ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक व्यक्तीमत्व प्रा. चंद्रभान बळीराम इंगळे उर्फ प्रा. चंद्रभान आझाद यांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या ठाणे शहराच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाली. याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मागील अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये पुढाकार असलेल्या प्रा.आझाद यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर ठाणे प्रावक्ता म्हणून नियुक्ती केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खा.राजन विचारे, ठाणे लोकसभा प्रभारी मधुकर अण्णा देशमुख, तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी चंद्रभान आझाद यांच्या नावाची शिफारस केली होती, त्यांच्यासोबतच युवा मीडिया एक्स्पर्ट अनिश गाढवे यांची देखील प्रवक्ता म्हणून यावेळी नियुक्ती करण्यात आली,
शेंडीची खांडोळी करण्यासाठी आणि नितीभ्रष्ट राजकारणाला एन्काऊंटर करून ठाणे शहरातील सर्वसामान्य जनतेची प्रगती, झोपडपट्ट्याचे जटिल प्रश्न, शिक्षण व्यवस्थेची सुधारणा आणि जनतेची लूट करणाऱ्या गोल्डन गँग, अधिकारी व राजकारण्यांचा कायदेशीर मार्गाने कसा बंदोबस्त करता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील राहून शिवसेना नेतृत्वाचा विश्वास बळकट केला जाईल. असे आश्वासन प्रा.चंद्रभान आझाद यांनी यावेळी दिले.
एम्. ए... इंग्रजी, बी.एड. बॅचलर ऑफ जर्नलिझमची पदवी असलेले चंद्रभान आझाद सध्या ठाण्याच्या थिराणी हायस्कुल आणि कनिष्ठ महाविदयालयात उप-प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. "युथ रिपब्लिकन” या युवा विद्यार्थी संघटनेचा संस्थापक. बहुजन असंघटीत मजदूर युनियन संस्थापक, राज्यभर संघटनेचे जाळे. बहुजन शिक्षक परिषदेचा राज्य संघटक. बहुजन समाज पार्टीचा माजी, ठाणे महानगर महासचिव. इंटक कामगार संघटना माजी, ठाणे जिल्हा अध्यक्ष. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा, ठाणे जिल्हा प्रभारी. अशा विविध संघटना पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीने परिचीत असलेले ठाण्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणून ठाणेकरांना त्यांची ओळख आहे. आज शिवसेनेच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती झाल्याने आता नव्या पर्वाचा प्रारंभ होत असल्याचेही मत त्यांनी मांडले.
संविधानाचे रक्षण आणि मराठी मातीतील तळागाळातील कष्टकरी, असंघटीत कामगार, घरेलु कामगार गुमास्ता कामगार, कंत्राटी शिक्षक बांधकाम मजूर यांच्या कल्याणासाठी सतत कार्यशिल असून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, ठाणे जिल्हा अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत असून शिवसेना पक्षाचा व पक्षाध्यक्ष मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून त्यांनी सोपवलेल्या जबाबदारीला त्याच क्षमतेने खरे करणार असल्याची ग्वाही देखील आझाद यांनी दिली.
0 टिप्पण्या