स्वतःला पुरोगामी समजतो. फुले - शाहू - आंबेडकरांचा वारसा सांगतो. शिवाजी - जिजाऊंचा वारसा सांगतो. तुकाराम - तुकडोजी महाराज - गाडगे बाबांचा वारसा सांगतो. सावित्रीचा वारसा सांगतो. गांधींची कर्मभूमी असलेलं सेवाग्राम (वर्धा) महाराष्ट्रात आहे. बाबासाहेबांची दीक्षाभूमी (नागपूर) महाराष्ट्रात आहे. तशीच देशात विकृती पसरविणारी संघभूमी (नागपूर) देखिल महाराष्ट्रात आहे!
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात जंगल आहे. मोठमोठ्या नद्या आहेत. पर्वत आहेत, डोंगर आहेत. मोठा समुद्रकिनारा आहे. मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं शहर आहे. महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. १२ कोटी जनता आहे. महाराष्ट्राची माणसं साधी आहेत. भोळी आहेत. साठ टक्के जनता ग्रामीण भागाशी संबंधित आहे. शेतजमीन मोठी आहे. भूमी सुपिक आहे. तरीही शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत असतात. कारण, नेते स्वार्थी आहेत. दिशाहीन आहेत. निर्दयी आहेत. संवेदनशून्य आहेत. धूर्त आहेत. बदमाश आहेत. अर्थात् प्रत्येक नियमाला काही अपवाद असतातच.
महाराष्ट्रात पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारीला होत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात गेल्या १२ वर्षापासून डॉ. सुधीर तांबे हे महापुरुष या मतदार संघातून निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे ते आमदार आहेत. प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते बाळासाहेब थोरात यांचे हे मेहुणे आहेत. या महापुरुषाला काँग्रेसनं पुन्हा एकदा तिकीट दिलं. A-B फॉर्म दिला. पण हा माणूस एवढा सत्वशील की त्यांनी तो फॉर्म अखेरपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलाच नाही. म्हणजे सरळ सरळ पक्षाशी हरामखोरी केली! पण त्यांच्याऐवजी त्यांचे कर्तबगार पुत्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला! यासारखा खानदानी विश्वासघात महाराष्ट्राच्या इतिहासात बहुधा दुसरा असणार नाही. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार या जागी उभाच केला नाही. या निमीत्ताने काँग्रेसच्या पिता-पुत्रांनी जो राजकीय छिनालपणा दाखवला त्याची हद्द झाली. हा केवळ काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न नाही. महाराष्ट्रातील एकूणच राजकारणाचा कसा रंडीखाना झालेला आहे, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. विखे पाटील, हर्षवर्धन पाटील अशी अनेक घरंदाज मंडळी भाजपाच्या कोठ्यावर मुजरे करायला आधीच जाऊन बसलेली आहे. त्यात तांबे पिता पुत्रांची आणखी भर पडली एवढंच!
यात फडणवीस किंवा भाजपाला दोष देण्यात अर्थ नाही. त्यांच्या पक्षाची लायकी आणि मर्यादा त्यांना चांगल्या ठाऊक आहेत. संपूर्ण देशाला नैतिक पातळीवर आपला वाटेल असा एकही नेता त्यांच्याकडे आजवर पैदा झाला नाही. शिवाय पुढील शंभर वर्षे तसं कोणी निर्माण होणारही नाही. ज्या दिवशी तो तयार होईल त्या दिवशी संघ संपलेला असेल. एक नवा संघ उदयास आलेला असेल. म्हणूनच ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे. गब्बर सिंगच्या टोळीत खरे साधू किंवा संत कुठून पैदा होणार?
फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते कधीही नव्हते. गडकरींचा काटा काढण्यासाठी मोदी-शहा यांनी त्यांना हाताशी धरलं. त्याचं काम आता आटोपलं आहे. फडणवीस हे मोदी-शहा यांचे पगारी मॅनेजर आहेत. म्हणून तर महाराष्ट्रातील महत्वाचे प्रोजेक्ट गुजरातमध्ये पळविले जात असतानाही फडणवीस चूप आहेत. असा महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला माणूस महाराष्ट्राचा खरंच नेता होऊ शकतो का?
नेता होण्यासाठी नैतिक अधिष्ठान असावं लागते. दूरदृष्टी असावी लागते. सर्वसमावेशक वृत्ती असावी लागते. एखादा पक्ष बहुमतात येणं, त्याची सत्ता येणं, त्यातलाच एखादा मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होणं ही लोकशाहीची तांत्रिक प्रक्रिया आहे. सर्वोच्च पदावर गेलेली व्यक्ती ही नेता म्हणवून घेण्याच्या लायकीची असतेच असं नाही! अफगाणिस्तानमध्ये जसे तालिबानी अतिरेकी सत्तेत आलेत, तसाच काहीसा प्रकार लोकशाहीच्या नावावर आपल्याकडे सुद्धा घडून आला. अत्यंत सुमार बुद्धीची माणसं नको तिथं जाऊन बसली. देशाची सूत्रधार झाली. सारी बाग माकडांच्या हातात गेली. माकडांनी स्वतःच्या बागा निर्माण केल्याचं इतिहासात कुठेही उदाहरण नाही. विध्वंस हाच माकडांचा गुणधर्म असतो. त्यालाच ते पराक्रम समजतात. मोदी कितीही आव आणत असलेत तरी ते सदैव भेदरलेले असतात. त्यांची मानसिक अवस्था विचित्र आहे. अर्थात् संघाच्या एकूणच प्रॉडक्टमधून निघालेलं ते अफलातून प्रॉडक्ट आहे. ते देशासाठी जसे विनाशकारी आहेत, तसेच संघ आणि भाजपसाठीही विनाशकारी आहेत. एकदा सत्तेतून जाऊ द्या, प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.
मोदी असोत, संघ असो, भाजपा असो की फडणवीस असोत, त्याचं काम ते करतात. त्यांनी त्यांचा धंदा राजरोसपणे सुरू केलेला आहे. त्यांचा जाहीरनामा स्पष्ट आहे. त्यांना त्याची लाज वाटत नाही. जर काँगेस वाल्यांनीच आपली लाज शरम सोडली असेल, तर त्यांना तरी का वाटावी? उलट ज्यांचे खिसे भरलेले असतील, अशा धन्नाशेठ काँग्रेसी लोकांनी हवं तेव्हा त्यांच्या राजकीय कोठ्यावार यावं आणि आपला सत्तेचा शौक भागवून घ्यावा, यासाठी भाजपाच्या खिडक्या सदैव खुल्या आहेत आहेत. नव्या नव्या गिऱ्हाईकाच्या शोधात फडणवीस बसलेलेच असतात. देशाच्या राजकारणातला सर्वात वाईट आणि लाजिरवाणा काळ सध्या सुरू आहे. त्यालाच हे लोक ’अमृतकाळ’ म्हणून मिरवत असतील तर, त्यांची बौद्धिक लायकी काय असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
पण तांबे पितापुत्रांनी केलेले प्रताप कमालीचे किळसवाणे आहेत. त्यांना लाज शरम नसेलही. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा महान वारसा असा मातीत जात असताना आपण शांत बसणार आहोत का? हा प्रश्न प्रत्येक सभ्य माणसाला पडला पाहिजे. आम्ही खरंच एवढे मुर्दाड आहोत का? महाराष्ट्र या सत्तेच्या दलालांची खाजगी प्रॉपर्टी आहे का? महाराष्ट्राचं किंवा देशाचं काहीही वाटोळं झालं तरी आम्ही असेच थंड बसणार आहोत का? आमच्यातला पुरुषार्थ पार कुजून गेला आहे का? महापुरुषांच्या नावाचा वारसा सांगताना, त्यांचा जयजयकार करतांना आम्हाला स्वतःची जराही लाज वाटत नाही का? युवक काँग्रेसचे तरूण कार्यकर्ते यावर काय विचार करत असतील? त्यांना संताप येत नसेल का? की त्यांचीही अवस्था ठेचलेल्या बैलासारखी झाली असेल? कुणी काहीही म्हणो, पण सारेच युवक एवढे मुर्दाड असू शकत नाहीत! एवढे लाचार असू शकत नाहीत! एकीकडे राहूल गांधी देश पैदल पालथा घालत आहेत आणि दुसरीकडे हे फितूर लोक आपली लायकी दाखऊन देत आहेत! निवडणूक येइपर्यंत आणखी असे कितीतरी ’तांबे’ समोर येतील, याबद्दल शंका नाही. देश बर्बाद झाला काय, महाराष्ट्र गुजरातच्या घशात गेला काय, शेतकरी मेला काय, त्यांना काहीही फरक पडत नाही! म्हणूनच आपल्यासारख्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांच्या मुलांची, ग्रामीण भागातील मतदारांची जबाबदारी वाढलेली आहे!
बागेवर चोरांचा कब्जा, फितूर झाला ठाणेदार
न्यायदेवता मस्त झोपली, कुठे करायाची तक्रार!
जंगल, पर्वत लुटले कोणी, कुणी पळवले पाणी रे..
उजाड अमुची शेते-गावे, अशी कशी मनमानी रे..!!
बागेवर चोरांचा कब्जा, कुठे करू तक्रार रे..
भुरटे बसले गादीवर अन् किसान दारोदार रे..!!धृ!!
जे अमुच्या अन्नावर जगले, तेच आमुचे नेते का?
सारा पाऊस घरात त्यांच्या, व्याकुळ अमुची शेते का?
मुजोर झाली कशी माकडे, मचला हाहाकार रे..
भुरटे बसले गादीवर अन् किसान दारोदार रे..!!
रस्ते गिळले, बँका लुटल्या, इथल्या विकृत सत्ताखोरांनी
’गायरान’च्या जमिनी लुटल्या, ’खोके’वाल्या चोरांनी!
शिवरायांच्या तलवारीला, लावू नव्याने धार रे..
भुरटे बसले गादीवर अन् किसान दारोदार रे..!!
तरुण अमुचा डिग्री घेऊन दारोदारी फिरतो का ?
रोज आमचा बळीराजाही फास घेऊनी मरतो का?
या सैतानी सत्तेवरती, एक हतोडा मार रे..
भुरटे बसले गादीवर अन् किसान दारोदार रे..!!
शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये, असेल जो कोणी नेता
चिडता, रडता,शिव्या घालता तरी पुन्हा का मत देता ?
महाराष्ट्र हो सुजलाम् सुफलाम्, आणू असे सरकार रे..
भुरटे बसले गादीवर अन् किसान दारोदार रे..!!
महाराष्ट्राला असल्या लुचाड नेतृत्वाच्या तावडीतून सोडवायचं असेल, तर नवा पर्याय उभा करावाच लागेल! वेळ अजून गेलेली नाही! तूर्तास एवढंच..!
- ज्ञानेश वाकुडकर
- अध्यक्ष - लोकजागर 9822278988
- लोकजागर अभियान
0 टिप्पण्या