ठाणे शहरात सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा येत्या मंगळवारी म्हणजेच तीन जानेवारी रोजी जागर होणार आहे. सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त ठाण्याच्या टाऊन हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी सावित्री-जोतीराव फुले यांच्या वैचारिक संघर्षाबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, चूलखंडातील नागरिकत्व झुगारुन स्वत:ची ओळख प्रस्थापित करणार्या महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे, या कार्यक्रमास मा. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, अॅड. प्रणिती शिंदे, वृषाली वाघुले, मर्जिया पठाण, गिता शाह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आली.
नुकतीच ठाण्याच्या शासकीय विश्रामृगहामध्ये ओबीसी एकीकरण समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ठाणे शहरात सावित्री महोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. नवनाथ शिंदे हे सत्यशोधक समाज आणि फुले दाम्पत्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तसेच, टिकली नाकारुन स्व अस्तित्व दाखवणारी पत्रकार रुपाली बिडवे, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक पटकावणारी वैशाली तांडेल, सामाजिक बंधने झुगारुन सत्यशोधक पद्धतीने विवाह करणारे मराठा समाजातील श्री व. सौ. घाडगे दाम्पत्य, विक्रीकर सहआयुक्त तनुजा मस्करे, वनाधिकारी गिरीजा देसाई, सरकारी वकील रेखा हिवराळे यांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी अभियान - भारतामध्ये चूल आणि मूल या संकल्पनेत अडकविलेल्या माय-भगिनींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीमाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांनी अथक परिश्रम घेतले. प्रतिगामी वृत्तीच्या लोकांच्या विरोधाला न जुमानता या दाम्पत्याने पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरु केली. आज अवकाशाला गवसणी घालणार्या आणि भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या महिलांकडे पाहिल्यास फुले दाम्पत्याच्या कर्तृत्वाची साक्ष पटते. त्यामुळेच या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित करावे; तसेच, भिडे वाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे, या मागणीसाठी टाऊन हॉल येथे सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यात यावा, या मागणीसाठी सुमारे 10 हजार सह्यांचे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी दिली.
पहिल्यांदाच ठाण्यात सावित्री रॅली- ठाणे शहरात प्रथमच माळी समाजाच्या वतीने ‘सावित्री रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता ठाणे रेल्वे स्टेशन येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरुन या रॅलीला प्रारंभ होणार आहे. शिवाजी पथ मार्गे ठाणे बाजारपेठेतून ही रॅली कोर्ट नाका येथील बाबासासाहेबांच्या पुतळ्यासमोर विसर्जित होणार आहे. या रॅलीमध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष माळी नवनीत शिनलकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या