Top Post Ad

*एमपीएससी कडून पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचे अर्ज स्वीकारण्यास नकार ?*

 


एमपीएससी कडून पत्रकारिता पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; छगन भुजबळ यांनी वेधले शासनाचे लक्ष

पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकृत करण्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या; छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक तृटी असल्याने पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत तातडीने तांत्रिक तृटी दूर करून पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारण्यात येऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जम्बो भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही उमेदवारांचे ऑनलाईन अर्जासाठी अपात्र असल्याचे संदेश येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी नव्हे अनेक वर्षापासून उपलब्ध झालेली संधी एमपीएससीच्या चुकीच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे गमाविण्याची भीती तरूणांमध्ये निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.    

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभागाच्या मागणीपत्रानुसार माहिती व जनसंपर्क विभागाकडील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या वर्ग-१ व वर्ग-२ पदांची जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ ही ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द केली आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२३ आहे.  मागील दहा वर्षात भरल्या गेल्या नसतील त्यापेक्षा कित्येक पट जागांसाठी यावेळी सरळसेवा भरती निघाली आहे. मात्र सदर भरती प्रक्रियेतील जाहिरातीत स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतांनाही उमेदवार जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘आपल्याकडे सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अर्ज करण्यास पात्र नाहीत’ असा संदेश येतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. पत्रकारितेची बॅचलर व डिप्लोमा ही डीग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत आहे. मात्र पत्रकारिता व जनसंपर्क विषयात ख्यातनाम विद्यापीठातून कला पारंगत पदवी (पदव्युत्तर पदवी) घेतलेले विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचे छगन भुजबळ यांनी शासणाच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

त्यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील सर्व प्रमुख शासकीय आस्थापना, सर्व विद्यापीठे, महानगरपालिका, सिडको, महावितरण, महाराष्ट्रि राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हा परिषद, वनविभाग, समाज कल्याण, शासकीय व निमशासकीय महामंडळे तसेच खुद्द माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी हे पदे सरळसेवेने भरतांना पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. ख्यातनाम विद्यापीठातून नियमितपणे प्राप्त केलेल्या कला पारगंत (पदव्युत्तर पदवी) धारकांस जर या पदांसाठी अर्ज करता येत नसतील तर माहिती प्रशासनात तूलनेने कमी पात्रता व ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांचा शिरकाव होऊ शकतो. हे निश्चित राज्याच्या प्रगतीसाठी भूषणावह नाही असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या यापूर्वीच्या जाहिरात क्र.४२/२०१७, ५९/२०१७ व ०३/२०२१ पदांसाठी सुरूवातीस ऑनलाईन अर्ज भरतांना पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी धारकांना अडचणी आल्या होत्या. कालातरांने त्यात दुरूस्ती करण्यात येऊन अर्ज स्विकारले गेले होते. तेव्हा सध्याच्या जाहिरात क्र.१२९, १३० व १३१ च्या माध्यमातून ही पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना ऑनलाईन अर्ज करतांना मुदत संपण्याच्या आत तात्काळ दिलासा देण्यात यावा. तसेच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com