ठाणे शहरात विकासकामे मुलभूत सेवासुविधांबरोबरच ठाण्याच्या सौंदर्यीकरणामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानातंर्गत हाती घेतलेली विकास कामे पूर्णत्वास येत असून ठाण्याचे नवीन चित्र नागरिकांना अनुभवायला मिळत असून हे निश्चितच नागरिकांनी कर रुपाने दिलेल्या प्रतिसादामुळे शक्य झाले आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 720 कोटी इतकी विक्रमी मालमत्ता कराची वसुली 30 मार्च रोजी म्हणजेच मार्च अखेर एक दिवस आधीच पूर्ण केली याबद्दल समस्त ठाणेकरांचे प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी रु. 705.25 कोटी इतके सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. सध्या रु. 720 कोटी इतका मालमत्ता कर संकलित झाला असून तो एकूण अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या सुमारे 95 % इतका आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी 591 कोटी मालमत्ता कराची वसुली झाली होती. यानुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालमत्ता कराच्या संकलनामध्ये रु. 115 कोटीची विक्रमी वाढीव वसुली झाली आहे. ठाणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच 700 कोटीचा आकडा महापालिकेने पार केला आहे.
मालमत्ता कर संकलन व वसुली प्रभावीपणे होणेकरिता वरिष्ठ स्तरावर विभागप्रमुखांच्या नियमितपणे बैठका घेवून मार्गदर्शन करण्यात आले. विहित मुदतीत कर संकलनाकरिता मालमत्ता कर संलग्न सर्व संकलन केंद्रे शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली होती. या व्यतिरिक्त सोशल मिडीया, चित्रपटगृहे, नाट्यगृहे व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच मुख्यालय स्तरावरील पथकाद्वारे मोकळ्या जागेवरील कराच्या थकबाकीदारांना देखील आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरणा केला आहे. विकसकाच्या प्रलंबित थकबाकीबाबत जोपर्यत प्रलंबित कर वसूल होत नाही तोपर्यत विकास परवानग्या देण्यात येवू नयेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या, त्यामुळे मालमत्ता कर वसुलीला चालना मिळाली आहे.
यामध्ये मार्च 2023 या एका महिन्यात रु. 83.45 कोटी इतकी मालमत्ता वसुली झाली, पैकी 15 मार्च ते 30 मार्चपर्यत रु.59.60 कोटी वसुली झाली. यापैकी ऑनलाईन पध्दतीने रु. 166.17 कोटी, धनादेशाद्वारे रु. 349.56 कोटी, धनाकर्षद्वारे रु. 100.16 कोटी, डेबीट कम एटीएम व क्रेडीट कार्ड पध्दतीने रु. 2.03 कोटी, रोखीने रु. 93.22 कोटी इतकी वसुली झाली. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, ही योजना जास्तीत जास्त सोपी व सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
जे करदाते थकबाकी व पहिल्या सहामाहिच्या करासोबत दुसऱ्या सहामाही अशी एकरकमी करभरणा महापालिकेकडे दिनांक 1 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या मालमत्ता करातील सामान्य करामध्ये 10 टक्के सूट तर दिनांक 16 जून 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत कर भरणाऱ्यांना 4 टक्के सूट, दिनांक 1 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत कर भरणाऱ्यांना 03 टक्के तर दिनांक 01 ऑगस्ट 2023 ते दि. 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत 02 टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी करदात्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपला मालमत्ता कर भरणेसाठी आवाहन करण्यात येत आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके तयार होत असून त्याबाबतची सूचना महापालिकेच्या अभिलेखी असलेल्या मोबाईल क्रमांक, ई-मेल द्वारे देण्यात येणार आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके छपाई करुन प्रभाग कार्यालयामार्फत वितरित करणेची कार्यवाही सुरु करण्यात येत असून याकरिता काही कालावधी अभिप्रेत आहे. या कालावधी दरम्यान करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरुन उपलब्ध करुन घेवू शकतील. तसेच या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिटकार्ड, क्रेडिट कार्ड तसेच GooglePay, PhonePe, PayTm व BHIM App याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करु शकतील असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले. मालमत्ता कर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
*थकबाकीची वसुली करणार*....ज्या करदात्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर जमा केलेला नाही अशा करदात्यांना वॉरंट बजावून मालमत्तांची जप्ती / अटकावणी करण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाई अंतर्गत संबंधित मालमत्तेस महापालिकेकडून देण्यात येणान्या सेवा-सुविधा (नळ संयोजन व इतर) खंडीत करण्याचे सुरु आहे. यानंतर संबंधित मालमत्तेचे मुल्यांकन करुन जाहीर प्रसिध्दीकरणाद्वारे मालमत्तेचा लिलाव प्रक्रिया राबवून मालमत्ता कर वसूल करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार सदरची मालमत्ता रु.1/- या नाममात्र किंमतीने महापालिकेच्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करणेकरिता प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
*झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट पध्दतीने कर वसुलीसाठी उपाययोजना*....ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी- सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून अथवा इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची व कोणास भेटण्याची गरज पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे.
सन 2023-24 चा अर्थसंकल्प मंजूर झाला असून त्यामध्ये मालमत्ता करासाठी रु. 800 कोटीचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. चालू वर्षात केलेल्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी 800 कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या प्रलंबित दायित्वाचे मोठे आव्हान आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी एका बाजूने खर्चाची आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे असून दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सदर प्रयत्नांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या प्रयत्नांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळणे आवश्यक आहे. यावर्षी अर्थसंकल्पात प्रलंबित जीआयएस सर्व्हे च्या आधारे एकूण मालमत्ता कराचा बेस वाढविण्यामध्ये मोठी मदत होणे अपेक्षित आहे. मालमत्ता करसंकलनात नागरिकांनी महानगरपालिकेचया आवाहनाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सर्व नागरिकांचे धन्यवाद. __. अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.
0 टिप्पण्या