Top Post Ad

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कंत्राटदाराचा भ्रष्टाचार उघड


ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या पाहणीदौऱ्यादरम्यान रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत सफाईचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विभागाला दिले आहे. रुग्णालयाच्या सफाईसाठी 180 कर्मचारी असताना हजेरीपटावर 108 कर्मचारीच आढळून आले अशा तऱ्हेने कंत्राटदार मागील अनेक वर्षापासून हा प्रकार करीत असल्याचे संबंधित कामगारांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. आजपर्यंत या कंत्राटदाराने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची माहीती मिळत आहे. या भ्रष्टाचारामागे कुणाचा वरदहस्त आहे. कोणता नेता या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे. 

यावेळी रुग्णालयाच्या तळमजल्यावरील सर्व प्रकारच्या तपासणीचे बाह्यरुग्ण विभाग, क्ष- किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, एमआरआय कक्षाची पाहणी, लेबर वॉर्ड, एनआयसीयू, औषधी कक्ष, अतिदक्षता विभागांची पाहणी आयुक्त श्री. बांगर  यांनी  केली. सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत केसपेपरसाठी रुग्णांची गर्दी होत असल्याने रुग्णांना विलंब होणार नाही व वेळेत उपचार होतील यासाठी केसपेपर व औषधांसाठी अतिरिक्त खिडक्या वाढविणे तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग  यांच्यासाठी स्वतंत्र असलेल्या खिडकीवर गरोदर मातांचाही समावेश करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तपासणीनंतर रुग्णांना देण्यात येणारे औषध घेण्यासाठी रुग्णांची फार मोठी रांग असल्याचे निदर्शनास येताच श्री. बांगर यांनी रुग्णांशी संवाद साधला. औषधे घेण्यासाठी रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी अतिरिक्त औषध खिडक्या वाढविण्यात याव्यात व यासाठी लागणारा अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी वर्ग घेण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या. या पाहणीदौऱ्यादरम्यान दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश विभागाला दिले आहे.

नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी -             बालरोगतज्ज्ञ विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभागाची पाहणी आयुक्तांनी केली.  रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सद्यस्थितीत 20 बेड कार्यरत असून अतिरिक्त 10 बेड कार्यरत करण्याच्या सूचना दिल्या.

गोवर वॉर्डची पाहणी - गोवर वॉर्डचा आढावा घेताना किती रुग्ण दाखल आहेत, आयसीयूमध्ये रुग्ण दाखल आहेत का, दररोज किती रुग्ण दाखल होतात याची माहिती घेतली. त्याचबरोबर पार्किंगप्लाझा येथे किती रुग्ण दाखल आहेत याचाही आढावा घेतला. गोवरच्या बालकांची बालरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी दिल्या. 

महात्मा फुले जनआरोग्य योजना कक्षास भेट - महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत दारिद्रयरेषेखालील रुग्णांचे मोफत उपचार केले जातात. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चर्चा केली असता सोनोग्राफी मशीनचे कारट्रेज संपल्याचे निदर्शनास येताच तातडीने मशीनसाठी कारट्रेज खरेदी करा व रुग्णालयातील तातडीच्या खरेदीसाठी 1 लाख रुपयांची रक्कम वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्तरावर देण्याबाबत सांगितले. कोणत्याही कारणास्तव रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या.

रुग्णांशी सौजन्याने वागणूक द्या-  गोरगरीब रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांनी सुरक्षा रक्षक किंवा कर्मचाऱ्यांना माहिती विचारल्यास त्यांना सौजन्याची वागणूक देण्याबाबत काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 3 ऐवजी 6 दिवस सेवा सुरू ठेवावी - दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गैरसुविधांचा सामना करावा लागतो, तसेच अनेकदा त्यास विलंबही होतो. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा सध्या रुग्णालयात तीन दिवस तपासणी सुरू असते. दिव्यांग व्यक्तींना सहजपणे दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे यासाठी सदरची तपासणी  सहाही दिवस सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.

एम.आर.आय व सीटीस्कॅन कक्षास भेट -             छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एम.आर.आय. व सी.टी. स्कॅन कक्षास श्री. बांगर यांनी भेट दिली. यावेळी येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून घेतल्या जाणाऱ्या चार्जेसची माहिती घेतली. सदर सुविधा अधिक कार्यक्षम कशी करता येईल याबाबत सूचना दिल्या.

रुग्णालयातील भंगार तातडीने हलवा - रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस व डकमध्ये भंगार झालेले बेडस् आणि इतर साहित्य इतरस्त्र ठेवल्याचे निदर्शनास येताच हे साहित्य तातडीने हटविणे तसेच पॅसेजमधील सामान काढून ते मोकळे करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या. तसेच या डकमध्ये पाणी साचणार नाही, पॅसेज स्वच्छ राहतील या दृष्टीने कार्यवाही करावी. पॅसेजमध्ये चेंबरची झाकणे नीट बंद असतील याची दक्षता घ्यावी, तसेच भिंत्तीवरील फाटलेली व अर्धवट अवस्थेत असलेली माहितीपत्रके काढण्याच्या सूचना दिल्या

स्वयंपाकघर व उद्यानाची पाहणी -यावेळी रुग्णालयाच्या स्वयंपाकघराचीही पाहणी आयुक्‌तांनी केली. रुग्णांना देण्यात येणारे जेवण गरम राहिल व स्वयंपाकघरात स्वच्छता राहिल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयाच्या आवारात असलेल्या उद्यानामध्ये आणखी झाडे लावण्यात यावीत जेणेकरुन येथील वातावरण प्रसन्न राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय डॉ. अनिरुद्ध माळगांवकर आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com