेशन स्टार्टस फ्रॉम द वाचमन ओन्ली.मला वाटते सरकार हेच सावकार बनलेले आहे.

       चीन,पाकिस्तान वर डोळे वटारणारे प्रधानमंत्री मोदी मात्र बॅंक लुटारूंच्या केसाला धक्का लावू शकले नाही.लावतच नाही.हेच संशयास्पद आहे.शत्रूला गोळ्या घालून स्वर्गात पाठवणाऱ्या भगतसिंग,उधमसींह, मदनलाल धिंग्रा,नेताजी सुभाषचंद्र बोस, वि.दा. सावरकर यांना मानणारे हे पक्षाचे सरकार व सरकारी पक्ष मल्या, मोदी,चोक्सीला गोळी काय,साधे टॅब्लेट सुद्धा दाखवत नाही.याचे रहस्य शोधलेच पाहिजे.वाघाची शिकार करणारा शिकारी उंदराला घाबरतो.तर मग,याचे फक्त पॉलिटिकल नव्हे  सायकॉलॉजीकल डायग्नोशीस करणे आवश्यक बनते.

     कोण करू शकतो,हे डायग्नोशीस? मला कर्ज मिळेल का?मला कर्जमाफी मिळेल का? मेल्यावर बायकोला विम्याचे पैसे मिळतील का? माझ्या मालाला भाव मिळेल का? माझ्या पोऱ्याला नोकरी मिळेल का? मला जातीचे आरक्षण मिळेल का?फुकटचे राशन,फुकटचे घरकुल,फुकटचे शौचालय मिळेल का? सातवा पे कमीशन लागेल का? तीन टक्के महागाई भत्ता मिळेल का? ही आशा मनात ठेवणारा भुभूक्षू माणूस तर मुळीच नाही.असा माणूस हा परिणामकारक नसतो.तो जन्मापासून मृत्यूपर्यंत ओढला जाणारा द्विपाद प्राणी असतो.त्याची गणती फक्त जनगणनेत होऊ शकते.पुरूष म्हणून तर करुच नये.या माणसांच्या भरोशाने लोकशाही टिकत नाही.अशी माणसे केंव्हाही काहीही विकू शकतात.मत,पत, अब्रू आणि इमान सुद्धा.अशाच लोकांच्या मतांनी आमदार खासदार निवडून आलेल्यांची संख्या मोठी आहे.म्हणून हे राजकीय भयानक,विदारक चित्र पाहायला मिळते.पन्नास आमदारांनी मुंबई सोडुन सुरत गुवाहाटीच्या जंगलात पळून जाणे,ही तर झलक आहे.हिच  लोकशाहीच्या पतनाची पायरी आहे.अशा माणसांचा गैरफायदा सांप्रत केंद्र सरकार घेत आहे.यातील अनेक चोर हे इडीची बेडी लागून जेलमधे जाण्याच्या भीतीने बायको पोरांना न सांगता मोबाईल स्वीच ऑफ  करून अंधारात पळून गेले होते.यापैकी एक चोर आम्ही निवडून दिला आहे.हो!आम्हीच! तो तर बेईमान होऊन पळाला आणि उरले सुरलेले जय शिवाजी जय भवानी म्हणत राजकीय भोकांना ठिगळ लावत आहेत.

      मला वाटते जी माणसे फक्त मरण येत नाही म्हणून जगतात.जी माणसे नेहमीच कटोरा घेऊन सरकारच्या दारात उभे असतात,ती माणसे लोकशाही टिकवू शकत नाहीत.जरी यांच्याच साठी लोकशाही ची नितांत गरज आहे, तरीही ते लोकशाही खांद्यावर पेलू शकत नाहीत.मत,पत,अब्रू,इमान विकणारी माणसे कोणत्याही देवाची, कोणत्याही धर्माची, कोणत्याही देशाची नसतात.प्रत्येक नागरिकाचा या राज सत्तेत एका बोटाचा कि असेना सहभाग असावा म्हणून प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. सत्तर वर्षात त्याला त्या आधिकाराचे महत्त्व कळलेच नाही.हा भारताचा, पाकिस्तानचा,श्रीलंकेचा अनुभव आहे.विरक्त माणसाला कामसूत्र विचारणे, शाकाहारी माणसाला मटणाची चव विचारणे या सारखा हा प्रयोग आहे.यामुळेच लोकशाही प्रणालीचे स्तंभ कमजोर होतात.लोकशाही ढळढळीत होते.कधी कधी हेलकावे खाते.ढासळते सुद्धा.पार्लमेंट,राष्ट्रपती,न्यायालय, प्रसारमाध्यमे यापैकी किती स्तंभ व्हर्टीकल उभे आहेत,याची चर्चा करणे आवश्यक झाले आहे.प्रसारमाध्यमे तर कमर्शियल इंडस्ट्रीचा दर्जा बाळगुन आहेत.राष्ट्रपती फक्त पुरस्कार देण्यापुरते दिसतात.पार्लमेंट आणि न्यायालय यात द्वंदयुद्ध चालू आहे.एकाला निरंकुश सत्ता हवी आहे.दुसऱ्याला स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.राष्ट्रपती तर धृतराष्ट्र सारखे असून नसल्यासारखे आहेत.मला अपेक्षा आहे कि,यात राष्ट्रपतींनी दिलेली जबाबदारी निभावली पाहिजे.ठणकावून सांगितले पाहिजे,ये नरेंद्रभाई, दुसऱ्याचे आमदार तोडून फोडून सरकार बनवू नका.न्यायालय खिशात घालण्याचा प्रयत्न करू नका.तुमची सत्तेची हवस पुरी करण्यासाठी देशाला वेठीस धरु नका.मीठाचा खडा टाकून लोकशाही नासवू नका. आशिया खंडात एकमेव देश आहे भारत ,जो लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करीत आहेत.आणि लोकशाही शाबूत ठेवली म्हणूनच तुम्ही या पदापर्यंत पोहचलेले आहात.पुढील पिढ्यांसाठी ती तशीच टिकवून ठेवा.इंग्रजांनी देश लुटू नये म्हणून स्वातंत्र्य मिळवले.पण आता स्वतंत्र देशातच लुट होऊन परदेशी जात आहे.ती थांबवा.अशी कान उघाडणी केली पाहिजे.

     राष्ट्रपतींनी जबाबदारी निभावली पाहिजे.अशी अपेक्षा आम्ही करतो.पण आमची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे.आम्ही सुद्धा मत,पत,अब्रू आणि इमान विकू नये.जर विकले तर आमचा विकास होणे शक्य नाही.मत आणि पत विकणारा मागास राहाणारच!     भारत कृषीप्रधान देश आहे,असे म्हणतात.पण नाही.भारत कृषकबहुल देश आहे.शेतकरी संख्येने जास्त असले तरी देशातील राजप्रणालीवर वचक,दचक ठेवू शकत नाही.याची कारणे मी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.मांडली आहेत.शेतकरी बहुसंख्य असूनही याचकाच्या भुमिकेत का?याचा सर्वांगिण अभ्यास केलाच पाहिजे.तरच हतबलतेची कारणे सापडतील.सापडली तर निर्मुलन करता येतील.पण आम्ही आमचा एक्स रे , सीटीस्कॅन ,सोनोग्राफी करू देण्यास तयार नाहीत.उपचार करण्यासाठी निदान तर केलेच पाहिजे.तरच कृषक आजारावर सशक्त उपाय करता येतील.

  •  शिवराम पाटील....९२७०९६३१२२
  • महाराष्ट्र जागृत जनमंच...जळगाव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com