शुक्रवारी पुण्यात महाराष्ट्र सन्मान परिषदेला प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे या परिषदेला लक्ष्य केले जाणारच होते. त्याचे कारण ही तसेच आहे, कारण बहुजनांच्या आदर्शांना कलंकित करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी ही परिषद राज्यभर फिरणार आहे. स्वाभाविकच ज्यांनी शिव,फुले , शाहू, आंबेडकर या एका सूतातील महापुरुषांना आणि त्यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महानुभावांना बदनाम करण्याचे धोरण आखले आहे; त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे , संभाजी भगत यांनी सुरू केलाय. त्यातून खोटा इतिहास सांगणारे नागडे होणार आहेत. म्हणूनच हिटलरचा सेनापती गोबेल्स हा त्यांचा आदर्श असल्याने त्याला नजरेसमोर धरून कुजबुज गँग सक्रीय करण्यात आली आहे.महाराष्ट्र सन्मान परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी जे वाक्य वापरले त्या वाक्या मागचा अर्थ किंवा त्या वाक्याचा पूर्ण संदर्भ लोकांपुढे आलेला आहे, पण ज्या वर्गाने शिवरायांनाच लक्ष्य केले होते ; त्या वर्गाकडून आता शिवरायांची बदनामी केली जात आहे , अशी कोल्हेकुई सुरू केली आहे. वास्तविक पाहता, जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केले आहे; ते विधान लोकांपर्यंत नव्हे तर आपल्याच कार्यकर्त्यांपुढे चुकीच्या पद्धतीने मांडून आपल्याच कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचं काम या कुजबूज यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एमपीएससी अभ्यासक्रमातून मुघल हा चाप्टर वगळण्यात येत आहे. हा चाप्टर वगळणे म्हणजेच शिवरायांचे शौर्य, त्यांचे राजकारण , त्यांचे बुद्धीचातुर्य हे नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून दडविण्याचा डाव आहे.
मुळात शिवाजी महाराज हे आदिलशाही विरुद्ध आणि मुगलशाही विरूद्ध लढले. आदिलशहाचा सेनानी अफजल खान याला प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार मारला. अफजलखान मारल्यामुळेच आदिलशाहीला जरब बसली तर दुसरीकडे पुण्यात घुसलेल्या शास्ताखानाला महाराजांनी पळता भुई थोडी केली. "जीवावर आलं ते बोटावर निभावलं" , असं म्हणत हा शाहिस्तेखान पळून गेला. बर, हा शाहिस्तेखान कोण? तर हा शाहिस्तेखान म्हणजे मुघलांचा मातब्बर सरदार!! काही ठिकाणी असेही म्हटले की तो औरंगजेबाचा मामाही होता. जर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मामाला दणका दिला असेल तर तो दणका थेट मुघल सल्तनतला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, शिवाजी महाराजांचे राजकारण, शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य या सर्व गोष्टी मुघल आणि आदिलशाहीशी संबंधित आहेत. जर मुघलशाही आणि आदिलशाही यांना अभ्यासक्रमातून वगळलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि बुद्धीचातुर्य अभ्यासणार कसे? असा साधा प्रश्न डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता पण ज्यांना शिवाजी महाराजांचे शौर्य, संभाजी राजांची आक्रमकता आणि या दोन्ही पिता-पुत्राचे पुरोगामीत्व आणि त्यांनी केलेला कर्मकांडाला विरोध, हे ज्या शिवद्रोहींना माहित आहे, त्यांना शिवाजी महाराजांचा हा शौर्याचा, त्यांच्या बुद्धिमत्तेची ओळख दाखवणारा इतिहास नकोसा आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला कमीपणा यावा, यासाठी मुघल आणि आदिलशाहीचा इतिहास दडविला जातोय. शिवाजी महाराज हे आपल्या सुरुवातीच्या काळात आदिलशाहीशी तर नंतरच्या काळात मुघलशाहीशी लढले. ते कोणा एका व्यक्ती विरोधात लढले नाहीत तर ते विशिष्ट अशा प्रवृत्तींविरोधात लढले. ही प्रवृत्ती कोणती होती, रयतेला छळणारी ही प्रवृत्ती आदिलशाहीमध्ये - निजामशाहीत होती. म्हणून ही प्रवृत्ती शिवरायांनी ठेचली, हेच जर लपून ठेवायचे असेल तर....?म्हणून तर मुघलांचा इतिहास आणि मुघलांशी केलेली लढाई तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नको आहे.
डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानात कुठेही मुघलांचं कौतुक केलं नाही; त्यांनी तर शिवरायांचा खरा इतिहास सांगितला. शिवपुत्र संभाजी राजांवर अष्टमंडळात अष्टप्रधान मंडळातील काही नतदृष्टांनी केलेला अन्याय सांगितला. फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सीस मार्टीनच्या "त्या " डायरीचा पुन्हा अभ्यास करावा, असेही त्यांनी सुचवले. ही डायरी काय आहे, हे जर तपासायला सुरूवात झाली तर भल्याभल्यांना घाम फुटेल! धर्मरक्षक की स्वराज्यरक्षक यामधील स्वराज्य रक्षक हेच बिरुद स्वीकारले जाईल अन् धर्माच्या नावावर सुरू असलेली दुकानदारी कायमची बंद होईल. म्हणून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना विरोध होत आहे. किंबहुना, डॉ. आव्हाड टार्गेट व्हायला हेच एकमेव मूळ कारण आहे. कारण, ती डायरी उघड झाली किंवा ती डायरी सर्वसामान्य माणसांनी वाचली, तिचा अभ्यास केला तर संभाजी राजांना कोणी मारलं, का मारलं? हे सर्व उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी प्रकर्षाने सांगावेसे वाटते की, राहुल गांधी यांची प्रगल्भता भारत जोडो अभियानात दिसून आली. पण त्याआधी हजारो कोटी रुपये खर्च करून त्यांना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोच प्रकार आत्ताही घडतोय, डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभी केलेली ही फळी व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेली आहे. आपल्या व्हाटसअप कुलगुरूंने जे लिहून पाठवलं, तोच इतिहास मानायचा आणि समोरच्याला ठोकायचा; हा एक कलमी कार्यक्रम सध्या काही लोकांनी सुरू केलाय. या लोकांना आपण महाराष्ट्र द्रोही म्हणू नया काय? शस्त्रांस्रांसाठी 'वाईन' असा शब्दप्रयोग वापरून दारूगोळा पोर्तुगीजांकडून मागणार्या संभाजीराजांना दारूबाज ठरवणारी ही अवलाद आता त्यांचा खरा इतिहास सांगणाऱ्यांना लक्ष्य करीत आहे. सामान्य माणूस या खोटेपणाला आता विटला आहे.
महाराष्ट्र सन्मान परिषदेच्या पहिल्याच सभेत व त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत, ज्यांनी ज्यांनी बहुजनांची प्रतीके नासविण्याचा प्रयत्न केला; त्यांना त्यांना नागडे करण्याचा चंग महाराष्ट्र सन्मान परिषदेने बांधला आहे. हे सर्व ज्या मातृसंस्थेला कळलं, त्या मातृसंस्थेने आपली कुजबुज गॅंग सक्रिय केली. या कुजबूज गँगने अर्थाचा अनर्थ केलाय आणि या अनर्थातून आंदोलनांचा फार्स केला जातोय. बोगस लोकांच्या नादी लागून कोल्हेकुई करणार्यांमध्ये बहुसंख्यांक हे बहुजन आहेत. त्यांनी आपल्या बापजाद्यांचा खरा इतिहास पडताळून पाहावा, आपल्या बापाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करणारे लोक कोण आहेत, हे तेव्हाच त्यांना समजेल! अर्थातच हे समजू नये यासाठीच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्याचा हा सर्व खटाटोप आहे. यातून मात्र एक स्पष्ट झालंय महाराष्ट्र सन्मान परिषदेचा ज्यांनी प्रचंड धसका घेतला आहे, त्यांच्या बुडाला पहिलाच सभेला आग लावली.
0 टिप्पण्या