Top Post Ad

सावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का?...डॉ. जितेंद्र आव्हाड



अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत. त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत  शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजितदादांवर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तसेच, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळंशांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही ते म्हणाले. 

अजितदादा पवार स्वराज्य रक्षक

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. तर आंदोलनंही सुरु झाली आहेत. त्यावरुन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजितदादांवर टीका करणार्‍यांवर चांगलीच आगपाखड केली. 

डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे हे शिवरायांच्या निधनानंतर राजगादीवर बसले. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसारच ते पुढे जाणार होते. याबाबत कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य असे निर्मिलेले होती. मराठा हा व्यापक शब्द होता; मराठा ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये सर्व समाविष्ठ झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार  छत्रपती संभाजी राजे हे होते.  त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले, असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत. 

समकालिन जेवढे इतिहासकार आहेत; त्यामध्ये जेवढे परकिय इतिहासकार आहेत; त्या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगले लिहून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन राज्याभिषेक करुन घेतले, असे प्राच्य इतिहासकार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले आहे. शाक्त म्हणजे काय तर, स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करणे! छत्रपती संभाजी महाराज हे शाक्त परंपरेचे-संस्कृतीचे अभ्यासक होते. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होते. या स्वराज्यात आपण सगळेच आलो आहोत. स्वराज्य हे जात-धर्म विरहित होते. ते स्वराज्य रक्षक होते म्हणजेच ते सर्वांचेच रक्षण करायचे ना? कोणत्याही प्राचीन किंवा समकालिन इतिहासकाराने त्यांना धर्मवीर असे कुठेही म्हटलेले नाही. स्वराज्याचे रक्षण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती; तीच भावना छत्रपती संभाजी महाराजांचीही होती. जी परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविली; तीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनीही चालविली. 

जर एवढेच आहे तर या ठिकाणी दोन पुस्तकांची उदाहरणे देतो!  त्यापैकी एक आहे, ‘सहा सोनेरी पाने’! त्यामध्ये शिवरायांच्या राज्याबद्दल काय म्हटले आहे हे सांगून मला नवीन वाद निर्माण करायचा नाही. पण, सावरकरांनी सहा सोनेरी पाने या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे ते वाचण्यायोग्यही नाही. “त्यांना मदिरा आणि मदिराक्षीचा नाद होता” असे सावकरांनी लिहिले आहे. तसेच, शिवाजी महाराजांचा नाकर्ता पुत्र असेही सावरकरांनी लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या पोटी नाकर्ता पुत्र जन्माला आला, असे सावरकर म्हणत आहेत. दुसरे पुस्तक म्हणजे बंच ऑफ थॉट्स; त्यामध्ये गोळवलकर म्हणतात की, “संभाजी महाराज हे बाई आणि बाटलीच्या आहारी गेले होते. अन् त्यांची खंडो बल्लाळ यांच्या बहिणीवर वाईट नजर होती.” नाटकाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राजसंन्यास आणि इथे ओशाळला मृत्यू या नाटकांमध्ये संभाजी महाराजांना स्त्री लंपट आणि दारुडा म्हणून दाखविण्यात आले. याबद्दल कधीच कोणी बोलले नाही. आम्ही वारंवार त्यावर बोलत आलो आहोत.

आम्ही पहिल्यापासून छत्रपती संभाजी राजांना स्वराज्य रक्षक असेच म्हणत आहोत. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते, ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी, येथेच तर खरा इतिहास दडला आहे. म्हणूनच आपण सांगत आहोत की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका! इतिहास वाद वाढवतो. कारण, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळंशांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती. तेव्हा काही गोष्टी शांतपणे बाजूला सारायच्या असतात; कारण, त्यामुळे समाजमनावर परिणाम होत असतो.

 शिवाजी महाराजांचा जो धर्म होता तो महाराष्ट्र धर्म, राष्ट्र धर्म आणि मराठा धर्म होता.  मराठा ही त्यावेळी जात म्हणून ओळखली जात नव्हती. मराठा ही व्यापक संकल्पना होती. म्हणूनच राष्ट्रगितामध्ये मराठा ही व्यापक संकल्पना असल्यानेच ‘मराठा’ हा शब्द आलाय; इतिहासात ते परंपरागत आहे. त्यामुळे आपली विनंती आहे की,  नको ते वाद वाढवू नका. सरदेसाईंच्या वाड्याची माहिती कोणी दिली, कशी दिली? याचे सर्व ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे वाद वाढवायचे नसतात; आता हे इथेच थांबविलेले बरे राहिल. अजितदादा जे म्हणाले त्याचा गैरअर्थ काढला जात आहे. 

आपण जे सांगत आहे ते अभ्यास करुन सांगत आहे. त्यात कुठेही असत्याचा स्पर्श नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की, शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजितदादांवर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगितले तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मनावर काहीतरी परिणाम होईल. अजितदादा हे संभाजी महाराजांच्या विरोधात बोललेले नाहीत. संभाजी राजांना विशिष्ठ धर्माचे लेबल लावून विकायचे प्रयत्न कधीही झाले नव्हते. समकालिन इतिहासकार काफी खान आणि औरंगजेबाच्या रोजनिशीमध्ये काय लिहून ठेवलेय, तेही वाचा. इतिहासाचा अभ्यास करुन अजितदादांवर टीका केली असती तर समजू शकतो. पण, निष्कारण इतिहासाला धर्माची जोड देणे बरोबर नाही, असा सल्ला त्यांनी दिला. 

जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे तथाकथीत शिवचरित्रकार या महाराष्ट्राने बघितले ना? आमची आई जिजामाता या दादू कोंडदेवसोबत सागरगोटे खेळत होती, असे कधी झालेय का? जिजाऊंची परंपरा काय, याचा विचार करायला नको का? हा घरगडी अन् हा सागरगोटे खेळत होता. किती विकृत लिहिलेय की, आपले राज्य वाचविण्यासाठी मराठे आपल्या आईलापण पाठवायला मागेपुढे करीत नव्हते. आम्ही सन 2000 पासून यावर बोलतोय; पण, आज धार नसलेल्या तलवारी काढून जे बोलताहेत ते आधी का नाही बोलले. कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेबद्दल जेव्हा सांगितले जाते तेव्हा सावरकर हे शिवाजी महाराजांची सदगुण विकृती आहे, असे म्हणतात. परधर्मातील स्त्रीवर बलात्कारच झाला पाहिजे, असे दिशानिर्देश सावरकर आपल्या साहित्यातून देत आहेत. तेव्हा काय म्हणायचे? इतिहासाची पुस्तके बाहेर काढली तर वर्ण्यव्यवस्था, तिरंगा, स्वातंत्र्य कसे अयोग्य आहे, हे सर्व बाहेर पडेल. उगाच बाऊ करायला जाऊ नका, असेही डॉ. आव्हाड म्हणाले. 

 अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, कसली माफी? असा प्रश्न उपस्थित करुन,  त्यांनी माफी मागावी. सावरकर चुकले आहेत, मागा माफी! गोळवलकर चुकले म्हणून माफी मागा. स्त्री लंपट आणि दारुडे होते आमचे राजे? हिमंत आहे, या पानांवर माझ्याशी वाद घालायचा? हे पुरावे त्यांच्याच पुस्तकातले आहेत ना, असा प्रतिपश्न डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com