Top Post Ad

 'भाजप' नावाच्या भगव्या 'मुघलां'नी टाकलेला 'डाव' आणि त्यात, नेतोजी पालकरसारखंच अलगद फसलेल्या, 'मिंधेगटा'ची सत्तेची 'हाव'... ही सगळी, कुठल्या कुंपणापर्यंत जाणार, रंग बदलणाऱ्या राजकीय सरड्यांची 'धाव' ???...छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगांशी तह केल्यानंतर, स्वराज्याचा सेनापती नेतोजी पालकर, छत्रपतींची 'अवहेलना' करुन आणि मुघलांच्या आमिषाला बळी पडून थेट मुघलांना जाऊन मिळाला. लवकरच मुघलांना जाऊन मिळण्याचे काय दुष्परिणाम होतात, हे त्याला कळून चुकले... पण, परतीचा मार्ग खुंटल्यासारखा झाला होता!

मुघलांशी एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी... मुघलांच्या बाजूने स्वराज्यावर हल्ले चढवून, आपल्याच मातीतल्या आपल्याच 'रक्ता'च्या माणसांना मारुन आणि शिवछत्रपतींसारख्या असाधारण व्यक्तित्वाला कमीपणा आणून... सरतेशेवटी, नेतोजी पालकरने काय साधले??? शिवछत्रपती, आग्राच्या कैदेतून सहिसलामत निसटल्यावर, मुघलांनी पहिल्यांदा नेतोजी पालकरलाच नातेवाईकांसह अटक करुन आग्र्याला पाठवले. तिथे त्याचा अनन्वित छळ करुन नातेवाईकांसहित मुस्लिम धर्म स्विकारायला लावून, पुढे अनेक वर्षे काबूल येथे (अफगाणिस्तान) लढायला पाठवले. 

हे सगळे झाल्यावर आपण काय करुन बसलो, याचा नेतोजी पालकरला प्रचंड पश्चाताप झाला. मुघलांच्या नादी लागून स्वराज्याशी बेईमानी करुन आणि स्वराज्याच्या 'सरनौबती' सोडून... 'मनसबदारी'च्या नावाखाली मुघलांची अमानुष-अनैतिक 'गुलामगिरी'च करणे नशिबात आले. स्वत:च्या मनाने काही करण्याचे स्वातंत्र्य उरले नाही... ना जगण्याचे स्वातंत्र्य, ना मरण्याचे! 

आपल्याच स्वराज्याशी द्रोह करुन मुघलांच्या आमिषाला भुलून त्यांच्या वळचणीला गेल्याने... काही दिवस 'भपका' जरुर झाला. पण, कथेचा शेवट काय झाला? "एका स्वतंत्र विजयी सेनेचं 'सरनौबत' पद जाऊन, नेतोजी, 'परकीय आणि पराजित' सेनेचा 'गुलाम' बनून गेला!"

नेतोजी पालकरचे नशीब थोर म्हणून, तो मुघलांच्या तावडीतून निसटला आणि त्याचं पुन्हा नशीब थोर, म्हणून शिवछत्रपतींनी त्यास मोठ्या मनाने स्वधर्मात घेतले, स्वत:ची कन्या दिली... पण, 'सरनौबती' कायमची गेली, ती गेलीच!

'भाजपा'च्या नादाला लागून जे जे म्हणून गेलेत; त्यांचे तर, यापेक्षाही वाईट हाल नजिकच्या भविष्यात होऊ शकतात. 'मंत्रीपदा'च्या 'मनसबदारी'च्या आमिषाने शिवसेनेची 'सरनौबती' तर गेलीच... पण, आता 'गद्दार' या, पुढील आयुष्यात कधिही पुसला न जाणाऱ्या 'कलंका'चा मळवट भरत, उर्वरित आयुष्य कंठावं लागेल... केलेल्या अपकृत्याची निशाणी म्हणून, अश्वत्थाम्याच्या कपाळावरच्या भळभळत्या जखमेसारखा, नियतीने माथी मारलेला नालायकीचा 'शिक्का' पदरी बांधून रानोमाळ भटकावं लागेल! ...शिवसेनेत परत आले; तरी, आधीची 'सरनौबती' मिळणार नाही आणि, भाजपात गेले तर 'गुलामगिरी' टळणार नाही... औटघटकेचे 'मंत्रीपद' गेले की, मग भाजपाची 'उम्रकैद' किंवा कायमचे राजकीय 'निर्वासन' अथवा जनमानसातून 'विस्थापन'! 

सध्या 'मिंधेगटा'चे कार्यकर्ते, भाजपाच्या (एकप्रकारे, 'आधुनिक मुघलां'च्या) चाकरीत असल्यामुळे उन्मत्त होऊन 'शिवसेने'च्या कार्यकर्त्यांवर हल्ले चढवत आहेत. उद्या ते नेतोजीरावांसारखे मुघलांच्या कैदेत गेल्यावर व त्यांचे "बाळासाहेब ते हेगडेवार", असे वैचारिक 'धर्मपरिवर्तन' किंवा 'सांस्कृतिक-रक्तबदल' झाल्यावर... या कार्यकर्त्यांना पण, कोणी वाली उरणार नाही की, कुठलं काळं कुत्र देखील विचारणार नाही !!!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1