थायलंड या देशातील भारतभूमी आणि बुद्धाचे जन्मस्थान असलेल्या देशाबद्दल नितांत श्रद्धा असलेल्या 110 भंतेंना त्याच बरोबर येथील काही भंतेना सोबत घेवून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष हत्तीअंबेरे यांनी परभणी या मराठवाड्यातील शहरातून धम्म यात्रा काढली, भारतात बुद्धिस्ट अनुयायी यांची एकही शिखर संस्था नसल्यामुळे आणि धार्मिक बाबतीत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अनेक तुकडे असल्यामुळे तसेच मीराताई आंबेडकर,भीमराव आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यांचा कारभार समाज अनुभवतो आहे,त्याचाच फायदा उठविण्यासाठी कोणातरी मास्टरमाईंड धुरीनाने एका काँग्रेस नेत्याच्या डोक्यात ही कल्पना घातली असावी,
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा खालून वर पर्यंत फिरली त्यात काँग्रेस नेत्यांनी अनेक देवळांमध्ये आरत्या म्हटल्या, डोक्यात टोपी घातली, साधूंच्या हातून गंडे दोरे बांधले, गुरुद्वारात डोके टेकविले, कुठे नमाज पढला की माहीत नाही,एका अर्थाने काँग्रेस ही संघटना देखील धार्मिक श्रद्धा आणि सोपस्कार यांचे पूर्णपणे समर्थन करते व आचरण करते हे त्यांनी दाखवून दिले असे माझे स्पष्ट मत आहे.
गांधी आणि टिळकांची OBC समाज,आणि दलीत मागासवर्गीय समाज या बद्दल इतिहासात घेतलेली भूमिका जागृत झालेल्या थोड्याफार प्रबुद्ध आंबेडकरी समाजाने समजून घेताना काँग्रेस पक्षा पासून अंतर ठेवायला गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे ही बाब काँग्रेस पक्षासाठी फारच घातक परिणाम करणारी ठरू शकते याचा कुठेतरी एकांतात काँग्रेस ची धोरणे ठरविणारी मंडळी बहुतांशी करीत असावी त्यामुळेच ही धम्म यात्रा थायलंड येथील अनेक धर्मगुरूंना येथे बोलावून आयोजित करण्यात आली आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे,
अलीकडे गगन मलीक हा अभिनेता श्रामनेर झाला होता,,त्याने चिवर धारण केले होते आणि तो सद्या देश विदेशातील अनेक सरकारे व तेथील संस्था किंवा इतर मार्गाने मदत मिळवून भारतात बुद्धिस्ट विचारधारा पसरविण्यासाठी कार्यरत आहेत मागील वर्षी आम्ही देखील वशिंद येथील कासने स्थित धम्माराजिक बुद्ध विहारात त्यांचा मूर्ती वाटप कार्यक्रम आयोजित केला होता अलीकडे त्यांच्यावर देखील बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे एक अध्यक्ष आक्षेप घेवून टीका करीत आहेत कारण दुसऱ्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे या यात्रेच्या सोबत गगन मलीक आणि हत्तीअंबीरे या काँग्रेस नेत्या सोबत आहे.या यात्रेच्या संयोजकांनी त्या त्या शहरातील काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जातीच्या सेल मध्ये काम करणाऱ्या नेत्यांची स्थानिक संयोजक म्हणून नियुक्ती आणि यात्रेचे नियोजन करायला सांगितले.
त्या कार्यकर्त्यांनी काही मोजक्या बुद्ध विहारांमध्ये बैठका घेवून बघितल्या परंतु त्यांना लोकांनी नियोजनात साथ दिली नाही किंवा काँग्रेसच्या नेतृत्वात ही यात्रा चालत असल्यामुळे त्यात इतर राजकीय पक्षात आणि समाजात सतत जागरूक व सक्रीय असलेले माझ्या सारख्या नेत्याने येथील काँग्रेस अध्यक्षास आपण सर्वांनी मिळून सुनियोजित कार्यक्रमाची मांडणी करू आणि आणि बुद्धांच्या अस्थींचे दर्शन ठाण्यातील नागरिकांना कसे व्यवस्थित घेता येईल अशी व्यवस्था करू असे वारंवार सांगितले परंतु नियोजनात त्यांना कोणताच बदल किंवा सूचना करण्याचा अधिकार नसल्याचे लक्षात आल्याने मी हतबल झालो.
दिनांक 13 फेब्रुवारीला ही धम्मयात्रा ठाण्यात येणार होती. तिच्या स्वागतार्थ ठाण्यातील खारेगाव येथील अशोक पवार, मानपाडा येथील कैलास धनेश्वर, आणि शहरातील इतर लोक माझ्या संपर्कात येवून यात्रे बाबत काय करायचे या बाबतीत विचारणा करीत होते, काही ठिकाणी काँग्रेस संयोजकांना टाळून बुद्ध विहारात बैठका झाल्या परंतु निधी कोणी जमा करायचा आणि कोणाकडे जमा करायचा येथे घोडे अडकले आणि तीन तेरा व्हायला सुरुवात झाली मी नंदू मोरे यांना अनेकदा फोन केले परंतु ते बऱ्याचदा पदयात्रेत चालत असल्याने नीट संवाद होवू शकला नाही झाला तेंव्हा ते म्हणाले आपापल्या परीने प्रयत्न करावेत.मग 12तारखेस काही मंडळी ॲक्टिव झाली नेतृत्व कोण करेल आणि आगमनाची माजिवडा पुला खालची जागा सकाळपासूनच आपल्या ताब्यात कशी राहील यासाठी प्रयत्न सुरू झाले .
रांगोळ्या, फुलांची आरास, कार्पेट, मंडप, तोरणे, कमानी उभ्या राहिल्या,कुणी बिस्किटे वाटली, पाण्याच्या बाटल्या वाटल्या .आणि बेगानेके शादिमे अब्दुल्ला दीवाणा या म्हणी प्रमाणे आमची सर्वांची अवस्था झाली , श्रेयासाठी धडपड सुरू,एकच ठिकाणी प्रचंड जमाव, दिवाबत्ती ची सोय नाही, यात्रेत सहभागी होवून चालत येणाऱ्या गुरूंना आहार नाही की जलपाण. अस्थी कलश आला तशी गर्दी उसळली, नेहमी प्रमाणे जय जय काराच्या घोषणा बेंबीच्या देठापासून देणारे पुढे झाले आणि विलक्षण ऊर्जा असलेली भावनिक जनता या गदारोळात सामील झाली, झिंदाबाद म्हणाली, बेशिस्तीमुळे धावू लागली, फोटो आणि शूटिंग मध्ये व्यस्त झाली आणि आम्हीच या रथाचे सारथी आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्याची स्पर्धा लागली
हे चित्र मी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत संपूर्ण ठाणे शहरातील मार्गावर दोन चार सहकाऱ्यांसह अनुभवत राहिलो, एव्हडी वर्षे ठाण्यात सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता राहून देखील अपयशी ठरलो,तथागत बुद्धांच्या अस्थींचे नीट नियोजन करणे जमले नाही याची जखम आजन्म राहील, तूर्तास एवढेच बाकी जमलेच तर पुढे लिहीन,
- प्रा. चंद्रभान आझाद.
- 98697 32964 ठाणे
1 टिप्पण्या
बुद्ध अस्थि जनते साठी आहेत त्यात पक्ष संघटना महत्वाच्या नाहीत लेख मला एकांगी वाटतो
उत्तर द्याहटवा