बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास मानवंदना कार्यक्रम जयभीम नगर बुद्धविहार, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई येथे बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी संपन्न झाला. पूज्य भिक्खू विशुद्धानंदबोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आयु. समीर वानखेडे झोनल डायरेक्टर (एनसीबी) हे उपस्थित होते. तसेच भदन्त खेमधम्मो, भन्ते लामा, यांच्यासह मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन भदन्त संघप्रिय, भदन्त शिलबोधी, भदन्त पद्मपाणी यांनी उत्कृष्टरित्या केले होते. यावेळी विक्रोळी, पवई, भांडुप, चांदिवली, साकिनाका, अंधेरी इत्यादी ठिकाणाहून अनेक उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
संपूर्ण भारत वर्षातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठा भिक्खू संघ चैत्यभूमीवर येतो तसेच परतीच्या प्रवासात संपूर्ण भिक्खू संघ, हजारो उपासक उपासिका जयभीम नगर बुद्धविहार, पवई येथेही येत असतात. त्या संपूर्ण भिक्खू संघाला भोजनदान, विवरदान, परिस्कार दान, प्रवास खर्च देण्याची सुंदर परंपरा आपण जोपासत आहोत. गेल्या काही वर्षापासून हा संपदान दानोत्सव अधिकाधिक मोठा करण्याचा आपला प्रयत्न आहे. दान हा एक सद्गुण आहे. एक पारमिता आहे. भिक्खू संघ "पुण्यखेतं अनुत्तरं लोकस्साची" लोकांमधला सर्वोत्तम पुण्यक्षेत्र आहे. करिता संपदानामध्ये सहभागी होऊन पुण्य अर्जित करणाऱ्या सर्व उपासक-उपासिकांकरिता भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो यांनी मंगल कामना केली.
संपूर्ण भारतावर ज्यांचे अनंत उपकार आहेत. भारत सदा सर्वकाळ एक संघ राहावा. या करिता जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण केले आहे. "खातो तो घास, घेतो तो श्वास" याची जाणीव ठेवून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी जयभीमनगर बुद्धविहार, येथे पूजनीय भिक्खू संघ उपासक उपासिका अनेक मान्यवर येत असतात. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. आज आपल्याकडे जे काही आहे, ते केवळ बाबासाहेबांची देण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा देऊन हजारो वर्षांची गुलामगिरी जातीवाद, कर्मकांड, अनिष्ट रूढी परंपरांना मूठमाती दिली आणि बहुजनांच जीवन सुखमय केलं. परंतु समरसता, सर्व धर्म समभाव इत्यादी गोंडस तथा लोभस शब्दाने संभ्रम उत्पन्न होऊ लागला. आज काल गणपती उत्सवामध्ये बाबासाहेबांची गाणी वाजतात म्हणून तरुण पिढी उत्सव साजरा करू लागले आहेत. जाळ्यात अडकू लागले आणि म्हणूनच आजच्या तरुणाला धम्मदिक्षाचे महत्व सांगावे लागणार आहे. २२ प्रतिज्ञा समजावून सांगाव्या लागणार आहेत. या करिता धम्मदिक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे भन्ते विशुद्धानंद यांनी स्पष्ट केले.
यावेळी समीर वानखेडे यांनीही बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. बाबासाहेबांनी केलेल्या उत्तूंग कार्यामुळेच आपण आज या पदावर आहोत. तसेच बुद्धांच्या त्रिसरण पंचशील तत्वांचे पालन करूनच जीवनाचे सार्थक होत असते. या तत्वामुळेच आज मी आपल्यासमोर उभा राहू शकलो. अन्यथा आपण जाणता आहातच माझ्यावर किती संकटे आली. मात्र या संकट काळात भन्ते विशुद्धानंद बोधी यांनी मला लाखमोलाची साथ दिली. माझ्यावर विश्वास ठेवला. हा धम्माप्रति आदरभाव होता म्हणूनच हे शक्य झाले. असे मत वानखेडे यांनी व्यक्त केले.
यावेळी भदन्त विशुद्धानंद बोधी यांनी जयभीम नगरच्या विहाराची वास्तू मोठ्या भव्य प्रमाणात उभारण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन समीर वानखेडे यांना केले तेव्हा त्यांनी आपल्या यथाशक्तीप्रमाणे तसेच माझ्या सारख्या समविचारी अधिकाऱ्यांकडून शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या